प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – वार्धक्य –

0
386

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

माणसाच्या जीवनात वार्धक्य ही कुणालाही नको असलेली गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटते की आपले मरण वार्धक्याअगोदर यावे. आजकाल मरणाचे वय वाढलेय. नवीन नवीन औषधांचा शोध लागलेला आहे. सुधारित आरोग्य कसे जगावे याचे धडे शिकवले जातात. स्वतःच्या आरोग्याविषयी मानव चिंता करु लागलेला आहे. खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत.
१९५० साली मानवाचे जगण्याचे वय ४६ होते… आज ते ७० वर पोचले आहे. तर २०८० साली जगात २१% लोक ६० वर्षे वयाच्या वर असतील. त्याचा अर्थ असा की ६० वर्षांवरील लोकांची संख्या – १४ वर्षांवरील संख्येपेक्षा वर असणार. म्हणजे म्हातार्‍या लोकांची गर्दी वाढणार. या वयातल्या लोकांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त असते.वार्धक्य येणे ही एक नैसर्गिक बाब आहे. जीवन हे स्त्रीबीजाचे पुरुषबीजाबरोबर संयोग झाल्यानंतर ते उदरात आपला जीव धरते त्या क्षणापासून – मग जन्म – बालपण – तारुण्य – म्हातारपण – वार्धक्य – शेवटी मरण!
वार्धक्य हे बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते- जात, सांस्कृतिक परिस्थिती, भौगोलिक प्रदेश, जीवनशैली, पुरुष-बायकांमधला फरक, राहणीमान, ग्रामिण वा शहरी भाग, आरोग्याविषयी माहिती या सगळ्या गोष्टी माणसाला वार्धक्य कशाप्रकारे यावे हे ठरवतात.
यातल्या पुष्कळ गोष्टी माणूसच ठरवतो. मुलाच्या जन्माअगोदर, मूल आईच्या उदरात असतानाच आईचे जेवण कसे असावे हे निश्चित झाल्यानंतर व त्यावर पद्धतशीर अंमलबजावणी केल्यावरच सुदृढ मूल जन्माला येते. मग त्याला कितीही दूध पाजले किंवा नानाप्रकारची टॉनिक दिलीत तरी ते मूल आपल्या जन्माबरोबरच आपली वाढ ठरवून आलेले असते. या विधानात थोडे फेरफार होणे शक्य आहे. त्याचबरोबर वार्धक्य कशाप्रकारे यावे हेही माणूसच ठरवतो व वार्धक्याची तयारीही त्याने आपल्या ऐन तारुण्यातच करायला हवी.
वयोमानाप्रमाणे येणार्‍या प्रत्येक अवस्था या कशा जगल्या याची माहिती व ते समजून त्यावर अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे आहे.
बाल्यावस्था किंवा बालपण आपले आपण कसे उपभोगले यावर आपला अंकुश राहत नाही – ते आपल्या हातात नसते. तारुण्या तर उडत, मजेत जाते. ते कसे जगावे यावर विचार करायला वेळच मिळत नाही. पौगंडावस्था तर शरिरावर एवढे परिणाम करते की शरीरात उठणार्‍या लहरी थोपवता थोपवता रात्री-दिवस-वर्षे निघून जातात. शिक्षणात कितीतरी वर्षे निघून जातात.
आपली शारीरिक वाढ कशी होते.. यावर पुढचे येणारे जीवन व मग वार्धक्य अवलंबून असते. तारुण्यात शरीराची काळजी, जोपासना करणे गरजेचे आहे.
* नाना प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे.
* व्यायाम करणे.
* चांगला पौष्टीक आहार सेवन करणे.
* स्वच्छ हवेत राहणे.
* आपले राहणे पद्धतशीर बनवणे.
* आपल्या जीवनाची उद्दिष्टे ठरविणे.
या सर्व गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे कारण यावर येणारे वार्धक्य ठरत असते.
व्यसने जोपासणारा माणूस रोगाने मरणारच. मरण नाही आले तरी नाना प्रकारच्या व्याधी त्याला जडणारच. शरीर कृश असेल तर मग नैसर्गिक व्याधी त्याला घेरणारच!
वयोमानाप्रमाणे शरीर हे झिजणारच. वयाबरोबर शरीर हे थकणार व हळूहळू एकेक निरोगी माणूस नाना प्रकारच्या व्याधींनी घेरला जाणारच.
वार्धक्यात काय होते?–
