– पांडुरंग राऊत, म्हापसा (भ्रमणध्वनी क्र. ः ९४२२४५६०२९)
विविध दिशांनी वाटचाल करणार्या गोवा राज्यात राजकीय चुकांचा ढिगाराच दिसत राहील. पर्याय म्हणून प्रादेशिकता पुढे सरकवा अशी सूचना हितचिंतकांनी व समर्थकांनी केली. त्यावर विचार करून पुढील निश्चित मार्ग आखू. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
कर्तृत्व व नेतृत्व या बाबतीत हे गोवा राज्य कधी मागे पडले नाही. उणीव होती ती योग्य प्रादेशिक राजकारणाची. ही उणीव भरून काढण्यासाठी सध्या सभा – संमेलने व बैठका चालू आहेत. प्रादेशिकतेवर त्यात भर दिला जात आहे. त्या विचारांना प्रादेशिक रूप – स्वरूप देण्यासाठी एक व्यासपीठ उभारले जाईल. विचार आणि श्रम या दोन्हींना महत्त्व प्राप्त होईल अशा प्रकारची ही प्रादेशिकता असेल. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येऊ न देता प्रादेशिक गरजा भागवण्याचे धाडस करण्यासाठी आता प्रादेशिक राजकारण करूया.अनेक हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केलेली प्रादेशिक स्तरावरील राजकीय शक्ती उभी करावी या हेतूने वावर सुरू केला असता सर्वच मतदारसंघांतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत राहिला. या समर्थनाचाही अर्थ आहे. वर्तमानकाळाने तो अर्थ वाचून पाहावा लागेल. एका प्रादेशिक व्यासपीठाची गरज गोव्याला भासू लागली आहे. हे फार सूचक आहे.
समोर आलेली सूचकता वर्तमान परिस्थितीकडे बोट दाखवून खुणावू लागली तेव्हा माणसे गोळा होऊ लागली. ऋणमुक्त गोव्यासाठी राजकीय व्यासपीठाची गरज त्यांना भासत असल्याचे जाणवले. असे व्यासपीठ उभारणे ही सोपी गोष्ट नव्हे, परंतु मतदारांची हाक इतक्या तीव्र स्वरूपात ऐकू येऊ लागली की तिचे पडसाद समर्थकांनी ऐकले आणि पुढील वाटचाल सुरू झाली.
जगण्यासाठी माणूस सुरक्षितता शोधतो आहे. रोजगाराच्या संधी शोधतो आहे. उद्याचा गोवा त्याला विकासाभिमुख झालेला हवा आहे. त्याच्या मनातील नियोजन सत्याकडे वळू पाहते आहे. त्याला या वर्तमान परिस्थितीतील अनेक विषय टोचू लागले आहेत, म्हणूनच तो हाक मारतो आहे. त्याला साद देण्याचे काम हे राजकीय व्यासपीठ करील यात शंकाच नाही.
वर्तमानकाळ जीवनास साथ देत नाही असे म्हणण्याऐवजी माणूस राजकीय पक्षपाताकडे बोटे दाखवून चिंतन करू लागला. त्याच्या चिंतनात भविष्याची गरज दिसते. ही गरज भागवण्यासाठी त्याला राजकीय व्यासपीठाची गरज आहे. हे एक आव्हान आहे. त्याचा स्वीकार करणारी मंडळी एकत्र आलेली आहेत. इथे स्वाभिमान दिसतो. ताठ मानेने चालणारा माणूस पारदर्शकता शोधू लागला आहे. प्रादेशिक राजकारणाची कास धरू लागला आहे.
प्रादेशिक राजकारणाची नाडी जिवंत ठेवायची असेल तर मतदारांनी त्यागाची तयारी ठेवावी लागेल. गोव्याचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे सुशिक्षित माणसांना सांगण्याची गरज नाही. राजकीय वाटचालीत मतदार नेहमीच सत्त्वपरीक्षा देत राहिला. प्रसंगी त्याने त्याग केला, परंतु त्या कष्टांचे चीज झालेच असे नाही. ज्यांना कष्टांना मोल हवे आहे, ते पुढे आले आहेत आणि राजकीय व्यासपीठाची गरज मांडू लागले आहेत. स्वच्छ प्रशासनाद्वारे नूतन राजकीय घोषणा करण्याचा या व्यासपीठासमोरचा संकल्प समर्थकांना मानवला असे माझ्या अभ्यासातून दिसते. ‘‘आगे बढो’’ असा तो संदेश आहे असे गृहित धरून समविचारी लोक जवळ येऊन राहिले आहेत. हे एक नव्या युगाचे प्रतीक मानता येते.
