प. बंगालमधील पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा एकहाती विजय

0
7

पश्चिम बंगालमध्ये रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कल हाती आला असून तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय संपादन केला आहे. दार्जिलिंग आणि कालिम्पाँग वगळता प्रत्येक जिल्ह्यात तृणमूलने विजय मिळवला आहे. तर, राज्यात तृणमूलनंतर भाजप क्रमांक दोनचा पक्ष झाला आहे. डावे आणि काँग्रेस आघाडी तिसऱ्या क्रमांकावर असून विरोधी पक्ष म्हणून भाजप सज्ज झाला आहे.

शनिवारी 8 जुलै रोजी पश्चिम बंगालच्या 73 हजार 887 ग्रामपंचायत जागांपैकी 64 हजार 874 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. उरलेल्या 9 हजार 12 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बिनविरोध निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 8 हजार 874 जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे. आलेल्या निकालानुसार तृणमूलने एकूण 63 हजार 229 पैकी 34,980 जागांवर विजय मिळवला असून 570 जागी आघाडीवर आहे. भाजपने 9 हजार 735 जागांवर विजय मिळवला असून 150 जागांवर आघाडी आहे. सीपीएमने 2 हजार 940 जागा जिंकल्या असून 65 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेसने 2 हजार 94 जागी विजय मिळवला असून 62 जागी आघाडीवर आहे.
इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) बंगालमध्ये नव्याने उदयास येत असून या पक्षाने भांगर मतदारसंघात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी भांगरच्या काही ब्लॉक्समध्ये तृणमूलविरोधात कडवी झुंज दिली. याच भागात मतदानावेळी हिंसाचार घडला होता.

पंचायत समिती निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस विजयी
पंचायत समित्यांमध्ये 9 हजार 740 जागांपैकी तृणमूलने 6,467 जागा जिंकल्या असून 184 जागी आघाडी घेतली आहे. भाजपने 990 पंचायत समित्या जिंकल्या असून 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर डाव्या आघाडीला 182 जागा जिंकता आल्या असून 13 जागी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला 267 जागा मिळाल्या आहेत. अपक्ष उमेदवारांनी 58 जागा जिंकल्या असून काहींचे निकाल अजूनही हाती आलेले नाहीत.

जिल्हा परिषदेतही तृणमूलचा झेंडा
ग्रामपंचायत, पंचायत समितीसह जिल्हा परिषदेतही तृणमूलच पुढे आहे. मतमोजणी झालेल्या 928 जागांपैकी 685 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजप 21 जागांवर आघाडीवर आहे, तर सीपीआय (एम) 2 जागांवर तर काँग्रेस 6 जागी विजयी झाली आहे. काही जागांचा निकाल येणे बाकी आहे.