प्रेम म्हणजे…

0
279
  • पौर्णिमा केरकर

प्रेम हे हिंसक होऊच शकत नाही. आणि झाले तर त्याला प्रेम म्हणताच येत नाही. प्रेम ही एक अनुभूती सभोवतालाला, व्यक्तिमत्त्वाला उन्नत करणारी. त्याग हा या भावनेचा स्थायिभाव. ते कोणावरही केले तरी त्यातील आत्मतत्त्व हरवू देऊ नका.

 

एक पाचवीत शिकणारी मुलगी. सुंदर, सोज्वळ, निरागस चेहर्‍याची. त्याच शाळेत आठवीत शिकणारा मुलगा. वयाच्या मानाने चेहर्‍यावर राकट भाव. मग्रुरी तर डोळ्यांतून जाणवणारी. कसले तरी मादक द्रव्य पिऊन डोळे लाल झालेले. एके दिवशी या मुलाने त्याच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीला विश्वासात घेतले. ती आठवीत शिकणारी मुलगी त्या पाचवीत शिकणार्‍या मुलीच्या शेजारी राहणारी हे त्या मुलाला माहीत होते. त्याने त्या मुलीच्या हातात कॅडबरी चॉकलेट दिली आणि सांगितले की तू ही चॉकलेट पाचवीतल्या त्या मुलीला नेऊन दे. माझं नाव सांगू नकोस.

त्या मुलीने या कामाला होकार दिला, पण मुलाला अट घातली की तू या कामाच्या बदल्यात मलाही काहीतरी द्यायला हवे. मुलाने तिलाही चॉकलेट देण्याचे मान्य केले. आठवीतल्या मुलीने पाचवीच्या मुलीला त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे चॉकलेट देण्याचे काम केले. असे पुढे तीन-चार वेळा घडले. आपणाला कोण आणि कशासाठी चॉकलेट देत आहे, हे बिचार्‍या त्या मुलीच्या गावीही नव्हते. तिने मात्र निरागस मनाने याचा आस्वाद घेतला. मुलाच्या वर्गशिक्षकाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याला याचे गांभीर्य लक्षात यायला वेळ लागला नाही. त्याने त्या मुलाला धारेवर धरले. मुलीकडून तिची चूक वदवून घेतली आणि त्या छोट्या मुलीच्या आईला जाऊन भेटून ही घटना सविस्तर सांगितली. त्याच्यातील धोका ओळखून मुलीकडे लक्ष द्या, तिला वेगळ्या स्पर्शाची, स्वभावाची जाणीव करून देण्याचा सल्लाही दिला. खरं तर या मुलीने आपल्या आईला चॉकलेट खाल्ल्याचा प्रसंग सांगितला होता. तिने ऐकले आणि सोडूनही दिले. जेव्हा शिक्षकाने त्यामागील हेतू सांगितला, गांभीर्य अधोरेखित केले तेव्हा मात्र ती घाबरली.

असाच एक दुसरा प्रसंग. भर वर्गात शिक्षिकेसमोर घडलेला. दुसरीत शिकणार्‍या मुलाचा. दुसरीतल्या या मुलाने त्याच्याच वर्गमैत्रिणीला पप्पी दिली आणि वर्गातील सर्वच मुलांनी एकदम टाळ्या वाजवून ‘हॅप्पी व्हेलेंटाईन डे’ असे मोठ्याने म्हटले. हा प्रसंगच एवढा अनपेक्षित होता की क्षणभर शिक्षिकेला काय करावे ते सुचलेच नाही. त्या अगदी हबकून गेल्या. मग मात्र स्वतःला सावरले. त्या प्रसंगावर भाष्य करीत मुलांना संवेदनशील केले. मुलं भावुक झाली. निदान त्या क्षणी तरी त्यांना आपली चूक उमगली. या दोन्ही प्रसंगात शिक्षक सावध होते. शिवाय त्यांचे विद्यार्थ्यांबरोबर भावनिक नाते जुळलेले असल्याने त्यांनी मुलांना कोणतीच शिक्षा न करता, अकारण मुलांसंदर्भात गैरसमज करून न घेता त्यांना समुपदेशन केले. असे प्रत्येक वेळी होईल हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयाने या गोष्टी सोडवायला हव्यात. पण हे चित्र अलीकडे दिसत नाही. नकळत्या वयात मुलामुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटणे आणि त्यालाच प्रेम संबोधून त्याच्यात गुंतवून घेत एका हरवल्या स्थितीत घरी, शाळेत वावरणे हे चित्र पूर्वी जरा वयात आलेल्या, त्याशिवाय कुमारवयीन मुलामुलींत प्रामुख्याने दिसायचे. पण हे लोण आता अगदी प्राथमिक स्तरापर्यंत येऊन पोहोचले आहे. हे मुलांच्या सकस निकोप वाढीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
वयात आलेल्या दोन भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वांना एकमेकांविषयी आकर्षण वाटणे हे साहजिकच असले तरी त्यातच आकंठ बुडून राहाणे बाकी सर्वच गोष्टींना दुर्लक्षित करणारे ठरते. एकमेकांना प्रोपोज करून एकदा होकार मिळाला की मग जणू काही हवेत तरंगल्यागत अवस्था होते. बर्‍याच मुलांची आज इन्स्टाग्राम, फेसबुकवर अकौंट आहेत. त्या जागा फक्त अशा मैत्रीचेच फोटो अपलोड करण्यासाठी असतात, असाच गोड गैरसमज मुलामुलींत पसरलेला दिसतो.