* रक्तदाब वाढतो. मधुमेह होतो. हाडांचे सगळे विकार उद्भवतात. कॅन्सरचे प्रमाण वाढते. डोळे व कान आपले काम कमी करतात. मेंदूची झिज होते. आपले वार्धक्य – म्हातारपण कसे असावे हे आपणच ठरवतो. किंबहुना आपल्या तारुण्याचा काळच ते ठरवत असतो. तारुण्याचा बहर चढलेला असताना – येणार्‍या म्हातारपणाचा विचार तरी आपण करू शकतो का? कुणी करतो का? मी केलाय का? नाही ना केला, मग त्याचे फळ भोगायला तयार रहा.
आपल्याला जीवनात आरोग्यसंपन्न दिवस काढायचे असतील तर… वार्धक्यात चांगल्या प्रकारे जगायचे असेल तर आपण काय करावे?…
– पहिल्यांदा हे बघायचे की म्हातारपणातल्या व्याधी कोणत्या आहेत? म्हातारपण म्हणजे शरीराची झीज- प्रत्येक अवयवाचे थकणे. त्यात सर्वप्रकारचे अवयव आलेत– ते म्हणजे हृदय, मुत्रपिंड, जठर, स्वादुपिंड, हाडे, गुडघे, मेंदू, कान, डोळे…! व त्यांच्या थकण्याबरोबरच मग त्या त्या व्याधी आल्यात. त्यात जर तुम्हाला विकार किंवा रोग आधीच जडले असतील तर मग त्यात आणखीन भर!
आता आयुष्याचा शेवट चांगला व्हावा अशी आपली प्रामाणिक इच्छा असेल तर आपण काय करावे?…
म्हणजे आपल्याला कुठलाही रोग होता कामा नये.
– हल्ली रक्तदाब वाढला, हृदयविकार, मधुमेह यांची चलती आहे. त्याकरिता काय करावे..?
* ऐन तारुण्यात डोके शांत राखायला शिका. तरुणपणी हृदयविकाराने मरणार्‍यांचे प्रमाण वाढलेय. हृदय चांगले ठणठणीत आहे, रक्तदाब नॉर्मल, कोलेस्ट्रॉल नॉर्मल, ई.सी.जी. नॉर्मल… तरीही टेन्शनमुळे (कामावरच्या) अचानक हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी आकुंचित होते.. ब्लॉक होते. हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडतो. तरुण पोरगा ऐन तारुण्यात… वयाच्या तिशीतच दगावतो… डोके शांत ठेवा. योगा करा. दिवसाला दोन वेळा १५-१५ मिनिटे शांत रहा, आत्मचिंतन करा.
* कुठलेही व्यसन बाळगू नका. व्यसनांचा रीतसर पाढा मी वाचणार नाही. परस्त्रीगमनही टाळा. कारण एकदा तुम्ही एड्‌सग्रस्त झालात तर संपलात. व्यसनात दारुचे व्यसन हे घातक आहे. प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा आपला क्षीण घालवण्यासाठी थोडी तरी दारू पितोच. दारु न पिणारा तंबाखू खातोच. तंबाखू न खाणारा – सिगारेट ओढतो – तपकीर ओढतो. हे सगळेच करतात असे नाही. हल्ली कॉलेजकुमार नि कुमारिकाही मादक पदार्थांचे सेवन करतात. केरी-सत्तरी या गावात गावकर्‍यांना अफू-गांजा विरोधी मोर्चा काढावा लागला हे कटू सत्य आपल्यासमोर आहे. तेव्हा हे सगळे तुम्ही करत असाल तर फसाल. पछतावाल व म्हातारपणात हे सगळे आठवून तुम्ही झुरून झुरून मरून जाल..!
वयोमानाप्रमाणे आजच्या जगात चाळिशी गाठलेला माणूस स्वतःची डॉक्टरी परीक्षा करवून घेतो… रक्तदाब तपासून घेतो… इतर परीक्षा करवतो. रात्रीचा भात जेवत नाही… जास्त गोड पदार्थ खात नाही… चहामध्ये साखरपण घालत नाही. कुठलीही व्याधी जडलेली नसताना दैनंदिन व्यवहार चोख ठेवतो. जर कुठलाही आजार होण्याची चिन्हे दिसली तर त्यावर उपाययोजना चालू ठेवतात. व्यायाम, योग करणे गरजेचे आहे.
प्रापंचिक दगदग, कामाचे ओझे, जीवनातील नित्याचे चढउतार यांच्याशी कलाने घेत माणूस आपले जीवन जगतो. भारतातील ६०% वर जनता गावात राहते व ती अशिक्षित आहे. केवळ सही करता आली म्हणजे जनता शिक्षित झाली असा गोड समज करू नये. त्यात वैद्यकीय अज्ञान हे तर शिक्षित – अशिक्षित लोकांत आहेच. मग हे सगळ्या लोकांना पटवून देणे .. पुढे येणार्‍या म्हातारपणाविषयी कौन्सेलिंग करणे शक्य आहे का? ज्याला आपली आजची फिकिर नाही.. तो उद्याचा विचारच करणार नाही. इथपर्यंत ठीक.. आता थांबतो.. प्रकरण पुढील अंकात चालू राहील..
क्रमशः