>> संकलन केंद्रात कचरा जमा केल्यानंतर पैसे परत मिळणार
>> प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून कार्यवाही
प्लास्टिकच्या बाटल्या, तसेच प्लास्टिकचे आवरण असलेल्या वस्तू खरेदी केल्यानंतर आदी अविघटनशील कचऱ्यासाठी आता ग्राहकांना आगाऊ रक्कम भरावी लागणार असून, नंतर हा प्लास्टिक कचरा संकलन केंद्राकडे सुपूर्द केल्यानंतर ग्राहकांना आगाऊ रकमेचे पैसे परत केले जाणार असून, त्यासंबंधीची अधिसूचना काल राज्य सरकारने काढली.
प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी विविध ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायद्यातील तरतुदीनंतर राज्य सरकारने त्यासंबंधीची प्रक्रिया अधिसूचित केली आहे. त्यामुळे हा कचरा गोळा करण्यासाठीची केंद्रे उभारणे, तसेच ग्राहकांना त्यांची आगाऊ रक्कम परत करणे, तसेच त्यांची अमंलबजावणी करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करणे आदी प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
हा कचरा स्वीकारण्यासाठीची केंद्रे पणजी महापालिका, तसेच राज्यभरातील नगरपालिका व पंचायत क्षेत्रात सुरू करण्यात येणार आहेत. तेथे हा प्लास्टिक कचरा स्वीकारला जाणार आहे. कोणतीही प्लास्टिक वेस्टन असलेली वस्तू खरेदीच्या वेळी ग्राहकांनी त्यासाठी भरलेली रक्कम ग्राहकांना संकलन केंद्रातून परत करण्यात येणार आहे.
प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्यानंतर कचरा मिळेल तेथे फेकला जाण्याच्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.