प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा 

0
180

(भाग – २)

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

शुभ सकाळ! मागील लेखात मी गरोदरपणाची तयारी करा, कामाला लागा… असे म्हटले म्हणून ‘तयारीला लागलात का?’ मुलीने शारीरिकरीत्या तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. तशी तयारी मुली करतात का?

तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या दिनचर्येची विचारपूस करा. थोडा वेळ त्याकरता काढाच. कॉलेजात, शाळेत जाणारी मुले सकाळी लवकर उठत नाहीत. उशिरा उठून आपली कामे करून जेव्हा ती कॉलेजात किंवा नोकरीला जातात तेव्हा ते नाश्तापण घेत नाहीत. तेव्हा त्यांचा नाश्ता काय असावा यावर आईने थोडा विचार करावा… त्यांना दूध, अंडी, सँडविच, ब्रेड-बटर, तूप, लोणी व फळे द्यावीत. पण हे त्यांच्या पोटात कधीच जात नाही. दुपारच्या वेळेला कँटीनमध्ये तेच खाणे. परवा एका कॉलेज कँटीनमध्ये खाण्याचा योग आला तर समोसा तेलात बुडवून काढलेला. कँटीनवर कॉलेजमार्फत कुणाचेही नियंत्रण नव्हते. कँटीनमध्ये मिळणार्‍या खाण्याच्या वस्तू कुणी खाऊन बघितल्या का? त्यांच्या किंमतीवर कुणाचा अंकुश आहे का?
त्यांतच आजकाल शरीर नाजूक व डौलदार बनवण्याचा नखरा चालू आहे. कॉलेजातील मुलींचे वजन सरासरी ४० किलो..! कितीतरी तरुणी ३८ किलो वजनावर. ज्याप्रमाणे तुमचे शरीर त्यानुसारच तुम्हाला मूल होईल..! अडीच किलोच्या खाली..! मग त्याच्या बालपणात दर महिन्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणार का? कारण कमी वजन म्हणजे बालकाची प्रतिकारशक्ती कमीच..! स्वतःच्या अंगकाठीचा विचार करता करता… मुलाच्या डौलकाठीचा पण विचार करा म्हटले!
मुलाला हटकायचे, पटवायचे, राजी करायचे म्हटल्यावर … थोडे मुरकणे, थिरकणे हे आलेच. असो. तेव्हा करियर बनवताना आपल्या आहारावर लक्ष ठेवा. नाहीतर आताची मुले हुशार, पण शारीरिकदृष्ट्या कमजोर असून चालणार नाही.
आता तयारी जोडीदार निवडायची. तुमचा जोडीदार तुम्ही निवडा. हल्ली ही निवड जास्त महागच पडते. समाजात आजकाल भुकंप घडताहेत. सामाजिक व्यवस्थेस कुणाची तरी दृष्ट लागलेली आहे. ते असो. विषय तो नाही. पूर्वी मुला-मुलींची कुंडली जमवायचे व गुण बघून, नाडी बघून लग्ने जुळवायची. आता अशीच बागेत, कॉलेजात, सिनेमा हॉलमध्ये, पिकनिकला लग्न जमवली जातात. थोडातरी खर्च वाचला म्हणायचा!
परवा वाचनात आले. सुप्रीम कोर्टने निकाल दिलाय. मुला-मुलींच्या आरोग्यासंबंधी लग्नाअगोदर परीक्षण व्हायला हवे. नाहीतर पुढे मुलीच्या आयुष्याला धोका आहे. अहो राव, मी चार पावले पुढे जाऊन म्हणेन मुलाला पण धोका आहे. समाजात स्वैराचार केवढा वाढलाय? तुम्ही ऐकताय ना, बघताय ना! तेव्हा एचआयव्ही स्टेटस जाणून घ्यायचा पण अधिकार आहे म्हणायचा.
एका मुलाला त्याच्या सासर्‍याने मुलीविषयी पूर्ण माहिती दिल्याशिवाय लग्न केले. पहिला मुलगा झाला… महिन्यानंतर मरण पावला… दुसर्‍या वेळी गर्भपात झाला. वैद्यकीय परीक्षणानंतर असे कळले की मुलगी म्हणजे आई ही थॅलॅसेमियाची (एक प्रकारचा ऍनिमिया) केस आहे. आता त्याला दोन मुली आहेत व त्या या रोगाचा पुढे प्रसार करणार. पुढे या मुलींचे लग्न होऊ शकणार का? आईवडिलांनी त्या मुलींचे लग्न करावे का? आताच्या जगात हे सगळे करावे का? का हे सर्व बघून मगच लग्न करावे? कुणीतरी म्हटले होते, ‘‘प्रेमात पडल्यावर कुंडली बघायची गरजच ती काय? मने जुळली म्हटल्यावर कुंडल्या जुळल्या. असे खरे असते का?
चला जोडीदार सापडला. आता ठरवा मूल केव्हा होऊ द्यायचे? मला आश्‍चर्य वाटते, काही जोडपी निश्‍चित तारखेला मुलाला जन्म देतात. अगदी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला! खरे असते का? विचार करा. कुणी डॉक्टर मला सांगायला लागला…(स्त्री तज्ज्ञ) तुम्हाला मुलगा हवाय ना, मला भेटा. असेही असू शकते का? विचार करा, नेटवर चला. डॉक्टरी सल्ल्याअगोदर नेटचा सल्ला घ्या.
