- – शशांक मो. गुळगुळे
घाईघाईत निवडलेला गुंतवणुकीचा पर्याय चुकीचाही ठरू शकतो. मार्चमध्ये एकदम मोठी रक्कम उभारणे अशक्यही होऊ शकते. त्यामुळे जानेवारीपासूनच योग्य नियोजन करून, योग्य पर्यायांत गुंतवणूक करावी.
२०२० मध्ये कोरोनाची लागण भारतीयांना पहिल्यांदा झाली व त्या काळात लॉकडाऊनही जाहीर झाला होता. त्यामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भरावयाचा प्राप्तीकर कमी भरावा लागावा यासाठीच्या ज्या गुंतवणूक योजना आहेत, त्यांत गुंतवणूक करण्याची मुदत दरवर्षी जी ३१ मार्चपर्यंत असते ती ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. ओमिक्रॉनमुळे जर २०२१-२२ या वर्षासाठीची मुदत वाढवली तर मुद्दा वेगळा; पण नाही वाढवली तर निवडलेल्या पर्यायांत ३१ मार्च २०२२ पर्यंत गुंतवणूक करावीच लागेल. पण अगदी मार्चपर्यंत- अकराव्या तासापर्यंत थांबू नये. कारण घाईघाईत निवडलेला गुंतवणुकीचा पर्याय चुकीचाही ठरू शकतो. मार्चमध्ये एकदम मोठी रक्कम उभारणे अशक्यही होऊ शकते. त्यामुळे जानेवारीपासूनच योग्य नियोजन करून, योग्य पर्यायांत गुंतवणूक करावी.
या लेखात गुंतवणूकदारांसाठी दहा पर्यायांची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक गुंतवणुकीतून मिळणारा परतावा, सुरक्षितता, लवचीकता, गरज भासल्यास किंवा आकस्मिक परिस्थिती निर्माण झाल्यास चटकन पैसे परत मिळतील का? मूल्य, पारदर्शकता, गुंतवणुकीची सहजता व वाचणारा प्राप्तीकर या सर्व बाबींचा विचार या लेखात केला आहे. या सर्व गुंतवणुकीत वरील बाबींचा विचार करता इक्विटी संलग्न बचत योजना (इक्विटी लिन्क्ड सेव्हिंग्ज स्कीम- इएलएसएम) पहिल्या क्रमांकावर आहे.
यानंतर नॅशनल पेन्शन सिस्टीम व अल्प बचत योजनांचा क्रम लागतो. ‘युलिप’मधील (युनिट लिन्क्ड पॉलिसी) गुंतवणूक करमुक्त असली तरी ही गुंतवणूक लवचीक नसल्यामुळे गुंतवणूक पर्यायांत हिचा क्रम मागे जातो. गुंतवणुकीच्या दृष्टीने जीवन विमा पॉलिसी घेणे हे तर पूर्णतः चुकीचे ठरू शकते. कोणत्याही जीवन विमा पॉलिसी- विमाधारक त्या पॉलिसीच्या मुदतीपर्यंत जिवंत राहिला तर- ४ ते ५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत नाही. त्यामुळे प्राप्तीकर वाचविण्यासाठी गुंतवणूक करताना जीवन विमा पॉलिसीतील गुंतवणुकीला सर्वात कमी प्राधान्य द्यावे.
इएलएसएस फंड्स
गेली पाच वर्षे या गुंतवणूक पर्यायांत १६.५ टक्के परतावा मिळाला आहे. या गुंतवणुकीत इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत ‘लॉक-इन-पिरियड’ कमी आहे. म्हणून सर्व गुंतवणूक या एकाच पर्यायात करू नये, ते जोखमीचे ठरू शकते. इक्विटी फंडातून १ लाख रुपयांहून अधिक दीर्घ मुदतीचा कॅपिटल गेन झाला तर हा ‘गेन’ करपात्र ठरविण्यात आला आहे. यात जमा होणारा निधी कुठे गुंतविला जातो याबाबतची पारदर्शकता असते. या योजनेतून गुंतवणूकदाराला कधीही बाहेर पडता येऊ शकते. शेअरबाजार हा अनिश्चित असतो. कधी वर तर कधी खाली ही एक यात गुंतवणुकीतील जोखीम ठरू शकते.
यात ‘इन्व्हेस्टींग पोर्टल’मधून ऑनलाईन गुंतवणूकही करता येते. काही इएलएसएस फंड्स लघु व मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, तर काही मोठ्या कंपन्यांत गुंतवणूक करतात.
