– डॉ. राजेंद्र साखरदांडे
शेवट इबोलाची त्सुनामी आलीच. पहिली केस तामिळनाडूमध्ये सापडली. पण त्याविषयी अधिकृत निर्वाळा दिला गेला नाही. तरीदेखील केव्हाही कुठेही मोठ्या शहरात इबोलाचा रोगी तिथल्या विमानतळावर उतरू शकतो.
मागे या सदरात मी लिहिले होते. जंगलातून हे व्हायरस गावांत पसरू लागलेत. नेहमीप्रमाणे याची सुरुवात अफ्रिकन राष्ट्रांमध्येच होते. कारण तिथे गरिबी इतकी वाढली आहे की तिथले लोक काहीही खातात. जंगलातून वटवाघुळापासून माकड, चिंपांझी, गोरिला या प्राण्यांपासून नवीन रोग जगात पसरायला लागलेत. त्यात पहिल्यांदा रॅबीज, मग एचआयव्ही-एड्स्, स्वाइन फ्लू, जापनीज एन्सेफेलायटीस व आता इबोला.
इबोलाचा पहिला रुग्ण सुदानमध्ये १९७६ मध्ये सापडला. वरचेवर या रोगाच्या केसेस आफ्रिकन राष्ट्रांत दिसू लागल्या. आत्ताचा वेस्ट अफ्रिकन इबोला व्हायरसचा उद्रेक डिसेंबर १३ मध्ये गिनीजमध्ये सुरू झाला. जगाला याची बातमी समजेपर्यंत मार्च १४ उजाडला. हा रोग हळूहळू पसरायला लागला. आता हे रोगी, गिनी, सियेरा, लिवोन, लायबेरिया, नायजेरिया या राष्ट्रांत सापडले. ऑगस्ट १४पर्यंत १७५० केसेस सापडले आहेत. त्यातले ९०० रोगी मरण पावले. या रोगाने मरणार्यांचे प्रमाण ५० ते ९०% आहे.
या रोगाला ‘इबोला व्हायरल डिसीज (इव्हीडी)’, ‘इबोला हिमोरेजिक फीवर’ असेही म्हणतात. हा रोग सस्तन प्राण्यांनाच होतो. हा व्हायरस भयानक आहे. त्याला ‘कॅटेगरी-ए – बायोलॉजिकल वेपन’ असे संबोधतात. हे जंतू वटवाघूळामध्ये सापडतात. ते त्याचा प्रसार करतात. ते त्या रोगाचे ‘नैसर्गिक भांडारं’ आहेत. त्यांना या रोगाची लागण होत नाही. या वटवाघुळांनी खाऊन टाकलेली फळे, तिथली माकडे, चिंपांझी, गोरिला खातात व हा रोग त्यांना होतो. ही ‘फ्रूट बॅट’ आफ्रिकन लोकांचे खाद्य आहे. ज्याप्रमाणे मोरी किंवा शार्क मासे आम्ही सुकवून खातो त्याचप्रमाणे वटवाघुळे सुकवून ठेवली जातात व मग खाल्ली जातात. मग ते खाणार्यांना हा रोग होतो.
या रोगाचा प्रसार कसा होऊ शकतो?…
१. या रोगाचे रोगी-प्राणी हाताळणार्यांना हा रोग होऊ शकतो. यामध्ये आरोग्य खात्यातील माणसे, पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टर वर्ग.
२. त्या रोगाने मरणार्या प्राण्यांची व रुग्णांची विल्हेवाट लावताना या रोगाचा प्रसार होतो.
३. रोगी प्राणी किंवा माणूस (मेलेला किंवा जिवंत) याच्या स्त्रावातून या जंतूंची लागण होते.
तेव्हा हे करताना विशेष पोशाख परिधान केले जातात आणि सर्वांची काळजी घेणे अनिवार्य ठरते. एकदा माणसांना या रोगाने ग्रासले की हा रोग माणसातून माणसात पसरला जातो. जे लोक या रोगाचे शिकार झालेत पण जिवंत आहेत त्यांच्या वीर्यापासून हा रोग २ महिन्यात पसरू शकतो.
या रोगाची लक्षणे कोणती?…
* ताप, घसा दुखणे, डोकेदुखी व स्नायुदुखी.
* उलटी, हगवण ही लक्षणे नंतर दिसून येतात.
* त्यानंतर रक्तस्राव होऊ लागतो. उलटीतून, थुंकीतून, हगवणीतून व हिरड्यातून रक्त येत राहते.
* यकृत व मूत्रपिंडाची क्षमता कमी होते.
* ५०% रुग्णांच्या अंगावर पुरळ येते.
* ४०-५०% रुग्णांना टोचल्याठिकाणी रक्तस्राव होतो.
* अंगावर लाल चट्टे पडतात, त्वचेखाली रक्त गोठते.