मागे तीन-चार वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ नावाच्या एका खेळाने पालकांना हादरवून टाकले होते. या गेमच्या वेडापायी कित्येक मुलांनी आपले आयुष्य संपवले. आता कोठेतरी हे वेड कमी होते न होते तो ‘पबजी’ने त्याची जागा घेतली. त्याही सोबतीने ‘टिकटॉक’सारख्या ऍपचे मुलांच्या मनाला मोठे आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे स्वतःला चित्रपट अभिनेत्री समजून आधीच असलेल्या संवादावर मेकअप करून तोंड हलवायचे. यात जोडीजोडीने शिरकाव करायचा… या अशा मुलांच्या मनोवृत्तीमुळे मुलांना बाकीच्या गोष्टींचे आकर्षण वाटू लागले आहे. वर्गात त्यांचे असणे सैरभैर… एखाद्या साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमात सहभागी करून घेत त्यात झोकून देत काम करणारी मुले सापडणे कठीण होत आहे. हातातील भ्रमणध्वनीसकट स्वतःला एखाद्या खोलीत कोंडून घेत तासन्‌तास स्क्रीनवर डोळे केंद्रित करून राहणारी मुले वाढत आहेत. त्या नकळत्या वयात त्या मुलामुली, त्यांची तथाकथित मैत्री, मग ती प्रेमात रुपांतरित झालेली… ते एक दिव्य स्वर्गीय आहे असे त्यांना वाटते. त्यांचे विविध पोझिशनमधील फोटो मग सार्वजनिक होतात. एरव्ही या गोष्टी खाजगी होत्या, त्या आता जगजाहीर करून त्यातच आपला दिवसाचा बराचसा वेळ वाया घालवला जातो.

‘प्रेम’ ही अशी एक सुंदर अनुभूती, त्यातून तर जे एकमेकांवर खरेच जीवापाड प्रेम करतात ते सुरुवातीला एकमेकांना त्यांच्या गुणदोषांसकट समजून घेतात. सहवासातून स्वतःचे, सभोवतालचे जगणेही ती उन्नत करतात. मी ज्या व्यक्तीवर प्रेम करीत आहे ती व्यक्ती माझी न होता इतर कोणाची झाली तरीही ती सुखी असावी, ही भावना प्रेमात असणे गरजेचे असते. असे न होता ‘जिला माझी होता येत नसेल तिला या जगात राहायचाच अधिकार नाही’ या पराकोटीच्या तीव्र द्वेषाने तिला भर रस्त्यात जाळणे, ऍसिड हल्ला करणे, चाकू-सुरा खुपसून भोसकून खून करणे, सोशल मीडियातून बदनामी करणे… हे किती भयंकर चित्र. अशी मानसिकता अगदी वेगाने वाढत आहे. या विकृतीकडे प्रवास करणार्‍या वाढीला कोठेतरी अटकाव करायलाच हवा. त्यासाठी मुलांना वैचारिक दृष्टीने परिपक्व बनविणे ही जशी शाळेची जबाबदारी आहे असे समाजाला, कुटुंबाला वाटते, तशीच ती कुटुंबाची, समाजाचीही महत्त्वाची जबाबदारी आहे याचे भान जरूर ठेवावे.

आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सरसकट पालक कष्ट करतात. मुलं शिकून त्यांनी चांगली नोकरी करावी, पुढे मग लग्न, मुले असा त्यांचा संसार सुरू व्हावा असे एक सर्वसाधारण त्यांचे स्वप्न. परंतु हा असा त्यांनी ठरविलेला प्रवास सुखकर व्हावा म्हणून तरी पालकांनी पालकत्व निभाविणे ही काळाची गरज आहे. मुलांना जन्म देऊन ती मोठी होईपर्यंत काळजी घेतली जाते. त्यांच्या सर्वच लढाया स्वतः लढल्या तर त्यांना जगणं कसं कळेल…? मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहून ते पूर्णत्वास नेणारे आंतरिक प्रेम पालकांनी त्यांना दिले तर त्यांना प्रेम म्हणजे काय हे नितळपणे कळत जाईल… प्रेम प्रत्येक वस्तू, व्यक्ती सुंदर बनवीत असते. ती एक दिव्य शक्ती… तिच्या अद्भुत अनुभूतीमुळेच तर माणसाने अजूनही स्वतःला जिवंत ठेवले आहे. असे सार्वकालिक, चिरतरुण प्रेम जे शिकवते ते जीवनसंघर्ष, समस्यांसकट सर्व स्वीकारते. आणि जगणे सुंदर आहे ही भावना मनात रुजून आयुष्याचा प्रवास सुकर करते. प्रेम हिंसक होऊच शकत नाही. आणि झाले तर त्याला प्रेम म्हणताच येत नाही. प्रेम ही एक अनुभूती सभोवतालाला, व्यक्तिमत्त्वाला उन्नत करणारी. त्याग हा या भावनेचा स्थायिभाव. ते कोणावरही केले तरी त्यातील आत्मतत्त्व हरवू देऊ नका. ते आहे संस्कृतीचा सारांश…