आता झोपण्याची खोली सजवा. चांगले गोरे गुटगुटीत हसरे मूल हवेय… तज्ज्ञांची भेट घ्या. सल्ल्यानुसार खोलीला रंग द्या. बेडसमोरचा रंग महत्त्वाचा आहे. एकदा मी एका ‘गृह प्रवेश’च्या कार्यक्रमाला गेलो होतो. यजमानाने मला संपूर्ण घर दाखवले. दिवाणखान्यात टिव्ही मागे भिंतीवर भडक रंग… बेडरूमवरही बेडच्या समोरचा रंग लालभडक, डोळ्यांवर अत्याचार. चंद्र, तारे.. सारे नभोमंडळ कसे चकचकत होते. म्हणजे काळोखात आपण अगदी आकाशाखाली निसर्गरम्य वातावरणात मृगया करतोय. ते भयावह रंग आपल्यात कुठल्या लहरी तयार करतील? कुठले विचार करून आपण रतिशय्या करणार आहोत? ध्रुतराष्ट्र आंधळा का झाला याची कारणे शोधा. ‘मेरी सुरत तेरी आँखे’ मधला नायक काळा निग्रो का बनला? जाणा…! बायकोबरोबर संग करताना नवर्‍याने कसे असावे..? हे जाणून घ्या. संतापलेल्या नवर्‍याने, रागाच्या भरात बायकोशी संग केला. व त्याने निर्माण झालेली संतती कशी असेल हा वेगळाच विषय आहे. खोलीत गुटगुटीत मुलांचे फोटो लावले म्हणून ४० किलो खाली वजन असलेल्या मातेपोटी गुटगुटीत बाळ जन्माला येऊ शकत नाही. रंगाने सावळी असलेल्या जोडप्याला गोरे मूल होऊ शकत नाही! तसे आईबापाचेच रक्तगट घेऊन मुले जन्माला येतात. समाज दूरदर्शन मालिका घडवत नाही, आम्ही घडवतो.
शास्त्र सांगते… मुलीला आई व्हायचे असेल तर…..
१. तिचे वजन ४० ते ४८ किलो असायलाच हवे.
२. तिचे हिमोग्लोबीन १२ च्यावर असायला हवे.
३. दररोज तिने व्यायाम केले पाहिजे.
४. भरपूर पाणी प्यायले पाहिजे.
५. सदैव आनंदी राहिले पाहिजे.
यातील किती गोष्टी तुम्ही कराल म्हणजे चांगला गर्भ तुम्ही धारण करू शकाल? खरे तर आजच्या मुलामुलींनी… नवरा-बायकोंनी यावर विचार मंथन जरूर करावे.
आजच्या युगात जास्त करून दर कुटुंबात एकच मूल असते… मग ते मूल मुलगा असो किंवा मुलगी… खरे ना? समाजात जन्म घेणारी मुले कशी असावी हे त्याचे आईवडिल ठरवतातच पण समाजही त्याची नोंद घेतो. त्यावर लक्ष ठेवतो. ठेवायला हवे, असे असते. त्याचे नियोजन कोण व कसे करणार यावर चर्चा व्हायला हवी. जेवणावर जर महोत्सव साजरे होतात तर समाजात घडणार्‍या बदलावर समाजाने मुग गिळून उगी बसावे, असे होत नाही.
कुटुंबात जन्म घेणार्‍या बालकाविषयी त्याची गर्भधारणा व्हायच्या अगोदर जर त्यावर विचार झाला तर बरे की नाही? विचार थोडा हटके आहे. आता जोडीदार निवडला… मूल केव्हा व्हावे ते ठरले.
आता मुलाला जन्म देण्यासाठी आईमध्ये मानसिकता बनणे महत्त्वाचे आहे का? आजकाल गर्भारपण लादणे जणु अशक्यच आहे. पूर्वी ते लादले जायचे. आजची स्त्री ऑफिसात जाते, काम करते. ती व तिचा नवरा ठरवतात… यंदा मूल व्हायला हवं. ती मानसिकता त्या स्त्रीच्या मनी तयार होणे गरजेचे आहे. पुष्कळदा पाळणा पुढे ढकलण्याच्या विचारात जी कुटुंबनियोजनाची साधने आम्ही वापरतो ती फेल होतात. गर्भधारणा घडते. मूल नको असेल तर गर्भपात घडवला जातो, गर्भाचे लिंगनिदान झाले, मुलगी असेल तर विचारूच नका. असे घडता कामा नये. आम्ही एवढे पुढारलेले नाही. अमेरिकेत लिंग निदान केले जाते… आईवडलांची इच्छा असेल तर त्यांना ते कळवले जाते. इथे ते कायद्याविरुद्ध आहे. कालच मला एसएमएस आला.. महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टरला चक्क गोळी घातली, कारण त्याने लिंग निदान केले नाही म्हणून..! यावर तुम्ही काय म्हणाल? सरकार काय म्हणेल..? व काय करेल..?
आजच्यापुरते एवढेच. कुणालाही शंका असल्यास जरूर विचारा. वैयक्तिक काही असेल तर निश्‍चितच फोन करा. स्वतःला जपा!
…………………………