प्रेमात पाडणारे पहलगाम

0
207

(चिनारच्या छायेत-५)
– परेश वा. प्रभू
अनंतनागहून मार्तंड ऊर्फ मट्टणमार्गे आपण पहलगामच्या रस्त्याला लागतो आणि काश्मीरचे खरे सौंदर्य आपल्यापुढे उलगडू लागते. समोर दोन्ही बाजूंनी उंच उंच हिमाच्छादित पर्वतशिखरे आणि त्यांना जणू टेकलेले, खाली उतरलेले निळेशार आभाळ आपल्याला गुंग करून सोडते. हिमाचल प्रदेशात मंडीहून मनालीकडे जाताना जशी बियास नदी आपल्या रस्त्याच्या कडेने अखंड खळाळत मागे जात असते, तशी येथे लिडार नदी सुबक वळणे घेत दगडगोट्यांतून खळखळत वाहात येत आपला प्रवास अतिशय सुंदर बनविते. अगदी थेट वर पहलगामला पोहोचेपर्यंत तिचे अवखळ शुभ्रधवल पाणी जणू आपल्या स्वागतासाठी आवेगाने धावत सामोरे येत असते.
पहलगाम हा आपल्या काश्मीर भ्रमंतीचा कळसाध्याय ठरतो, कारण या सार्‍या परिसराने आपले दैवी सौंदर्य आजही बर्‍याच प्रमाणात जपलेले आहे. उत्तर काश्मीरमधील इतर पर्यटनस्थळांच्या बाजारूपणाच्या तुलनेत या सार्‍या परिसराला साधेपणाचा स्पर्श आहे. येथील माणसांशी बोलतानाही तो जाणवतो.
खळाळत्या लीडार नदीच्या सोबतीने आपण अलगद पहलगामला येऊन पोहोचतो. येताना वाटेत ऐशमुकाम अशा लक्षणीय नावाचे एक गाव लागते. तेथे रस्त्याच्या बाजूलाच एका उंच डोंगरावर एक वास्तू आपले लक्ष वेधून घेते. ही झैनुद्दिनची झिआरत म्हणजे दर्गा. येथे कधी काळी क्षेमगुप्त राजाने बांधलेले भीमकेशव मंदिर होते म्हणे. एक हिंदू बैरागी तेथे राहायचा. त्या मंदिराची मशीद झाली आणि बैराग्याचाही धर्म बदलला. पहलगामला आम्ही पोहोचलो तेव्हा तर उन्हे उतरत आली होती. सायंकाळची कोवळी सुवर्ण किरणे पर्वतशिखरांवरून पहलगामच्या दरीत हलकेच उतरली होती. हिमाच्छादित शिखरांना आणि त्याखालच्या गर्द हिरव्या डोंगररांगांना त्यांनी सोनेरी झळाळी दिली होती. वरची आभाळनिळाई, हिमशिखरांची धवलशुभ्रता, खालच्या देवदारवृक्षांची गर्द हिरवाई आणि या सार्‍यांमध्ये ईश्वराने ओढलेले हलके सोनेरी फटकारे… अश्रद्धाच्याही मनात श्रद्धेचे अंकुर पेरील असे ते दैवी दृश्य त्या अज्ञात शक्तीपुढे नतमस्तक करीत होते. पहलगाम भेटीची सुरूवात आम्ही केली ती तेथील मम्मलेश्वराच्या दर्शनाने.
पहलगामच्या मुख्य बाजाराच्या समोरच लीडार नदीच्या पलीकडच्या डोंगरावर मम्मलेश्वराचे हे अगदी छोटेसे प्राचीन दगडी मंदिर आहे. मात्र, येथील झरा आणि कुंड पाहताक्षणी या क्षेत्राच्या पावित्र्याची खूण पटते. हे मंदिर अनेक शतकांपूर्वीचे आहे हे त्याची दगडी रचनाच सांगते. एकेकाळी राजा जयसिंहाने म्हणे त्याला सुवर्णालंकार दान केले होते. शंकर – पार्वती अमरनाथच्या गुहेकडे निघाले असता त्यांनी आपला नंदी पहलगामलाच ठेवला होता अशी आख्यायिका आहे. कदाचित या मंदिराशी त्याचा काही संबंध असावा.
छोटेसे पण सुंदर पहलगाम
मम्मलेश्वराच्या मंदिरासमोर सारे पहलगाम दोन – तीन कि. मी. परिसरात सामावले आहे. चोहोबाजूंनी उंच उंच पर्वतरांगा, मधून वाहणारे लीडारचे झोकदार पात्र आणि तिच्या पलीकडच्या किनार्‍यावर पहलगामची छोटीशी बाजारपेठ. लीडार नदीच्या एका तीरावर सुरेख उद्यान निर्माण करण्यात आले आहे, जे या परिसराची शोभा वाढवते. येथली पहाट आणि संध्याकाळ विलक्षण सुंदर असते. निळसर गूढ प्रकाश सर्वत्र भरून राहिलेला असतो. लीडारचे पात्र समोरून खळखळत असते आणि चोहोबाजूंनी उंच उंच पर्वतशिखरे निसर्गाचे विराट दर्शन घडवीत असतात.
