प्रस्ताव आल्यास पक्ष विलिनीकरणाचा विचार

0
9

>> गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याकडून स्पष्ट; कॉंग्रेस नेत्यांकडून सूचना; मात्र अद्याप कोणताही प्रस्ताव नाही

आठ आमदारांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे, त्यातून सावरण्यासाठी पक्ष ताकदवान नेत्यांच्या शोधात आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पडद्याआडून गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. दुसर्‍या बाजूला गोवा फॉरवर्ड पक्ष चालविणेही कठीण असल्याने सरदेसाई हे देखील पक्ष विलीन करून कॉंग्रेसमध्ये जाण्यास तयार आहेत; मात्र त्यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद हवे आहे. या सार्‍या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून आपणाकडे तसा प्रस्ताव आल्यास जरूर विचार करू; पण अद्याप तसा प्रस्ताव आला नसल्याचे काल स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षात यावे, अशी नेत्यांची सूचना आहे; मात्र तसा प्रस्ताव आलेला नाही, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस पक्षात घरवापसी करण्याची विजय सरदेसाई यांची कधीपासून इच्छा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गोवा फॉरवर्ड पक्ष विलीन करण्याची ते वाट पाहत होते; पण तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा त्याला विरोध होता.
२०१२ च्या निवडणुकीत सरदेसाई यांनी फातोर्डा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीची मागणी केली होती. त्यावेळी ते गोव्यात कॉंग्रेसचे सचिव होते; पण प्रयत्न करूनही ऐनवेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्ष सोडला व अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. त्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन आमदार दामू नाईक यांचा पराभव करून ते निवडून आले. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थापना करून २०१७ ची निवडणूक त्यांनी लढविली. त्यावेळी पक्षाचे तीन आमदार निवडून आले. कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डने सरकार स्थापन करण्याची तयारी चालविली होती; मात्र कॉंग्रेस विधिमंडळ पक्षात एकवाक्यता न झाल्याने त्यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचे व कॉंग्रेस पक्षामधील संबंध दुरावले. त्यानंतर १० कॉंग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश देत भाजपने गोवा फॉरवर्डला सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवला.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विजयाची खात्री कमी असल्याने कॉंग्रेसशी युती करून निवडणूक लढविली. त्यात विजय सरदेसाई एकटेच निवडून आले; पण भाजप पुन्हा सत्तेवर आल्याने त्यांची थोडी निराशा झाली. या निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेवर येण्याची दाट शक्यता होती; पण दुबळ्या नेतृत्त्वामुळे त्यांचे अकराच आमदार निवडून आले.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी काल गोवा फॉरवर्ड पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची मागणी करताच विजय सरदेसाई यांनीही तयारी दर्शविली आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता, कॉंग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून तसा प्रस्ताव आल्यास आपण त्यांच्याशी चर्चा करीन, असे तेम्हणाले.

कणखर विरोधी पक्षनेत्याची गरज : सरदेसाई
भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत विरोधीपक्ष मुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. अशावेळी विधानसभेतही कणखर विरोधी पक्षनेता असणे अशी लोकांची इच्छा आहे. ती इच्छा कॉंग्रेस पक्षाची देखील असावी. आपण विधानसभेत अभ्यासपूर्ण आवाज उठविला आहे, ते पाहून त्या पक्षाची व अनेक लोकांची विरोधी पक्षनेता आपण व्हावे, अशी इच्छा आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले. कॉंग्रेसकडून तसा प्रस्ताव आल्यास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

सरदेसाईंना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का?
कॉंग्रेसला आज कणखर विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. त्यामुळे खुद्द विजय सरदेसाई हे त्या पदासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी करू शकतात. मात्र दुसर्‍या बाजूला कालच कॉंग्रेसने विधिमंडळ गट नेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली आहे. त्यामुळे त्यांना हटवून सरदेसाईंना हे पद मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. आलेमाव यांना पद देऊन त्यांना हटवल्यास पक्षात पुन्हा फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसर्‍या बाजूला गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मात्र विजय सरदेसाईंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षासमोर अनेक पर्याय : सरदेसाई

गोवा फॉरवर्ड पक्ष हा कॉंग्रेसमध्ये विलीन केला जाणार असल्याचे वृत्त निराधार आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष आपल्या पक्षात विलीन करावा, असा प्रस्ताव अद्याप आपणाला कोणत्याही पक्षाकडून आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत जास्त काही बोलण्यात अर्थ नाही, असे काल पक्षाचे सर्वेसर्वा व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले. मात्र गोवा फॉरवर्डसारख्या पक्षासमोर विविध पर्याय असू शकतात, असेही सरदेसाई म्हणाले.

गोवा फॉरवर्ड पक्ष एखाद्या पक्षात विलीन करायचा झाल्यास त्यासाठी फक्त कॉंग्रेस पक्ष हा एकच पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या विधानाचा अर्थ गोवा फॉरवर्ड पक्ष हा सत्ताधारी भाजपमध्येही विलीन होऊ शकतो, असा आहे का असे विचारले असता, त्याचा तसा अर्थ लावू नका, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.