– प्रा. रमेश सप्रे
अर्जुन हा नावाप्रमाणे ऋजू म्हणजे सरळ स्वभावाचा आहे. भगवंतानं आपल्या सर्व विश्वात पसरलेल्या विभूतींच वर्णन त्याच्यासमोर केलं. तेव्हा अर्जुनातील कुतुहल जागं झालं नि त्यानं भगवंताला म्हटलं, ‘तू सर्व चराचरात पसरलेला आहेस हे कळलं. पण आता हे सर्व चराचर तुझ्यात एकवटलं आहे त्याचंही दर्शन मला घडव.’ भगवंत व अर्जुन यांच्यामधलं स्नेहाचं नातं एवढं घट्ट होतं की भगवंतानं लगेच आपलंविश्वरुप दर्शन अर्जुनासमोर प्रकट करण्यास सुरवातही केली. यासाठी अर्जुनाला दिव्यदृष्टीही दिली.विश्वरूपाचा एकेक पैलू उलगडत जातानां अर्जुनावर त्याचा वेगवेगळा प्रभाव दिसू लागला. प्रथम त्याला आश्चर्य वाटलं. नंतर काहीतरी अद्भुत बघतोय या जाणीवेनं तो हरखून गेला. पुढे पुढे तर ते अकराळविकराळ रूप पाहून तो प्रचंड घाबरला. ते रूप आवरून घेण्यासाठी प्रार्थना करु लागला. त्याला जे जे दिसत होतं त्याचं प्रत्ययकारी वर्णन अर्जुन करत गेला. प्रथम भगवंताचं ‘देव किंवा ईश्वर’ रुपात दर्शन त्याला झालं. नंतर विश्वरुप उग्र बनलं व शेवटी तर अतिशय उग्र बनलं. तेव्हा अर्जुनाच्या तोंडून उद्गार बाहेर पडले…
‘प्रसीद देवेश जगन्निवास॥
‘प्रसीद’ म्हणजे प्रसन्न हो. कृपा कर. काहीतरी वरदान मागण्यासाठी अर्जुनाची ही प्रार्थना नाहीये तर ‘तुझं हे जगड्व्याळ, अजस्त्र, प्रचंड, उग्र रूप आवरुन तू पुन्हा नेहमीसारखा हो!’ ही विनंती त्याला करायचीय. पुन्हा एकदा अर्जुन म्हणतो…
‘नमोऽस्तुते ते देववर प्रसीद ॥
या दोन्ही प्रार्थनात भगवंतासाठी वापरलेलं संबोधन महत्त्वाचं आहे- ‘देवेश’ आणि ‘देववर’. दोन्ही शब्दांचा अर्थ आहे देवांच्या वरचा, देवांच्या पलीकडचा (पर किवा परम), देवांपेक्षा श्रेष्ठ! हीच खरी श्रीकृष्णाची ‘भगवान’ अवस्था आहे. या श्रेष्ठ पातळीवरुन त्यानं गीतासंवाद केला आहे. विश्वरुपदर्शन हे ‘भगवान उवाच’ म्हणजे भगवंताचे शब्द नसून ‘भगवान पश्य’ असं भगवंताचं रूप आहे. याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर होणं साहजिक आहे. शब्द ऐकून विचार करायचा असतो तर रूप पाहून आपण प्रभावित होतो. निरनिराळे भावभावना आपल्याकडून व्यक्त होतात.
विश्वरुप हे ब्रम्हा-विष्णु-महेश अशा साध्या म्हणजे सगुण-साकार देवांचं दर्शन नव्हतं तर निर्गुण निराकार परब्रह्मानं आपला सर्वव्यापीपणा दाखवणारं दर्शन होतं. काय नव्हतं त्या विश्वरुपात! अर्जुनच खूप वर्णन करतो. नंतर स्तुती करून शरणही जातो. नंतर भीती वाटून प्रार्थनाही करतो.