खुद्द पहलगामचा विस्तार फार नाही. जेमतेम दोन – तीन कि. मी. अंतरात बाजारपेठेतच सारे सामावले आहे. पहलगामचे खरे नाव म्हणे पहलगाव. मेंढपाळांचा हा गाव. त्यांनीच कधीकाळी वसवला. पहिल्यांदा येथे वस्ती झाली म्हणून पहला गॉंव – पहलगॉंव – पहलगाम अशीही नावाची एक उपपत्ती सांगितली जाते. पहलगाची छोटीशी बाजारपेठ फुटकळ खरेदीसाठी योग्य आहे. काश्मिरी कशिदाकारीचे कपडे, शाली, पिशव्या वगैरे येथे स्वस्तात मिळते. येथे पेपरमॅशेच्या वस्तूही मिळतात. कागदापासून बनल्या असल्या तरी त्या अत्यंत टिकाऊ असतात. त्यावरील नक्षीकाम जितके बारीक, तितके त्या वस्तूंचे मोल अधिक. मांजराच्या मिश्या कापून त्या सूक्ष्म केसांपासून या पेपरमॅशे उत्पादनांवरील अत्यंत नजाकतदार बारीक कलाकुसरीचे रंगकाम केले जाते.
पहलगामसंदर्भात एक धोक्याचा इशारा द्यायलाही हरकत नसावी. येथील सर्वच हॉटेलांचा दर्जा तेवढासा चांगला नाही. कडक पर्यावरणीय बंधनांमुळे नवी हॉटेल बांधायला परवानगी नाही आणि जी आहेत, त्यांनाही नव्याने बांधकाम वगैरे करता येत नाही अशा कचाट्यात पहलगामचा पर्यटन उद्योग सापडला आहे. आहेत ती बहुतेक हॉटेल्स पूर्ण बेकायदेशीर आहेत आणि धोकादायकही आहेत. आम्ही राहून आलो त्याच्या पुढच्याच आठवड्यात पहलगाममध्ये बाजारपेठेत भीषण आग लागली आणि कित्येक हॉटेल्स जळून खाक झाली.
पहलगामचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर थोडे आत जायला हवे. बैसरन आणि दबियॉं, आरू खोरे, बेताब खोरे, चंदनवाडी या सार्‍या परिसरामध्ये अगदी निवांत फेरफटका मारण्यासारखे दुसरे सुख नाही. विशेषतः बैसरन आणि दबियॉं ही तर अत्यंत अप्रतिम ठिकाणे आहेत. बैसरनला मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते आणि ते नाव शब्दशः सार्थ आहे!
बैसरन चुकवू नका
बैसरन, दबियॉं, काश्मीर व्हॅली, करगिल व्हॅली, पहलगाम व्हॅली अशी विविध टप्प्यांची सफर करायची तर आपल्यापाशी घोडे हवेत. येथे घोडेवाले त्यासाठी तयार असतात. त्यांचा दरही निश्‍चित केलेला आहे, त्यामुळे फसवणुकीची शक्यता नाही. ज्यांना घोड्यावर बसण्याचा सराव नाही, किंवा ज्यांच्यापाशी शारीरिक लवचिकता नाही त्यांनी या भानगडीत न पडणे श्रेयस्कर, पण जे घोड्यावर बसून रपेट करू शकतात त्यांनी पहलगाममध्ये येऊनही बैसरन आणि दबियॉंची ही स्वर्गीय सफर न करणे यासारखी शोकांतिका नाही. घोडे अथवा खेचरे आपल्याला घेऊन जातात तो डोंगराळ मार्ग बराच अवघड असला, सरळसोट उभा चढ असला, तरी भोवतालचा परिसर अतिशय सुंदर आहे.
