शिवसेनेच्या विरोधी नेतेपदास मान्यता
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने काल आवाजी मतदाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान, नंतर सभापतींनी दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना विरोधी नेते म्हणून मान्यता दिली. दरम्यान, २८८ सदस्यीय विधानसभेत भाजपचे १२२ आमदार आहेत. त्यामुळे सरकार अल्पमतात आहे, असे असताना मतविभाजनाची मागणी फेटाळून विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले, हा लोकशाहीचा खून असल्याचे कॉंग्रेसने म्हटले. यासंबंधी सभापती हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले. शिवसेनेचे रामदास कदम म्हणाले की, प्रक्रिया टाळून घेतलेेले हे मतदान म्हणजे लोकांचा विश्वासघात आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाशी बोलणी करून सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याबाबत विचार केला जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधीच जाहीर केले होते की, विश्वासदर्शक ठरावावर जर मतदान घेण्यात आले तर पक्ष त्यात भाग घेणार नाही. दरम्यान, काल सुरुवातीला भाजप आमदार बागडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सकाळीच शिवसेना व कॉंग्रेसने आपापले उमेदवार मागे घेतले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकार ‘अनौरस’ असल्याची टीका केली. मतविभाजन करून पुन्हा विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यपालांना इजा : ५ कॉंग्रेस आमदार निलंबित
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना इजा पोचविल्याबद्दल पाच कॉंग्रेस आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या संयुक्त सत्रास संबोधित करण्यासाठी राज्यपाल आल्यावेळी या कॉंग्रेस आमदारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, विरेंद्र जगताप, जयकुमार गोरे यांच्या निलंबनासाठी संसदीय व्यवहार मंत्री प्रकाश मेहता यांनी ठराव मांडला. तो आवाजी मतदानाने संमत झाला. या आमदारांनी राज्यपालांच्या हाताला इजा पोचवल्याचे म्हटले आहे. ‘आम्ही अलोकशाही पद्दतीने सरकारला तारल्याबद्दल आंदोलन करत होतो’ असे या आमदारांनी म्हटले आहे. प्रकाराच्या चौकशीसाठी सभागृह समिती स्थापण्यात आली आहे.