प्रथम एक विचार लक्षात घेऊ या. सर्वात वरचं किवा पलीकडचं दाखवण्यासाठी ‘पर’ किवा ‘परम’ या उपसर्गांचा (प्रिङ्गिक्स) उपयोग केला जातो. जसं परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म किंवा पराशक्ती! अलीकडे येऊ तसे रंग-रेषा-आकार-आकृती-देह दिसायला लागतात. परमेश्वराचंच हे मूर्त रूप असतं. ज्याची आपण नित्य पूजाअर्चा करतो. पण जसंजसं पलीकडे जाऊ लागतो तसतसे आकार – रंग – रुपं धूसर होत जातात. अस्पष्ट रूपरेषा दिसू लागते. पुढे पुढे तर ङ्गक्त अस्तित्व जाणवतं. चैतन्याचा किंवा शक्तीचा अनुभव येतो. हीच निर्गुण-निराकार अवस्था असते. ज्ञान-मार्गात तसेच ध्यान-मार्गात अशी अनुभूती, असा साक्षात्कार महत्त्वाचा असतो. म्हणजेच अमूर्ताचा निराकाराचा ‘साक्षात आकार’ अनुभवायला मिळतो.
विश्वरुपदर्शन अशाच प्रकारचा अनुभव आहे. दिसणारी विविध रुपं ही प्रत्यक्ष निराकारातून व्यक्त झालीयत. इतकंच नव्हे तर व्यक्त झाल्यावरही ती निराकाराचाच आविष्कार आहे. नंतर ती निराकार परमात्म्यातच सामावली जाणार आहेत. प्रत्यक्ष पाहताना अर्जुनाला याची जाणीव नाहीये. भगवंत म्हणतात, ‘माझ्या एका अंशापासून ही सारी चित्र विचित्र रुपं निर्माण झालीयत. माझ्या एका अंशातच आता ती दिसताहेत. शेवटी माझ्याच अंशात ती विलीन होणार आहेत.
आपल्या प्रत्यक्ष जीवनाबद्दलही हे किती खरंय! निराकारातून आपण साकारात येतो. निरनिराळी रुपं- भूमिका साकारतो. पुन्हा काळाच्या पडद्याआड निराकारात विलीन होतो. आकाराला आलेलं, दिसणारं हे शाश्वत असू शकत नाही. नि जे खर शाश्वत आहे ते दिसू शकत नाही. अशी ही गंमत आहे.
पण सख्या अर्जुनावरील अतिस्नेहामुळे भगवंतांनी अमूर्त ते मूर्त – अदृश्य ते दृश्य नि अव्यक्त ते व्यक्त करून दाखवलं. अर्जुन, संजय यांच्या वर्णनामुळे आपल्यालाही या गोष्टी समजल्या. पण खर्या उमजल्या का?
‘धाकटा देव’ व थोरला (मोठा) देव’ असे शब्दप्रयोग समर्थ रामदास करतात. धाकट्या देवाच्या साकार मूर्ती करणारे त्या देवत्वाला किंवा दिव्यत्वाला साकार करतात का ? का तो दिव्यत्वाचा अनुभव… ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती|’ -सर्वांना येण्यासाठी काय केलं पाहिजे. एक साधं उत्तर – प्रत्येक कणाकणात – वस्तूवस्तूत भगवंताची स्थापना केली पाहिजे. सर्व सृष्टी पवित्र आहे. तिच्यात अपवित्र- अमंगल काहीच नाही. ही श्रध्दा सर्वप्रथम निर्माण झाली पाहिजे. अशा आस्थेला जिकडे पाहू तिकडे भगवंताचं जिवंत अस्तित्व जाणवू लागतं.