या रोगाचे निदान कसे होते?…
– रक्त तपासणी – इबेला व्हायरस अँटीबॉडीज.
– इबेला व्हायरस रक्तात सापडणे.
या रोगावरील उपचार…
या रोगावर उपचार नाहीत. रुग्णांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये ठेवले जाते.
त्यांना तोंडावाटे (ओआरएस) किंवा शिरेत (आयव्ही) पाणी व जेवण दिले जाते.
जर रक्तस्राव होत असेल तर रक्त देणे गरजेचे आहे.
या रोगावर केवळ हॉस्पिटलातच उपाय होऊ शकतो. लागण झालेल्या रुग्णांना दोन आठवडे वेगळे ठेवले जाते.
रोग होऊ नये यासाठी उपाययोजना…
* माकडांपासून दूर राहणे.
* डुकरांपासून स्वतःला दूर ठेवणे.
* प्राण्यांना हा रोग झाला की नाही याचा शोध घेणे.
* रोगी प्राण्यांना ठार मारून त्यांची यथासांग विल्हेवाट लावणे.
* रोगी प्राण्यांना किंवा रोगी माणसांच्या स्थानापासून स्वतःला दूर ठेवणे.
* वैद्यकीय साधन सामग्री स्वच्छ ठेवणे.
* सर्वव्यापी काळजी घेणे.
* सुरक्षा साधनं वापरणे.
* ग्लोव्ह्ज् घातल्याशिवाय, तोंडाला बांधल्याशिवाय रुग्णाकडे जाऊ नये.
* मयताला किंवा रुग्णाला हात लावू नये.
* हात जंतुनाशक औषधाने धुवावेत.
हे सर्व वाचल्यावर तुम्हाला आणखी दुसर्या कुठल्या रोगाची आठवण येते कां?… हो! जरूर येणार! तो रोग म्हणजे स्वाईन फ्लू. त्या रोगासाठी जेवढी खबरदारी घेणे गरजेचे आहे तेवढी गरज व तीच योजना हाही रोग रोखण्यास राबवली जाते.
जागतिक आरोग्य संघटना या संस्थेने जागतिक वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली आहे.
जगभर केली जाणारी उपाययोजना…
१. आफ्रिकन राष्ट्रात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. मग साफसफाईकरता तिथे पाणी आहे का? नाही. मग त्यावर उपाययोजना…
२. ती राष्ट्रे गरीब आहेत. तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पुढारलेल्या राष्ट्रांनी घ्यायची. नाहीतर या रोगाची लागण जगभर पसरेल.
३. त्या रोगग्रस्त राष्ट्रांना भरीव मदत देणे.
४. या रोगावर लस शोधून काढणे.
५. या राष्ट्रातून बाहेर पडणार्या प्रत्येक माणसाची वैद्यकीय चाचणी करणे. लक्षणे तपासणे.
६. या राष्ट्रामधून येणार्या विमानातील प्रवाशांची चिकित्सा करणे. रोगाची लक्षणे दिसली तर त्याला वेगळ्या ठिकाणी ठेवणे.
७. जगातील प्रत्येक विमानतळावर त्याकरता वेगळी योजना करणे.
८. भारतातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर तशी आरोग्यतपासणी केंद्रे स्थापित केली जावीत.
हे सर्व आमच्या भारतात किंवा गोव्यात शक्य आहे का? तुम्हाला एक महत्त्वाचे सांगतो, आमच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर जेव्हा त्यांच्या संरक्षकांनी गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांना कारमधून एम्स (दिल्लीतील हॉस्पिटल)ला नेण्यात आले. ऍम्ब्यूलन्स पण जवळपास नव्हती. त्यांच्या रक्तगटाचे रक्तही त्या हॉस्पिटलमध्ये नव्हते.
तेव्हा आमची… सामान्य जनतेची काळजी ती कोण करणार?.. भारत सरकार?.. गोवा सरकार?.. विसरा ते. स्वतःची काळजी स्वतः घ्या.
– आफ्रिकन देशांना भेट देऊ नका. मोठ्या पावसात बाहेरचा रस्ता सुळसुळीत झालेला असतो.. त्यावर चालायला गेले तर घसरून केव्हा पडलो व हात केव्हा मोडला ते कळणार पण नाही. तेव्हा घराबाहेर फिरायला जाणे नाही.. ज्येष्ठ नागरिकांनी तर अजिबात नाही.
स्वतःची काळजी घ्या.
इबोलाची सुनामी येणार आहे. तयार रहा.. आग लागण्याअगोदरच विहीर खणून त्यांत भरपूर पाण्याची सोय अगोदरच करून ठेवलेली बरी.
स्वतः तयार रहा! स्वच्छ रहा! देव तुमचे सर्वांचे बरे करो!
………………………………………………………..