गोवा राज्य लहान असले तरी बारा मंत्री व चाळीस मतदारसंघ आहेत. या चाळीस मतदारसंघांमध्ये धर्म, जात आणि भय नांदते आहे. त्याचे दुष्परिणाम वर्तमानकाळ विद्यमान पिढीवर घडवीत आहे. हे भेदाचे राजकारण नव्या राजकीय व्यासपीठाने करू नये असे सर्वांचेच मत बनले आहे. प्रजा हीच या राजकीय व्यासपीठाची शक्ती असेल. या शक्तीतून गतवैभव प्राप्त होईल. गतवैभव म्हणजेच सुख, समाधान, शांती, तसेच चांगले शिक्षण व आरोग्य. गोव्याच्या मुक्ततेनंतर स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी याच विषयांचा आधार घेत आपला राजकीय पक्ष उभारला होता. भूतकाळ अविस्मरणीय होता. मात्र तो काळ पुन्हा भेटीस येणार नाही. वर्तमानकाळात जगणार्यांनी भविष्यकाळ घडवून येणार्या पिढीला धीर द्यावा लागेल. हे युगांतर व्हावे यासाठी प्रजेने एकत्र येणे स्वाभाविक आहे कारण ती भविष्यकाळ शोधू लागली आहे.
भवितव्य घडवायचे असेल तर जनआंदोलन छेडावे लागेल. मनात नवी मानसिकता रुजवावी लागेल. प्रश्न राहतो तो एवढाच की मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची? श्रम करू पाहणारे हात अमली पदार्थ व्यवहाराविरुद्ध का उभे राहिले नाहीत? गाभार्यांत देवदेवतांच्या मूर्ती सुरक्षित का राहिल्या नाहीत? शासन व्यवस्थेत टंगळमंगळ का होत गेली? स्वावलंबनाचा जप सरकारी नामस्मरणात का शिरला नाही? स्वतःलाच या शंका विचारून पाहा. उत्तरे येतील तेव्हा एका नव्या राजकीय व्यासपीठाची गरज भासू लागेल. त्या व्यासपीठास प्रादेशिक रूप व आकार देण्याचे काम म्हणूनच चालू झालेले आहे. या आंदोलनात समविचारी लोकांनी सहभागी व्हावे अशी इच्छा आहे. त्या चळवळीस आपण प्रजेचा पक्ष म्हणून नाव देऊया.
चौफेर नजर टाका. अपराधी मनाने व कमकुवत मानसिकतेने बाहेर येऊ नका. प्रादेशिक गरज व राष्ट्रीय आत्मा यात फारकत नकोच. एका स्वच्छ भूमीची निर्मिती ही काळाची गरज आहे असे मानून स्वावलंबनाचा जप करीत यावे. म्हणजे विचारांची पालखी खांद्यावर घेता येईल.
लक्षात घ्या. भाषिक तेढ निर्माण करावयाची नाही. धार्मिक कलह नकोच नको. तथापि स्वच्छ भूमीसाठी स्वच्छ कारभाराची गरज असते. शासन व्यवस्थेत अशांतता आहे. त्यातून भ्रष्ट मने बनली आहेत. त्या भ्रष्ट मनावर ताबा मिळवण्यासाठी प्रजा विचारांनी जवळ आली तर भवितव्य उज्ज्वल असेल यात शंका नाही. येथून नव्याने राजकारण सुरू करूया. या नूतन वाटचालीत सर्व समविचारी व्यक्तींना सामील करून घेऊया. समविचारी लोक एकत्र येतील तेव्हाच प्रादेशिकतेत सकारात्मक विचारसरणी रुजून मानसिकतेत बदल होऊ शकतील. हीच मानसिकता सर्वांना आदर्शवादाकडे नेईल. राजकीय पक्षांचा एक ‘हिडन अजेंडा’ असतो. नव्या प्रादेशिक राजकारणात तसे काही असू नये असा समर्थकांचा आदेश आहे. हा आदेश शिरोधार्य मानला तर यश आपोआप येऊ शकेल. तथापि या कार्यसिद्धीसाठी अनेक कार्यकर्त्यांची व स्वयंसेवकांची गरज आहे. त्या सर्वांना प्रादेशिकता हाक मारते आहे. स्व-बळ दाखवून देण्याची ही वेळ आहे.
भावी जीवनाचे रंग ठरवण्यासाठी प्रादेशिक राजकारणाची गरज भासू लागली आहे. त्याचा ध्यास घेऊन ही हाक मारीत आहोत. गोव्यात बुद्धिमत्ता सामावलेली आहे. सर्वांना सोबत घेऊन प्रादेशिक राजकारण करावे असा सर्वांचाच आग्रह पडला. हा आग्रह धरताना सारे समर्थक स्वातंत्र्यसेनानींना विसरलेले नाहीत. त्यांना वंदन करूनच आम्ही पुढे सरकूया. सूडबुद्धीचे राजकारण करणार नाही अशी ग्वाही त्यांना देऊन पुढे जाऊया. प्रादेशिकतेत मातीची गुणवत्ता असते व खरे प्रेम प्रजेस दाखवता येते. यासाठी आगामी कृती करूया. एका नव्या परिवर्तनाची ही नांदी आहे असे मानायला काय हरकत आहे?