>> लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरण; पोलिसांकडून ११ जणांविरुद्ध एफआयआर
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना काल पोलिसांनी अटक केली. कलम १४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियंका गांधी यांना अटक केली आहे. तसेच राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांच्यासह ११ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रियंका गांधींच्या अटकेनंतर कॉंग्रेस नेते आक्रमक झाले असून, राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे पाच सदस्यीय शिष्टमंडळासह लखीमपूर खीरीमध्ये आज भेट देणार आहेत.
लखीमपूर खीरी हिंसाचार घटनेतील शेतकरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या प्रियंका गांधी यांना सोमवारी पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आली.
प्रियंका गांधींना पहाटे ४.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. कुठल्याही महिलेला सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर अटक करण्यात येत नाही. विशेष म्हणजे पुरुष पोलिसांनी त्यांना अटक केली. हा सर्व प्रकार बेकायदेशीर आणि लाज आणणारा आहे, अशी टीका कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केली.
प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या अटकेनंतर कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे. जर उद्यापर्यंत (६ ऑक्टोबर) प्रियंका गांधींची पोलीस कोठडीतून सुटका केली गेली नाही, तर पंजाब कॉंग्रेस उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीच्या दिशेने मोर्चा काढेल, असा इशारा नवज्योतसिंग सिद्धू यांनी काल दिला.
… तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन : अजय मिश्रा टेनी
मी वारंवार माझी बाजू मांडतोय. मी किंवा माझा मुलगा घटनास्थळावर नव्हतो, हे दर्शवणारे पुरावे माझ्याजवळ आहेत. घटनास्थळी माझ्या मुलाच्या उपस्थितीचा एकही व्हिडिओ कुणी दाखवला, तर मी आताच मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी दिले आहे.
छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांचा
विमानतळावर ठिय्या
प्रियंका गांधी यांची भेट घेण्यापासून पोलिसांनी रोखल्याने छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लखनऊ विमानतळाबाहेर काल ठिय्या मांडला.