चांगल्या कामगिरीचे इएलएसएस फंड्स
फंडाचे नाव गेल्या ३ वर्षांत गेल्या ५ वर्षांत
मिळालेल्या मिळालेल्या
परतव्याची टक्केवारी परतव्याची टक्केवारी
१. मिरे ऍसेट टॅक्स सेव्हर २४.९१ २३.८०
२. कॅनरा रिबेको इक्विटी
टॅक्स सेव्हर २४.९९ २२.००
३. ऍक्सिस लॉंग टर्म इक्विटी २०.५० २०.१९
४. आयडीएफसी टॅक्स
ऍडव्हान्टेज २२.९२ २१.४८
५. डीएसपी टॅक्स सेव्हर २२.२२ १८.८१
६. सरासरी प्रमाण १९.३५ १७.७३
एनपीएस
या योजनेतील गुंतवणूकदारांना गेल्या ५ वर्षांत ८.११ टक्के दराने परतावा मिळाला. ही ‘इन्व्हेस्ट फ्रंडली’ गुंतवणूक योजना आहे. यात गुंतविलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम करमुक्त असते. या गुंतवणुकीत वयाच्या ७० वर्षांपर्यंत राहता येते. भविष्यात सेवानिवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक स्वावलंब असण्यासाठी या योजनेचा विचार करून प्राप्तीकरात सवलतही मिळवावी. यात केलेली दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८०-सी अन्वये कर-सवलतीस पात्र आहे. याशिवाय प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८० सीसीडी (१-बी) अन्वये अतिरिक्त ५० हजार रुपयांची रक्कम कर-सवलतीस पात्र आहे. जर कंपनीचा मालक किंवा व्यवस्थापन नोकरदाराच्या मूळ पगारातून १० टक्के रक्कम या योजनेत गुंतवत असेल तरही कर-सवलत मिळते. यात जमा होणारा निधी इक्विटी फंड्समध्ये गुंतविला जातो. यात गेल्या तीन वर्षांत १६.६५ टक्के व पाच वर्षांत १६.८२ टक्के परतावा मिळाला. कॉर्पोरेट बॉण्ड फंड्समध्ये अनुक्रमे ९.०८ व ८.६३ टक्के परतावा मिळाला. गिल्ट फंड्समध्ये ९.५२ व ८.३५ टक्के परतावा मिळाला, तर अन्य इन्व्हेस्टमेन्ट फंडांतून ८.५६ व ७.२८ टक्के परतावा मिळाला.
वरिष्ठ नागरिक बचत योजना
जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ या कालावधीत या योजनेतील गुंतवणूकदारांना ७.४ टक्के दराने व्याज मिळणार आहे. वरिष्ठ नागरिकांना कर वाचविण्यासाठी ही चांगली गुंतवणूक योजना असून यातून मिळणारे ५० हजार रुपयांपर्यंतचे व्याजही करमुक्त आहे. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा काही बँकांच्या काही खात्यांमध्ये उघडता येते. शक्यतो खाते बँकेत उघडावे म्हणजे व्यवहार करणे सुलभ होते. ‘पीपीएफ’पेक्षा या योजनेत जास्त व्याज मिळते. बँकेकडेही कर वाचविण्यासाठी पाच वर्षे मुदतीच्या मुदत ठेव योजना आहेत. पण यांत व्याज कमी मिळते. प्रत्येकाला या योजनेत फक्त १५ लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येते. ऐच्छिक सेवानिवृत्तीधारकांना ५८ वर्षांनंतर यात गुंतवणूक करता येते. इतरांना मात्र ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतरच गुंतवणूक करता येते.
युलिप
या योजनेत गेल्या ५ वर्षांत ९ ते १४.५ टक्के परतावा मिळाला. यात गुंतविलेली रक्कम शेअरमध्ये गुंतविली जावी की डेटमध्ये गुंतविली जावी याचा निर्णय गुंतवणूकदार घेऊ शकतो. तसेच निर्णय हवा तेव्हा बदलूही शकतो. युलिपमध्ये जीवन विमा संरक्षण मिळत नाही. यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागते.
पीपीएफ
या योजनेत जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत ७.१ टक्के दराने व्याज मिळणार आहे. व्याज करमुक्त आहे. बँकेचे व्याज करपात्र असते, पण या योजनेचा ‘लॉक-इन-पिरियड’ फार मोठा आहे. ही योजना फार लोकप्रिय आहे. तसेच अतिशय सुरक्षित, लवचीक व कर-सवलत देणारी आहे. पोस्ट ऑफिस किंवा विशिष्ट बँकांच्या विशिष्ट शाखांत हे खाते उघडता येते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पीपीएफ-सी खाती फार मोठ्या प्रमाणावर आहेत. या योजनेत मिळणारे व्याज दर तीन महिन्यांनी बदलते. सध्या मिळणारे व्याज हे जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीसाठी असून, एप्रिलमध्ये पुन्हा नवा व्याजदर जाहीर होणार. नंतर जून, सप्टेंबर असा दर तीन महिन्यांनी व्याजदर जाहीर होणार. यंदा व पुढील वर्षी बर्याच राज्यांत निवडणुका असल्यामुळे व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी असून स्थिर ठेवला जाण्याची शक्यता आहे. या योजनेची मुदत १५ वर्षे आहे. मुदतपूर्तीनंतर एकूण तीन वेळा पाच-पाच वर्षांसाठी मुदत वाढवून मिळू शकते. मूल लहान असताना यात गुंतवणूक केल्यास त्याच्या उच्च शिक्षणासाठी मोठा निधी उभा राहू शकतो व त्याचवेळी दरवर्षी प्राप्तीकरही वाचू शकतो.
