राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनिशी त्यांच्या व्यवस्थापनाचा फार मोठा पेच सरकारसमोर उभा असताना वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये ग्रामपंचायतीने स्वतःहून कोविड रुग्णांसाठी सुसज्ज सुविधा निर्माण करून जो आदर्श समोर ठेवला आहे, तो सर्वांसाठी अनुकरणीय ठरावा. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मधु घोडकिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियोळ पंचायतीने गावच्या कोविड रुग्णांसाठी पंचायत सभागृह तर उपलब्ध करून दिले आहेच, शिवाय तेथेच त्यांच्या देखभालीची सोयही आरोग्य खात्याच्या कर्मचार्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शरीरातील प्राणवायूचे प्रमाण तपासणार्या पल्स ऑक्सिमीटरपासून पीपीई कीटस्पर्यंत सर्व सुविधाही तेथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. कोरोना रुग्ण म्हणजे एखादी अस्पृश्य गोष्ट असल्यागत त्यांच्याशी अन्यत्र व्यवहार होत असताना एखाद्या ग्रामपंचायतीने स्वतःहून पुढाकार घेऊन किमान स्वतःच्या गावातील रुग्णांसाठी अशा प्रकारची सुविधा निर्माण करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग गावडे, सर्व पंच सदस्य आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. घोडकिरेकर यांचे आम्ही त्यासाठी जाहीर अभिनंदन करतो.
आपली गावे स्वयंपूर्ण व्हावीत असे स्वप्न या देशामध्ये कैक वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी पाहिले होते. शहरातील तरुणांना खेड्यात चला अशी हाकही त्यांनी त्यासाठीच दिली होती. प्रत्येक शिक्षिताने आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या गावाला करून दिला, तर त्यातून गावे स्वयंपूर्ण होतील आणि अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितता यांच्या विळख्यातून मोकळी होतील अशी गांधीजींची धारणा होती. पंचायतराज कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात आला तेव्हाही ‘स्थानिक स्वराज्या’ची संकल्पना हा त्याचा पाया गृहित धरण्यात आला. ती प्रत्यक्षात उतरवता आली असती, तर एव्हाना देश कुठल्या कुठे जाऊन पोहोचला असता.
सध्याच्या कोरोना फैलावाच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये नकारात्मकता वाढत चालली आहे. एखाद्याला कोरोना संसर्ग होणे म्हणजे त्याने काही तरी फार मोठे पाप केल्यागत त्याला वागविले जाते. त्याला व त्याच्या कुटुंबाला जवळजवळ वाळीत टाकले जाते. खरे तर कोरोनाचा विषाणू कधी कोणत्या प्रकारे एखाद्या कुटुंबात शिरकाव करील हे सांगता येणार नाही एवढे त्याचे सूक्ष्म स्वरूप असते. त्यासाठी त्या व्यक्तीकडून बेफिकिरीच व्हायला हवी असे नाही. अपघातानेही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाबाधिताकडे तुच्छतेच्या नजरेतून पाहणे आणि ही घाण आपल्या गावी नको असा पवित्रा घेऊन दूर राहणे ही जी काही वृत्ती गावोगावी दिसून येते आहे ती मुळीच समर्थनीय नाही. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासही विरोध व्हावा – त्यांच्या नातेवाईकांकडूनच नकार दिला जावा – यासारखी अमानुष बाब दुसरी नसेल. अशा रुग्णांवर सर्वतोपरी खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे त्यातून संसर्ग पसरेल ही भीती अनाठायी आहे.
गोव्यामध्ये सरकारने रुग्णसंख्या वाढू लागताच कोविड केअर सेंटर्स उभारणीची तयारी करताच गावागावांतून त्यांना विरोध होऊ लागला. तेव्हा अशा केंद्रांना विरोध करू नका असे आवाहन आम्हीच सर्वप्रथम जनतेला केले होते. आजही अशा प्रकारची केंद्रे उभारण्यास ठिकठिकाणी विरोध होतो आहे आणि काही ठिकाणी तर सरकारने ताब्यात घेतलेली कोविड केंद्रे लोकप्रतिनिधींच्याच दुराग्रहामुळे रद्द करणे सरकारला भाग पडले आहे. गावामध्ये एखादे कोविड केअर सेंटर उभे राहिले तर त्यातून आपल्या गावात हा संसर्ग पोहोचेल ही अनाठायी भीती जनतेच्या मनामध्ये आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारे गावामध्येच एखादे कोविड केअर सेंटर उभे राहिले तर उद्या गावात कोरोनाचा फैलाव झाला तर तेथील रुग्णांना गावातल्या गावात आणि वेळीच उपचार मिळू शकतील.
सध्या कोविड केअर सेंटर्सच्या अपुर्या संख्येमुळे, तेथील अपुर्या खाटांमुळे, अपुर्या रुग्णवाहिकांमुळे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडूनही आरोग्य खात्याला त्याची योग्य व्यवस्था लावण्यास फार विलंब होताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनासारख्या घातक विषाणूच्या फैलावाला अटकाव करण्यासाठी एखादी ग्रामपंचायत स्वयंस्फूर्तपणे पुढे येते हे कौतुकास्पद आहे. प्रियोळचा आदर्श इतरांनी स्वीकारावा आणि गावोगावी अशा सुविधा उभारण्यासाठी पुढे व्हावे. कोविडविरुद्धचा लढा हा केवळ सरकार लढू शकणार नाही. त्याला जनतेचीही सक्रिय साथ हवी आहे!