प्रस्ताव पाठवा; गोव्याला मेट्रो नक्की देईन

0
36

>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही; राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याची सूचना; वेर्णा येथे मिसिंग लिंक रोडचे उद्घाटन

गोवा सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी गरजेनुसार आराखडा तयार करून आपल्याकडे यावे. तो आपण निश्‍चित मंजूर करेन. गोवा सरकारने राज्यासाठी मेट्रोसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. आपण गोव्याला नक्की मेट्रो देईन. अशा प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा राज्याला लाभ होईल, अशी ग्वाही काल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

लोटली आणि वेर्णा आयडीसीमधील मिसिंग लिंक रोडचे उद्घाटन वेर्णा येथे गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. १८४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या चारपदरी मार्गामुळे फोंडा ते मुरगाव हे अंतर १२ किमीने कमी होणार आहे.

पणजी-कर्नाटक महामार्ग २०२२ पर्यंत पूर्ण
गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या आपल्या खात्याने पूर्ण केल्याचा आपल्याला आनंद आहे. मुंबई आणि गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या; मात्र हा रस्ता एक ते दीड वर्षात पूर्ण होईल, असे ठामपणे सांगत गडकरींनी हा रस्ता पुढे कर्नाटकपर्यंत नेणार असल्याचे आश्‍वासन यावेळी दिले. पणजी ते कर्नाटक महामार्ग २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामाची निविदा जारी करूनच
गोव्यातून आपण बाहेर पडणार

नव्या झुवारी पुलाचे काम सध्या गोव्यात सुरू आहे. या पुलावर आधुनिक पद्धतीचे रेस्टॉरंट आणि गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे. पर्यटक आयफेल टॉवर पाहायला पॅरिसमध्ये जातात, त्याचप्रमाणे यापुढे गोव्यात झुवारी पुलावरील मनोरा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. झुवारी पुलावरील या नियोजित प्रेक्षक गॅलरी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. हा प्रकल्प ‘स्टेट ऑफ द आर्ट’ अशा तर्‍हेचा असेल. त्यात शॉपिंग मॉल उभारला जाणार असून, गोव्यातील पारंपरिक हातमाग, हस्तकला, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तू विकण्याचे स्टॉल्स तिथे उभारले जातील. रेस्टॉरंट व प्रेक्षक गॅलरीच्या मनोर्‍याकडे जाण्यासाठी बोटीची सोय केली जाणार आहे. या कामाची निविदा जारी करूनच आपण गोव्यातून बाहेर पडेन, असेही गडकरी यांनी सांगितले.

मोपा विमानतळाला जोडणारा
मार्ग केंद्र सरकार तयार करणार

मनोहर पर्रीकर हे हयात असताना मोपा विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली. या विमानतळाला जोडणारे रस्ते तयार करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे हा रस्ता राज्य सरकारने बांधावा, असे सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने हा रस्ता बांधून देण्याची निविदा सुद्धा काढली, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

पणजी ते मडगाव महामार्गाची
एक मार्गिका निवडणुकीपूर्वी खुली

पणजी ते मडगाव या सहापदरी मार्गाची एक मार्गिका राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. तसेच या महामार्गाचे उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच वेर्णा येथील टी-जंक्शनजवळ सिग्नलमुळे वाहतुकीची कोंडी होत असून, ही समस्या सोडवण्यासाठी तेथे उड्डाण पूल उभारणीस मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी पुढे बोलताना दिली.

मनोर्‍याची संकल्पना
गडकरींची : मुख्यमंत्री

झुवारी पुलाच्या वर जे रेस्टॉरंट व निसर्ग सौंदर्याचे निरीक्षण करण्यासाठी जो मनोरा उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा असून, त्यांच्या संकल्पनेतूनच हे रेस्टॉरंट व मनोरा प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून
गोव्याला मिळाले १०५०० कोटी

केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून गोव्याला आतापर्यंत १०५०० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गोवा सरकारने केंद्रीय महामार्ग मंत्रालयाला नव्या बोरी पुलाचे व पश्‍चिम बगलमार्गाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सोमवारी सकाळी दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

११ हजार कोटींची कामे मार्गी लागण्याच्या वाटेवर
गोव्यात आतापर्यंत केवळ एका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्यातूनच १२ हजार कोटींची कामे झाली आहेत. आणखी ११ हजार कोटींची कामे मार्गी लागण्याच्या वाटेवर आहेत. त्यात मुंबई-गोवा चौपदरी महामार्ग कर्नाटक राज्यापर्यंत पोहोचविण्याच्या कामाचा समावेश आहे. हा सर्व खर्च करताना गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र आहे, हे आम्ही नजरेसमोर ठेवले आहे, असे नितीन गडकरींनी सांगितले.

डॉक्टरांनी जेनेरिक औषधांवर भर द्यावा

>> नितीन गडकरी; टेलिमेडिसिन सेवेचा शुभारंभ

महागडी औषधे घेण्याची वेळ रुग्णांवर येऊ नये, यासाठी डॉक्टरांनी जेनरिक औषधांवर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘टेलिमेडिसिन’ योजनेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

औषधांचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यासाठी या क्षेत्रात स्पर्धा वाढण्याची गरज असून, जेनरिक औषधांवर भर द्यायला हवा, असे गडकरी यांनी सांगितले.

टेलिमेडिसिन योजनेखाली तब्बल ८४ डॉक्टरांकडून रुग्णांना त्यांना असलेल्या आजार व व्याधीसंबंधी ई-मेल व व्हिडिओद्वारे सल्ला मिळू शकेल. त्यात एकूण १९ वेगवेगळ्या विभागांसाठीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्याhttp://www.gmc.goa.gov.in या संकेतस्थतळावर भेट द्यावी लागेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर रुग्णांना http://gmc.medicoexperts.com या संकेतस्थळावर नेले जोईल. त्यावर रुग्णाला नोंदणी करून प्रोफाईल तयार करावे लागेल. त्यानंतर त्यांना डॉक्टरांशी आजाराबाबत सल्लामसलत करता येईल.
सदर वेबसाईटवर वेगवेगळ्या १९ वैद्यकीय विभागांचे एकूण ८४ तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील. मात्र, अद्याप व्हिडिओ कन्सल्टेशन ऍक्टिव्हेट करण्यात आलेले नाही. मात्र, ई-मेल कन्सल्टेशन लिंक ऍक्टिव्हेट करण्यात आलेली आहे. त्यावर रुग्णांना आपल्या रिपोट्‌सचे फोटो पाठवून मार्गदर्शन घेता येईल.