सुकन्या योजना
या गुंतवणुकीवर जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत ७.६ टक्के दराने व्याज मिळणार आहे. ही योजना लहान मुलींसाठी असून पालकांनी/आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी यात गुंतवणूक करून तिचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आणि पालकांनी/आई-वडिलांनी यातून दरवर्षी कर-सवलतही मिळवावी. यात १० वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावेच गुंतवणूक करता येते. यातून मिळणारे व्याज करमुक्त आहे. दर आर्थिक वर्षी या योजनेत कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचीच गुंतवणूक करता येते. एक हजार रुपये भरून पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या ठरवून दिलेल्या शाखेत हे खाते उघडता येते. एकूण दोन मुलींसाठी हे खाते उघडता येते. पण दोन्ही खात्यांत मिळून कमाल गुंतवणूक दीड लाख रुपयांपर्यंतचीच करता येते.
राष्ट्रीय बचत
चालू तिमाहीत या योजनेत ६.८ टक्के दराने व्याज दिले जात आहे. ही योजना सरकारी असल्यामुळे पूर्ण सुरक्षित आहे. ही योजनाही गुंतवणूकदारांत प्रिय आहे. या योजनेची मुदत पाच वर्षे आहे. यावर मिळणार्या व्याजावर प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८०-सी अन्वये कर-सवलत मिळू शकते. समजा एखाद्याने जानेवारी २०२२ मध्ये या योजनेत रु. ५०,००० इतक्या रकमेची गुंतवणूक केली तर त्याला वर्षाला रु. ३४०० व्याज मिळणार. या व्याजावर तो गुंतवणूकदार २०२२-२०२३ या वर्षासाठी कर-सवलत मिळवू शकतो.
पेन्शन योजना
परतावा ६ ते ९ टक्के. विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना आहेत. सरकारच्या एनपीएस व अटल पेन्शन योजना आहेत. शासनाला निवृत्तीधारकांच्या हातात पैसा असावा असे वाटते व यासाठी या पेन्शन योजना आहेत. एनपीएस पेन्शन धारकांचा रु. पन्नास हजार अतिरिक्त कर वाचू शकतो, पण ही सवलत विमा कंपन्यांच्या पेन्शन योजनांत नाही. ऍन्युटी पेन्शनमध्ये पेन्शनधारकाला पूर्ण रक्कम मिळत नाही. त्याच्या साठलेल्या रकमेपैकी मुदतपूर्तीनंतर त्याला एक तृतियांश रक्कम मिळते व दर महिन्याला ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळते व उरलेली दोन तृतियांश रक्कम त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला किंवा योजनेसाठी त्याने ज्याला ‘नॉमिनी’ केले असेल त्याला मिळते.
मुदत ठेवीत गुंतवणूक
सध्याचा व्याजदर ५.७५ ते ६.३९ टक्के. ज्यांची वरिष्ठ नागरिक बचत योजनेत १५ लाख गुंतवणूक झाली असेल अशांसाठी उरलेल्या गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. पण गुंतवणूक पाच वर्षांसाठी करावी लागेल. ज्या आर्थिक वर्षी गुंतवणूक केली आहे त्या एकाच वर्षी कर-सवलत मिळते. यातून मिळणारे व्याज करपात्र असते. त्यामुळे परतावा फारच कमी म्हणजे चलनवाढीच्या दराहूनही कमी मिळतो. गुंतवणूक करण्यास शेवटच्या तासापर्यंत थांबणारे बरेच शेवटच्या क्षणी घाईघाईत यात गुंतवणूक करून कर वाचवितात.
जीवन विमा
परतावा ५ ते ६ टक्के. कुटुंबाच्या भवितव्याच्या दृष्टीने यात गुंतवणूक करावी, पण कर वाचविण्यासाठी यात गुंतवणूक करू नये. ही गुंतवणूक सुरक्षित आहे व मुदतीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त असते. पण परतावा कमी व लवचीकता नाही हे मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे.