प्लाझ्मा थेरपीच्या मर्यादा

0
198

कोरोनाने बुधवारी गोव्यात १३६ नव्या रुग्णांचा उच्चांक प्रस्थापित केला. एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांची पातळी ओलांडली. आठ बळी गेले होतेच, काल पुन्हा आणखी एक बळी गेला. एकूणच कोरोनाच्या या राक्षसाला आवरायचे कसे हा पेच आज गोव्यासमोर उभा आहे. सरकारचे आधीच तोकडे असलेले हात कोरोनाला रोखण्यात दिवसेंदिवस अधिकच अपुरे पडू लागल्योचे दिसते आहे. एकीकडे वाढत्या रुग्णसंख्येनिशी उपचार सुविधांचा भासू लागलेला तुटवडा आणि दुसरीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आलेले दारुण अपयश अशा दुहेरी आघाडीवर राज्य सरकारची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात लागोपाठ माणसे कोरोनाने मृत्युमुखी पडू लागल्याने सरकारने आता ‘प्लाझ्मा थेरपी’च्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ म्हणजे आयसीएमआरची परवानगी मिळाली की राज्यामध्ये प्लाझ्मा थेरपी म्हणजे रक्तद्रव्य उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी रक्तद्रव्य साठा म्हणजे ‘प्लाझ्मा बँक’ची उभारणीही केली जाणार आहे. मात्र, ही उपचारपद्धती देश – विदेशांत काही रुग्णांमध्ये जरी यशस्वी ठरलेली असली, तरी अजूनही ती निर्णायक उपचारपद्धती असल्याचा निर्वाळा कोणी दिलेला नाही.
आपल्या आयसीएमआरने देशभरातील पन्नास ठिकाणी केलेल्या चाचण्यांचा निष्कर्ष अद्याप जाहीर व्हायचा आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विविध राज्यांना पाठवलेल्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये ह्या उपचारपद्धतीचा वापर करून पाहायला हरकत नसल्याचे सूतोवाचही करण्यात आलेले आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली असा एकूण प्रकार आहे.
प्लाझ्मा थेरपीचा किंवा रक्तद्रव्य उपचारपद्धतीचा अवलंब देशात अनेक राज्यांनी करून पाहिला आहे आणि काहींना त्यामध्ये यशही आले आहे. तामीळनाडूने नुकतेच अठरा रुग्णांवर उपचार करून पाहिले आणि ते सर्व बरे झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय जगताच्या आशा उंचावणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राने तर जगातील सर्वांत मोठी प्लाझ्मा उपचार चाचणी सध्या चालवलेली आहे. त्यामुळे गोव्याने या पर्यायाचा प्रयोग करून पाहण्यात काहीही वावगे नाही, मात्र, सरकारने राज्यातील कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी सुरू केली म्हणजे सरसकट हे रुग्ण बरे होतील अशी अपेक्षा मात्र कोणी ठेवू नये.
मुळात हे रक्तद्रव्य केवळ कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांमधूनच मिळवायचे असते. इतर रक्तदात्यांचा काही फायदा होत नाही. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर म्हणजे किमान तीन आठवड्यांनंतरच हे रक्तद्रव्य घेता येते. म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या कोरोना प्रतिकारक्षमतेचा (अँटिबॉडीज्) फायदा कोरोनाच्या रुग्णाला ते रक्त देऊन करून देता येईल का हे ही उपचारपद्धती पाहते. मात्र. त्यासाठी बर्‍या झालेल्या व्यक्तीमध्ये कोणतेही सह – आजार (को-मॉर्बेडिटी) नाहीत ना, ती पूर्णपणे आरोग्यपूर्ण व्यक्ती आहे ना हे पाहावे लागते. शिवाय ज्या कोरोना रुग्णामध्ये हे रक्तद्रव्य द्यायचे असते, त्या व्यक्तीमध्ये देखील अन्य आजारांची गुंतागुंत असून चालत नाही. हे लक्षात घेतले तर सध्या फार गाजावाजा चाललेल्या या प्लाझ्मा थेरपीचा उपचार मर्यादित स्वरूपातच करता येऊ शकतो हे लक्षात येईल. शिवाय ही उपचार पद्धती यशस्वी होईलच असेही छातीठोकपणे सांगता येत नाही. एका व्यक्तीचे चारशे ते आठशे मिलीलीटर रक्त दुसर्‍याला दिल्यानंतर त्याच्या शरीराने ते स्वीकारणेही तितकेच महत्त्वाचे असते. शिवाय या हस्तांतरणाच्या मदतीने ती व्यक्ती कोरोनाचा सामना करू शकेल की नाही हे देखील सरसकट निकष लावून सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीला सद्यपरिस्थितीत तरी केवळ प्रायोगिक महत्त्वच आहे. ती निर्णायक उपचारपद्धती नाही. मात्र, बुडत्याला काडीचा आधार म्हणतात त्याप्रमाणे या उपचारपद्धतीचा अवलंब करून पाहायला काय हरकत आहे, या भूमिकेतूनच तिला सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिच्यावर फार भरवसा ठेवण्यात काही अर्थ नसेल. अर्थात, यातून रुग्ण बरे होऊ शकले तर चांगलीच बाब ठरेल!
राज्यात एकीकडे रुग्णसंख्या प्रचंड वाढते आहे आणि दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. सध्या राज्यात दर शंभरपैकी ५९ जण बरे झाले आहेत. हे प्रमाण आणखी वाढेल. परंतु नव्याने वाढणार्‍या रुग्णांचे प्रमाणही प्रचंड आहे आणि त्याला जोवर आळा घालता येत नाही तोवर कोरोनाचा आलेख काही खाली येणे शक्य नाही. त्यामुळे त्याचा फैलाव रोखण्याकडे अजून लक्ष देण्याची गरज आहे.