ज्ञानोबांचे शब्द किती थेट आहेत –
‘जे जे भेटे भूत | ते मानिजे भगवंत|
ऐसा भक्तियोग निश्चित | जाण माझा ॥
भक्तियोग जाणायचा म्हणजे भक्ती व ज्ञान यांची संयुक्त दृष्टी हवी. दुसरीकडे माऊली म्हणते…
‘हे विश्वचि माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपणची जाहला ॥
– यात सार्या विश्वाला घर मानणं (ङ्गिलिंग ऍट होम) हा केवळ हृदयाचा – भक्तिभावाचा विषय नाही तर ‘मती स्थिर करणं’ म्हणजेच बुध्दी स्थिर करणं’ महत्त्वाचं आहे. यानंतरच तादात्मीकरण (आयडेंटिङ्गिकेशन), एकरूपता, समरसता यांचा अनुभव येईल. यासाठी ज्ञानोबांचे शब्द आहेत –
‘किंबहुना चराचर आपणची जाहला|’
नुसतं विश्वरुप दर्शन एकाप्रकारे एकदम, आकाशाच्या पडद्यावर पाहणं ही गोंधळात टाकणारी घटना आहे. तिला दिली जाणारी प्रतिक्रिया ही बर्याच अंशी अर्जुनासारखीच असते.
अर्जुनाचे काही उत्स्ङ्गूर्त शब्द बरंच काही सांगून जातात–
१. सनातन: त्वं पुरुषो मतो मे |११|१८॥ – विश्वरुपाला अर्जुन ‘सनातन पुरुष’ म्हणतो. ज्याला आरंभ – मध्य – अंत नाही असा अनादि – अनंत सनातन पुरुष ! अशा रुपाची पूजा नाही करता येणार. या अनंत विश्वरुपाला पुष्पमाला कशी घालणार? आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा अवघड प्रकार आहे हा! ज्ञानदेव सुध्दा ज्ञानेश्वरीच्या शेवटी
‘मिया ङ्गुले मोकळी | वाहिली अंध्रियुगुली| विश्वरुपाच्या॥
म्हणजे विश्वरुपाच्या पावलांवर मोकळी ङ्गुलं वाहिली कारण त्या अनंत – असीम रुपासाठी माळ कशी गुंङ्गणार? ओव्या कश्या ओवायच्या?
आपल्या सोयीसाठी साधुसंतांनी त्या अनंताच्या मूर्ती बनवल्या अन् त्या मूर्तींची पूजा करताना भाव मात्र अमूर्त अनंताचाच ठेवायला सांगितलं. हेच तर मूर्तिपूजेचं रहस्य आहे. आज मूर्ती अलंकारांनी, वस्त्रांनी सजवण्याला भक्ती समजली, भव्य मंदिरांना महत्त्व देऊन दिव्यत्वाची प्रचीती घ्यायला कमी महत्त्व दिलं जातं. अशा वेळी ‘विश्वरूपदर्शनावरील चिंतन खूप मार्गदर्शक ठरू शकतं.’
२) स्वतेजसा विश्वमिदं तपंतम् | ११|१९॥ – सार्या विश्वाला आपल्या तेजानं तापवणारं विश्वरूप. सूर्यचंद्र हे ज्याचे डोळे आहेत, पेटलेला अग्नी हेच ज्याचे मुख आहे, ज्याचे सामर्थ्य अनंत आहे (अनंतवीर्यम्) अशा विश्वरूपाला पाहताना अर्जुन साहजिकच दिपून गेला. त्याला शब्द सुचेनासे झाले. असं तेज कां जे स्वयंभूपणे प्रकाशतंय. बाहेरून इंधन वा ऊर्जा पुरवण्याची आवश्यकता नाही. सर्व पदार्थातील हालचाल, चैतन्य सारं भगवंताचंच आहे हा अनुभव स्तिमित करणारा होता.
३) महर्षीसिद्धसंघाः स्तुवन्ति – या वर्णनात एक बारकावा लक्षात ठेवण्यासारखा आहे. विश्वरूप पाहून त्यात सामावून जाताना देवांनाही भय वाटलं-
‘केचित् भीताः सुरसंद्या प्रांजलयो गृणन्ति|११|२१’
म्हणजे कित्येक देवांचे समूह या भयानक विश्वरूपात प्रवेश करावा लागणार म्हणजेच आपलाही विनाश होणार या कल्पनेनं भिऊन हात जोडून शरणागतीपूर्वक पण अगतिकपणे विश्वनाथाचं (विश्वरूप परब्रह्माचं) स्मरण करत नाम घेत आहेत. पण त्याचवेळी ऋषीमुनींचे समुदाय (महर्षिसिद्धसंघाः) बिलकुल न घाबरता विश्वरूपाशी एकरूप होणार या कल्पनेनं (खरं तर ज्ञानानं) शांतपणे विश्वरूपाची स्तुती करत आहेत. फार मार्मिक दृश्य आहे!