गुडघा गुडघा चिखलातून ही खेचरे किंवा घोडे पर्यटकांना बैसरनकडे घेऊन जातात, तेव्हा बाजूची खोल खोल दरी भिवविते खरी, पण घोड्यावर आपला विश्वास हवा. या घोड्यांना ना फार वाईट खोड असते. ते नेमके दरीच्या दिशेने टांगा टाकत असतात. चुकून त्याचा पाय सटकला तर? ही भीती आपल्याला निसर्गसौंदर्याचा नीट आस्वादही घेऊ देत नाही! घोड्यावर बसणे, त्याचा लगाम वापरणे हीही एक कला आहे. आधी त्याच्यावरची मांड भक्कम हवी, कारण कधी तो पळू लागेल, कधी इकडे तिकडे वळू लागेल सांगता येत नाही. घोड्याला डावीकडे वळवायचे असेल तर त्याचा डावा लगाम आणि उजवीकडे वळवायचे असेल तर उजवा लगाम थोडासा खेचायचा. त्याला थांबवायचे असेल तर दोन्ही बाजूंनी त्याचा लगाम गच्च खेचून घेतला की त्याला ब्रेक लागतो! पण शेवटी तो घोडाच! ते यांत्रिक वाहन थोडेच आहे!! त्याच्या मनाचा तो राजा!! पण घोड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असते. या प्रत्येक घोडेवाल्याकडे दोन दोन घोडे असतात. पहिला घोडा दुसर्‍याचा पार्श्वभाग हुंगत निमूट मागून चालत जातो!! त्यामुळे घोडेवाल्याच्या हाती एकाच घोड्याचा लगाम जरी असला तरी दुसरा घोडा पुढच्या घोड्याच्या मागून येणार हे ठरलेले!
पहलगामहून पर्यटकांची ही वरात बैसरानकडे निघते आणि भोवतीच्या अप्रतिम निसर्गाने आपण हरखून जातो. आम्ही गेलो तेव्हा तर छोट्या छोट्या रानफुलांचा सडाच हिरवळीवर पसरलेला. पांढर्‍या रंगाची ही छोटीशी फुले, पण त्यांनी वातावरणालाच दैवी सौंदर्य बहाल केलेले. दरीतून वर आलेले देवदार, वरचे निळेभोर आकाश, खाली विस्तीर्ण पसरलेली हिरवळ आणि थंडगार वार्‍याच्या झुळुका… काळ जणू येथे गोठला आहे. बाकी विश्वाच्या भौतिक प्रगतीची चाहुल येथे लागलेली नाही. केवळ आहे तो सोहम् निसर्ग!
घोडे उभा चढ चढत असताना घोडेवाला त्यांना थांबवतो. हे दिसतेय ते पहलगाम खोरे.. त्याच्या बोटाच्या दिशेला आपली नजर वळते. झाडांच्या कोंदणातून दूरवर छोटुकली घरे दिसतात. क्षणभराच्या विश्रांतीनंतर घोडे पुन्हा चढ चढू लागतात. एक वळण घेऊन आपण आता डोंगराच्या दुसर्‍या टोकाला आलेलो असतो. ते दिसतेय ते काश्मीर खोरे. दरीत दूरवर चकाकणारे पाणी दिसते. काही घरे दिसतात. तो पहाड दिसतोय तो कारगिलचा पहाड. दूरवर एक हिमाच्छादित सुळका दिसतो. तोच टायगर हिल असावा असे आपण मानून चालतो. मनातले कारगिल जागे होते. ते दिशाहीन फेकले जाणारे तोफगोळे, आपल्या सैनिकांची जिगर, तो पहाड चढून जाण्याचे त्यांनी पेललेले आव्हान, तेव्हाचे हुतात्मे. त्या वीरांच्या शवपेटीवरही दलाली कमावणारे भडभुंजे, त्यांच्या विधवांचा भूखंड गिळंकृत करणारे राजकारणी… सारा पट आपल्याला सुन्न करतो.
थोडीसी उदासीही येते मनावर. पुन्हा घोडे चढ चढू लागतात. एव्हाना आपण एका छोट्याशा सपाट मैदानात आलेलो असतो. हे दबियॉंन. तेथे खाली उतरून थोडी विश्रांती घेतली जाते. पुन्हा पुढची मजल दरमजल सुरू होते. आता शेवटचा मुक्काम असतो बैसरन.
बैसरनला आपण येतो आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. समोर पसरलेले असते एक विस्तीर्ण हिरवेगार कुरण. त्याच्या एका बाजूने खळाळणारा स्फटिकवत् झरा. त्याच्या कडेने रांगेत उभे असलेले देवदार आणि इतर हिरवेगर्द वृक्ष आणि पलीकडे हिमाच्छादित डोंगरांची भरभक्कम रांग. स्वित्झर्लंडची खरोखरच आठवण करून देणारे हे मिनी स्वित्झर्लंड आपल्याला गुंग करून सोडते. तेथील कुरण खराब होऊ नये म्हणून पुढे घोडे न्यायलाही बंदी आहे. वाहने तर येण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे निसर्गाच्या या अप्रतिम कारागिरीच्या मोहात येथे तासांची मिनिटे होतात आणि मिनिटे सेकंदाच्या गतीने पळू लागतात. पहलगामला येऊन बैसरनला आला नाहीत, तर पहलगामला येणे व्यर्थच आहे!