- डॉ. इमॅन्युएल ग्रेशियस
(प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ)
मडगाव प्रसूतीवेदनेचा काळ हा प्रदीर्घ आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा असतो. कधीकधी अगदी शेवटच्या क्षणी सगळ्या आशा सोडून द्याव्याशा वाटतात इतक्या त्या वेदना भयंकर असतात. हे चित्र बदलण्यासाठी एखाद्या आश्वासक जोडीदाराची गरज असते, ज्याला आपण ‘बर्थिंग बडी’ किंवा ‘प्रसूती-सोबती’ म्हणतो.
सामान्यतः प्रसूतीची पूर्वनियोजित तारीख जसजशी जवळ येऊ लागते, तसतशी गर्भवती स्त्रीच्या मनात संभाव्य प्रसवकळांची भीती जोर धरू लागते. हा असा वेदनादायी अनुभव आहे, जो शब्दबद्ध केला जाऊ शकत नाही. पण खरंतर तिने त्यावेळी अशा व्यक्तीची निवड करणे गरजेचे असते जी बाळाचं डोकं गर्भाशयातून बाहेर पडेपर्यंत कुणाच्या ध्यानीमनीही नसते. या गर्भावस्थेला क्राऊनिंग म्हटलं जातं, जी पुढील प्रसवकळांची नांदी असते. ती व्यक्ती म्हणजेच ‘बर्थिंग बडी’ किंवा प्रसूती-सोबती! प्रसूतीवेदना सहन करत असलेल्या गर्भवती स्त्रीला आधार देणार्या, मदत करणार्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरणं योग्य ठरेल. गरोदर स्त्री आपल्या भावनिक आधारासाठी जिच्यावर विश्वास ठेवू शकते, अशी कोणतीही व्यक्ती त्या स्त्रीची प्रसूती-सोबती बनू शकते.
या प्रसूती-सोबती उपक्रमाचे उद्दिष्ट विश्वासार्ह सोबतीच्या पाठिंब्याने प्रसवकळांच्या वेदना अधिक सुसह्य बनवणे हा आहे. प्रसूती-सोबती हा गर्भवती महिलेचा नवरा, जवळचा मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईकही असू शकतो.
तसं पाहायला गेलं तर या संकल्पनेत कसलंही नावीन्य नाही. शतकानुशतके जगभरातील स्त्रियांची बाळंतपणे घरातल्या अशा बायकांच्या देखरेखीखाली झालेली आहेत, ज्या प्रसवकळा सहन न करू शकणार्या गर्भवती स्त्रियांचा शारीरिक आणि भावनिक आधार बनतात. प्रसूतीवेदनेचा हा काळ प्रदीर्घ आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा असतो. पहिल्यांदाच प्रसूत होणार्या स्त्रियांना हा त्रास इतरांपेक्षा अधिक प्रमाणात सहन करावा लागतो. कधीकधी अगदी शेवटच्या क्षणी सगळ्या आशा सोडून द्याव्याशा वाटतात, इतक्या त्या वेदना भयंकर असतात. हे चित्र बदलण्यासाठी एखाद्या आश्वासक जोडीदाराची गरज असते, ज्याला आपण प्रसूती-सोबती म्हणतो.
प्रसूती-सोबती या उपक्रमामुळे गर्भवती स्त्रीची प्रसूतिपूर्व तपासणी, तिला आरामदायक वाटेल अशा प्रि-लेबर खोलीची व्यवस्था करणे आणि लेबररूममध्ये तिला आवश्यक आधार मिळवून देणे अधिकच सुलभ झालेलं आहे.
आदर्श प्रसूती-सोबती कसा असावा?
- ज्या व्यक्तीवर गर्भवती स्त्री गर्भधारणेच्या ३६व्या आठवड्यापासून पूर्णपणे विसंबून राहू शकते; जी व्यक्ती तिच्या इतर वैयक्तिक जबाबदार्यांपासून मुक्त असेल, अशीच व्यक्ती एक आदर्श प्रसूती-सोबती बनू शकते.
- शेवटच्या महिन्यात आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत त्या व्यक्तीने सर्व ठिकाणी आईसोबत कायम असणे अतिशय गरजेचे आहे. त्या व्यक्तीने आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच बाळ व बाळंतिणीला आवश्यक असणारं सामान सांभाळणे ही सर्व प्रारंभीची कामं हिरिरीने पार पाडायला हवीत.
