प. बंगाल निवडणूक : दुसर्‍या टप्प्यात ८० टक्के मतदान

0
92

>> अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना
प. बंगाल विधानसभेसाठी दुसर्‍या टप्प्यात काल ८० टक्के मतदान झाले. ५६ मतदारसंघासाठी काल झालेल्या या मतदाना दरम्यान काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली. मारामारी, धमक्या, बनावट मतदान, मतदान केंद्रावर कब्जा अशा घटनांचा यात समावेश होता.

दुसर्‍या टप्प्यात एकूण ५६ मतदारसंघात ३८३ उमेदवार रिंगणात असून त्यात ३३ महिलांचा समावेश आहे. सर्व ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही अनेक मतदारसंघामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या.
माओवाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे बीरभूम जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संध्या. ४वा.पर्यंत अशी ठेवली होती. तर अन्य सर्व मतदारसंघात ६वा. पर्यंतची वेळ होती. बीरभूममधील एका मतदान केंद्रानजीक सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी उडाल्या. त्यात काहीजण जखमी झाले तर दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मतदानाच्या आदल्या रात्रीही उत्तर दिनाजपूरमधील भाकप (मा.) व कॉंग्रेसच्या कार्यालयांची काहींनी नासधूस केली.
हिंसाचाराच्या घटनांसाठी कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले. माल्डा येथेही भाकप व तृणमूल कॉंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचे प्रकार घडल्याचे वृत्त आहे.