प्रस्तावित 3 रेल्वे स्थानकांचा वापर हा फक्त क्रॉसिंगसाठी

0
8

मुख्यमंत्र्यांची माहिती

कोकण रेल्वेच्या नेवरा येथील प्रस्तावित रेल्वे स्थानकाचा वापर हा फक्त क्रॉसिंगसाठी करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत त्यासंबंधीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना काल सांगितले. काल प्रश्नोत्तराच्या तासाला रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.

रेल्वेद्वारे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांनाही राजधानी पणजी शहरात येणे सोपे व्हावे यासाठी जास्तीत जास्त जलद रेल्वेगाड्या करमळी रेल्वे स्थानकावर थांबतील यासाठी आपण केंद्र दरबारी प्रयत्न करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार वीरेश बोरकर, व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा आदींनी गोव्यात होऊ घातलेल्या मये, नेवरा व सोलदोडे (सारजोरा) या तीन रेल्वे स्थानकांना स्थानिकांचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. तसा ठराव संबंधित पंचायतींच्या ग्रामसभांमध्येही घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी बोरकर व व्हिएगस यांनी सभागृहात दिली.

यावेळी उत्तर देताना वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे म्हणाले की, वरील तिन्ही रेल्वे स्थानकांसाठी कोकण रेल्वेची आधीपासूनच योजना होती. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ही सुरळीत व अधिक कार्यक्षमपणे व्हावी यासाठी ही रेल्वे स्थानके उभारण्याची योजना असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.