- प्रसवकळांच्या वेळी जेव्हा आईला थकवा येतो तेव्हा या व्यक्तीची उपस्थिती अधिकच परिणामकारक ठरते. प्रसूती-सोबती हा मॅरेथॉनमध्ये धावणार्या धावपटूच्या कोचसारखा असतो. जेव्हाजेव्हा त्या धावपटूला आपण रेसमधून बाहेर पडत आहोत, असे जाणवू लागते तेव्हा हा कोच त्यांचे मनोबल वाढवून त्यांना अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यात मदत करत असतो.
- त्यामुळे, प्रसूती-सोबतीही कोचसारखाच शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि तंदुरुस्त हवा. साधारणतः प्रसववेदना अगदी बारा-बारा तास चालू असतात. अश्यावेळी किचकट पेपरवर्क्स आणि इतर बारीकसारीक धावपळीने काही तासांतच दमणारा जोडीदार कोणत्याही गर्भवती स्त्रीसाठी योग्य असूच शकत नाही. गर्भवती स्त्रीच्या बरोबरीने स्वतःच्याही तब्येतीची काळजी घेणं आणि तंदुरुस्त राहणं हे एका जबाबदार प्रसूती-सोबतीचं लक्षण आहे.
- प्रसूती-सोबती हा हॉस्पिटल कर्मचारी आणि आई यांच्यातील संपर्काचा दुवा असल्याने दोन्हीबाजूंना अकारण वाढणारा गोंधळ आणि ताण कमी होण्यास मदत होते. या प्रसूती-सोबतीला किमान ४ प्रसूतिपूर्व भेटींमध्ये आईसोबत हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे दोन्ही बाजूंना एकमेकांना जाणून घेण्याची चांगली संधी मिळते. त्याचबरोबरीने, अशा भेटींमधून हॉस्पिटल स्टाफसोबतची विश्वासार्हता वाढीस लागते व लेबरच्या वेळी अनावश्यक तपासण्या आणि प्रश्नांच्या जाचक ससेमिर्यापासून सहज सुटका मिळते.
- या प्रसूतिपूर्व भेटींचा आणखी एक फायदा म्हणजे प्रि-लेबर खोलीशी आईची वाढणारी जवळीक! ही प्रि-लेबर रूम प्रसूती-सोबती आपल्याला हव्या त्या पद्धतीने सजवू शकतो, तिथे मनाला आराम देणारी गाणीही लावू शकतो किंवा आईला आवडणारे कार्यक्रमही लावून देऊ शकतो. या खोलीत ते आईच्या पाठीवर आणि पायाला मसाज करू शकतात जेणेकरून तिला रिलॅक्स होण्यात मदत होऊ शकते. या सर्वांचा परिणाम आईच्या शरीरातील ऑक्सिटोसिन वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे प्रसवकळा सहजतेने चालू होतात आणि हळूहळू वाढत जातात. बाळंतपणाच्या शेवटच्या टप्प्यात, प्रसवकळा असह्य होऊन गर्भवती स्त्री असंबद्ध बडबड करू लागते. अश्यावेळी तिची बडबड कितीही त्रासदायक असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे व मनाला न लावून घेणे हे प्रसूती-सोबतीचे आद्य कर्तव्य आहे. प्रसूती-सोबती निवडताना सर्व मातांनी अशाच व्यक्तीची निवड करायला हवी, जिला या असह्य बडबडीचा त्रास होणार नाही किंवा दुखावली जाणार नाही. हा प्रसूती-सोबती महत्त्वाचे निर्णय घेण्यातही तितकाच तत्पर हवा.
आणीबाणीच्या प्रसंगी, सुखरूप प्रसूतीसाठी सी-सेक्शनसाठी जबाबदार व्यक्ती म्हणून प्रसूती-सोबतीची त्वरित परवानगी असणे परिणामकारक ठरते.
प्रसूतीच्या वेदनादायक उतारचढावामधून बाहेर पडण्यास सुखरूप मदत व्हावी यासाठी अधिकाधिक गर्भवती स्त्रिया ‘प्रसूती-सोबती’ या पर्यायाचा काळजीपूर्वक विचार करतील.