गेल्या जून महिन्यापासून अंतराळात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकून पडलेल्या मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर यांना अखेर काल सुरक्षित पृथ्वीवर आणण्यात यश आले. त्यांचा हा परतीचा प्रवास अवघ्या जगाने श्वास रोखून पाहिला. शेवटी त्यांना घेऊन येणारी कुपी जेव्हा अटलांटिक महासागरामध्ये पॅराशूटच्या साह्याने अलगद उतरली, तेव्हा त्या क्षणाचे महात्म्य काही औरच होते. सुनीता विल्यम्स ह्या गेले 286 दिवस अंतराळात होत्या. ह्या दरम्यान त्यांचा मुक्काम असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाने पृथ्वीला 4755 प्रदक्षिणा घातल्या. म्हणजेच विल्यम्स यांचा एकूण 195.2 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास झाला. पण खरी कमाल ही ह्या आकड्यांची नाहीच आहे. ती आहे ह्या अंतराळवीरांच्या जिद्दीची आणि विलक्षण धाडसाची, धैर्याची. कोणी लेचीपेची व्यक्ती असती तर आपल्या अंतराळयानात बिघाड झाल्याचे पाहूनच पार गर्भगळीत झाली असती. परंतु विल्यम्स आणि विल्मोर यांना अवघ्या आठ दिवसांसाठी म्हणून अंतराळात चाचणी फेरीवर घेऊन गेलेले बोईंगचे स्टारलायनर अवकाशयान हिलियम वायूगळती आणि अन्य तांत्रिक बिघाडांमुळे नादुरुस्त झाले आणि जेव्हा त्या यानाचा परतीचा प्रवास मानवविरहित स्थितीत करावा लागेल हे निश्चित झाले, तेव्हा पुढच्या अनिश्चिततेमुळे कोणीही हातपाय गाळले असते. शून्य गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी प्रदीर्घ काळ राहण्याचे फार मोठे दुष्परिणाम मानवी शरीरावर होत असतात. त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या भविष्यात निर्माण होऊ शकतात. हे सगळे ठाऊक असून देखील ज्या शांतचित्ताने, खंबीरपणे आणि हसत्या चेहऱ्याने ह्या अंतराळवीरांनी आपला अवकाशातील लांबलेला हा मुक्काम आपले मानसिक संतुलन ढळू न देता पूर्ण केला ते खरोखरच कमालीचे आहे. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्यांना तब्बल नऊ महिने अंतराळात राहावे लागले, परंतु ह्या वीरांमध्ये कोठे नाराजीचा मागमूस दिसला नाही. विलक्षण धैर्याने आल्या परिस्थितीला ही दोघे सामोरी गेली. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याची राजकारण्यांना खोड असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तरी त्याला कसे अपवाद असतील? डोनाल्ड ट्रम्प यांनी विल्यम्स आणि विल्मोर यांच्या घरवापसीचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी ह्या अंतराळवीरांना परत आणण्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. स्पेसएक्सचे सर्वेसर्वा व ट्रम्प यांचे निकटवर्ती इलॉन मस्क यांनी देखील त्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी आपण ज्यो बायडन यांच्याकडे तयारी दर्शवूनही त्यांनी त्याला मंजुरी दिली नव्हती हा इतिहास उगाळला आहे आणि ट्रम्प यांच्या पदरात श्रेय टाकले आहे. सुनीता विल्यम्स ह्या मूळ भारतीय वंशाच्या असल्याने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही देऊन टाकले आहे. विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे गुजराती. गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील झुलासान हे त्यांचे मूळ गाव. सुनीता यांची आई उर्सुलीन बोनी ही स्लोव्हेनियन. त्यामुळे मूळ भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या धैर्याची ही कहाणी भारतीय नव्या पिढीलाही निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या स्पेसएक्सने त्यांना पृथ्वीवर परत आणले, त्यांचेच यान काही दिवसांत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह पुन्हा अंतराळात झेप घेणार आहे. सध्या दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत आले आहेत खरे, परंतु आता पुढील किमान दीड महिना त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागणार आहेत. अंतराळातील वास्तव्य आणि पृथ्वीवरील वास्तव्य यामध्ये जमीन अस्मानाचाच फरक असतो. पृथ्वीवर रक्तप्रवाह गुरुत्वाकर्षणामुळे वरून खाली जातो, तर अंतराळात तो खालून वर जात असतो. त्यामुळे त्यांचे पाय दुबळे बनले आहेत. पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात स्नायूंचा वापरही कमी होत असतो. शिवाय दीर्घकाळ अवघडलेल्या स्थितीत अंतराळात अडकून पडल्याने सांधेही आखुडले आहेत. त्यामुळे ह्या अंतराळवीरांवर ह्या सगळ्या गोष्टींचे तीव्र शारीरिक दुष्परिणाम घडलेले असू शकतात. त्यांना चालण्यासाठी देखील काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. भविष्यातही त्यांना गंभीर आजारपणास सामोरे जावे लागू शकते. ह्या अंतराळवीरांपेक्षाही अधिक काळ अवकाशात अडकून पडल्याची पूर्वीची उदाहरणे आहेत, परंतु सुनीता विल्यम्ससारख्या एका स्त्रीने ह्या आव्हानात्मक परिस्थितीला ज्या प्रकारे हसतमुखाने तोंड दिले, ती त्यांच्या जिद्दीची कहाणी खरोखर येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल. ही कहाणी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट व्हावी. ती नक्कीच प्रेरक असेल.