>> निवडणूक सहप्रभारी रेड्डी व प्रभारी सी. टी. रवीही येणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री तथा गोवा भाजपचे निवडणूक सहप्रभारी किशन रेड्डी व भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हे आज सोमवार दि. २० रोजी दोन दिवसीय गोवा दौर्यावर येत आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री तथा गोवा भाजपच्या निवडणूक सहप्रभारी दर्शना जर्दोश राज्यात पोहोचल्या आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते राज्यातील एकूण राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहेत.
दोन दिवसांच्या भेटीत मुख्यमंत्री, मंत्री, पक्षाचे आमदार, पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी ते चर्चा करतील आणि निवडणूक तयारीचा आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन करतील. याचबरोबर पक्षाच्या विविध समित्या, महिला, युवक, अल्पसंख्यांक, इतर मागास वर्गीय आदी मोर्चाच्या पदाधिकार्यांशी चर्चा करतील. तसेच बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करतील.
देवेंद्र फडणवीस यानी २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. यापूर्वी त्यांनी बिहारसह अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी हे आंध्रप्रदेशमधून लोकसभेवर निवडून आलेले आहेत. कला व संस्कृती, पर्यटन ईशान्य विभाग विकास राज्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जर्दोश ह्या सुरत मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे रेल्वे आणि वस्त्र मंत्रालयाचा कारभार आहे.
अरविंद केजरीवाल आज गोव्यात
पणजी : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज दि. २० सप्टेंबर रोजी गोवा दौर्यावर निश्चित झाला आहे. या भेटी दरम्यान ते गोव्याती आप कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीती आणि पक्ष बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करणार आहेत. केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे यांनी सांगितले. केजरीवाल मॉडेलच्या भीतीमुळे कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनीही विविध राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची बदली करावी लागत असल्याची टीका यावेळी म्हांब्रे यांनी केली.