प्रेम आणि क्रूरता

0
8
  • ज. अ. रेडकर

शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेले प्रेम हे कमकुवत व अल्पजीवी असते आणि मनापासून केलेले प्रेम हे चिरंतन असते. सुख-दुःखात पतीपत्नी एकमेकांची साथ सोडत नाहीत. पतीधर्म आणि पत्नीधर्म अखेरपर्यंत निभावला जातो. ते खरे प्रेम असते.

अलीकडच्या काळात घडलेल्या दोन घटना मनाला वेदना तर देणाऱ्या आहेतच, परंतु माणुसकीवरचा विश्वास उडवणाऱ्यादेखील आहेत. राक्षसी प्रवृत्तीलाही लाज वाटेल अशा प्रकारची ही दोन कृत्ये घडलेली आहेत. एक आहे आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर यांचे, तर दुसरे आहे मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांचे. ही दोन्ही युगुले आपापल्या सहमतीने एकत्र राहात होती. ‘लिव्हिंग रिलेशन’ हा नवीनच प्रकार भारतात सुरू झाला आहे. पाश्चात्त्य लोकांच्या जीवनशैलीचा प्रभाव भारतीय तरुण पिढीवर पडतो आहे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. आपण कोणत्याही गोष्टीचे जेव्हा अंधानुकरण करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.


प्रेम ही भावना शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेली असेल तर ते आकर्षण तात्कालिक असते. शरीर आकर्षक असेल तोवर हे प्रेम टिकते. असे प्रेम चंचल असते. आयुष्यात दुसरी आकर्षक व्यक्ती आली की पहिली व्यक्ती आवडेनाशी होते आणि नावडत्या व्यक्तीच्या सगळ्याच गोष्टी अप्रिय वाटायला लागतात. अशा प्रेमातून मोकळीक मिळवण्यासाठी कुणा एकाकडून टोकाचे पाऊल उचलले जाते. आफताब पुनावाला व श्रद्धा वालकर यांचे असेच काहीसे घडलेले दिसते. मनोज साने व सरस्वती वैद्य यांच्या प्रेमात कोणती ठिणगी पडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आफताबने श्रद्धाचे 33 तुकडे केले, ते फ्रीजमध्ये ठेवले आणि थोडे थोडे करून रात्रीच्या वेळी दूर नेऊन टाकले. मनोज साने याने त्याही पुढे जाऊन सरस्वतीचे 100 तुकडे करून ते कुकरमध्ये उकडले आणि सरस्वतीच्या आवडत्या कुत्र्याला खाऊ घातले. माणूस इतके घृणास्पद कृत्य करू शकतो यावर विश्वास बसणे मुश्कील आहे. कारण आता आपण सुसंस्कृत समाजात वावरतो आहोत. अश्मयुगातून आपण नागरसंस्कृतीत आलो आहोत. शिक्षणाने माणूस अधिक प्रबुद्ध झाला आहे. त्याची वैचारिक पातळी उंचावली आहे. समाजसुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पुढे नेले आहे. वैज्ञानिकांनी वैज्ञानिक सत्ये शोधून वैज्ञानिक दृष्टिकोण जनमानसात रूजवला आहे. अश्मयुगातील माणसातील हिंस्त्र प्रवृत्तीचे दमन होऊन परस्पराशी सौहार्द संबंध निर्माण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर अफताब-श्रद्धा आणि मनोज-सरस्वती हे प्रकरण सुसंस्कृत समाजाला धक्का देणारे आहे.


हिंदू धर्मातील महाकाव्ये, पुराणे, उपनिषदे यांत राक्षसांच्या क्रूरतेच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. पशुपक्षी आणि मनुष्याची हत्या करून त्यांचे मांस खाणारे राक्षस या कथांतून आढळतात. या गोष्टी खऱ्या की खोट्या हा वादाचा विषय होऊ शकेल, पण आज जे क्रौर्य दिसते ते पाहिल्यावर त्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. डिम्पल जैन या तरुणीने केवळ संपत्तीच्या हव्यासाने आपल्या 62 वर्षीय आईची हत्या केली, तर गोरखपूरमधील मधुकर गुप्ताचा मुलगा प्रिन्स ऊर्फ संतोष गुप्ता याने आपल्या वडिलांचा खून करून त्यांच्या देहाचा चेंदामेंदा केला. इतकी क्रूरता येते कुठून हेच समजत नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपले संगोपन केले, आपले लाड केले, सगळे बालहट्ट पुरवले, शिक्षण दिले, स्वतःच्या पायावर उभे केले, त्याच माता-पित्याची हत्या मुले करतात हे आश्चर्यकारक आहे. मागासलेल्या ग्रामीण भागात तर अशा अनेक घटना घडत असतील, ज्यांची आपणाला चाहूलही लागत नसेल. कारण मीडिया तिथपर्यंत पोहोचत नाही.

शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेले प्रेम हे कमकुवत व अल्पजीवी असते आणि मनापासून केलेले प्रेम हे चिरंतन असते. सुख-दुःखात पतीपत्नी एकमेकांची साथ सोडत नाहीत. पतीधर्म आणि पत्नीधर्म अखेरपर्यंत निभावला जातो. ते खरे प्रेम असते. इतिहासात शहाजहानचे प्रेम अमरप्रेम म्हटले जाते. मुमताजच्या आठवणीसाठी त्याने ताजमहाल बनविला. त्याच्या मुलाने त्याला तुरुंगात टाकून राज्य बळकावले तेव्हा तुरुंगाच्या गवाक्षातून शहाजहान ताजमहाल पाहत राहत असे, आणि त्याने ताजमहाल पाहतच अखेरचा श्वास घेतला असे म्हणतात. यासंबंधी आता इतिहासाची चिरफाड करताना वेगळीच माहिती समोर येत आहे ही गोष्ट अलाहिदा! परंतु पत्नीविषयी अतोनात प्रेम असणारी एक व्यक्ती 1970-80च्या दशकात भारतात होऊन गेली आणि ती म्हणजे दशरथ मांझी! आपल्या आजारी पत्नीला औषोधोपचारांसाठी शहरात नेऊ शकलो नाही आणि म्हणून तिचा मृत्यू झाला याची खंत त्याला होती. दशरथाच्या जन्मगावी गेहालोर आणि गया यांमधील डोंगराच्या अडथळ्यामुळे शहरात जायला रस्ताच नव्हता आणि म्हणून आपण आपल्या पत्नीला वाचवू शकलो नाही याची रुखरुख दशरथ मांझीला लागली. त्याने आपल्या गावातील अन्य कुणावर अशी दुर्धर पाळी येऊ नये म्हणून स्वतः एकट्यानेच डोंगर फोडायला सुरुवात केली. गावातील लोक त्याला याकामी प्रोत्साहन आणि मदत करण्याऐवजी त्याची चेष्टा करीत. त्याला वेडा समजत. परंतु रस्ता बनविण्याचा ध्यास घेतलेल्या दशरथने आपले काम थांबवले नाही. ऊन, पाऊस, थंडी, वारा या कशाचीही तमा न बाळगता त्याने आपले उद्दिष्ट साध्य केले. गहेलोर- गया हा दशरथ मांझीने तयार केलेला 25 फूट उंचीवरचा 360 फूट लांब, 30 फूट रुंद रस्ता म्हणजे त्याच्या पत्नीप्रेमाचे खरे स्मारक होय; शहाजहानचा ताजमहाल नव्हे!

आफताब पुनावाला आणि मनोज साने हे विकृत आणि क्रूर होते म्हणून त्यांनी आपल्या जोडीदाराची घृणास्पद हत्या केली आणि दशरथ मांझी हा खरोखरचा प्रेमी होता म्हणू त्याने पत्नीच्या आठवणीसाठी डोंगर फोडून रस्ता बनविला. यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की, विकृती आणि क्रूरता केवळ एका ठराविक धर्मातच किंवा जातीतच असते हे खरे नव्हे. क्रौर्याला आणि प्रेमाला जात, धर्म, पंथ नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. वासनेचा अतिरेक होतो तेव्हा क्रौर्याचा जन्म होतो. यातून बलात्कार आणि हत्या घडतात. वरील क्रूर घटना पाहिल्यावर असे वाटते की, सर्वंकश सुसंस्कृत समाज अजून निर्माण व्हायचा आहे.