४) बहूदरं बहुदंष्ट्राकरालम् – अर्जुन जे विश्वरूपाचं वर्णन करतोय त्यात काही शब्दप्रयोग पुन्हा पुन्हा आलेत.
उदा. ‘बहूदरं बहुवक्त्रनेत्रं बहुदंष्ट्राकरालम्..|’
असंख्य पोटं-मुखं-डोळे मुख्य म्हणजे असंख्य अकराळ विकराळ दाढा.. हे वर्णन एवढं भयकारक आहे तर ते दृश्य किती भयंकर असेल याची कल्पना केलेली बरी! या वर्णनाचा एक विशेष आहे. आरंभी विश्वरूपाच्या देवरूपाचं (पैलूचं) वर्णन आहे. नंतर उग्र रूपाचं व त्यानंतर अति उग्ररूपाचं वर्णन आहे. मृत्यूच्या दाढांचं (जबड्याचं) वर्णन हिरण्यकशिपूला मारणार्या ‘ज्वलंतं सर्वतोमुखम्’ वर्णनाच्या नृसिंहाशी जुळणारं आहे. अर्जुनानं व आपण नृसिंहाचं भय मनी न धरता प्रल्हादासारखं नतमस्तक होऊन त्या मृत्यूचा मृत्यू नृसिंहाला शरण गेलं पाहिजे. त्यासाठी हवी भक्ती नि परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान!
५) नमोऽस्तु ते देववर प्रसीद – हे विश्वरूप भगवंता, माझ्यावर प्रसन्न हो. हे परमदेवा (देववर) मी तुला शरणपूर्वक नमस्कार करतो. तू हे भयंकर रूप आवरून घे अन् नेहमीचं तुझं सामान्य रूप धारण कर. भगवंताच्या त्या उग्रविश्वरूपदर्शनानं अर्जुन मनोमन घाबरला. पण संजय भ्याला नाही. तसं तर व्यासांनी जशी संजयाला दिव्यदृष्टि दिली होती तशी भगवंतांनी अर्जुनालाही दिली होती. पण संजय अधिक अनुभवी व परिपक्व होता. त्यावेळी श्रीकृष्णाला भगवत्वरूपात जाणणारी चार माणसं होती – भीष्म, विदुर, संजय नि कुंती. त्यांना कधी भ्रम होत नव्हता. अर्जुनाचं तसं नव्हतं. तो कृष्णाशी सख्यत्वाच्या नात्यानं जोडला गेला होता म्हणून त्याच्याकडे तटस्थपणे, साक्षीभावानं पाहणं अर्जुनाला अवघड होतं.
विश्वरूप जरी अनेक आकार-देह-रूपं धारण करणारं असलं, देहाच्या डोळ्यांना जरी ते भयंकर दिसत असलं तरी बुद्धीच्या डोळ्यांनी (दिव्य दृष्टीनं, योग्य विचारानं) ते निर्गुण स्वरूपच वाटावं नि हा खरा विश्वरूपदर्शनाचा अनुभव!
गीतेतील प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे. कारण त्यात आलेला विषय हा मानवजीवनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा व सुसंगत आहे. तरीही नवव्या अध्यायातलं श्रीकृष्णाचं बोलणं हे सर्वांत मधुर आहे, असं ज्ञानोबांनाही वाटतं. दहावा व अकरावा अध्याय हे गीता जीवनात उतरवण्याच्या दृष्टीनं मोलाचे आहेत. व्यूह म्हणजे सर्वत्र पसरलेल्या भगवंताच्या विभूती व समूह म्हणजे त्या सार्या एकवटून झालेलं विश्वरूपदर्शन… जीवनाचा पूर्ण विचार इथं केला गेलाय.
विश्वरूपाचा कोणता संदेश(समुपदेशन) जीवनाच्या संदर्भात महत्त्वाचा आहे?
* परमेश्वराचं विश्वरूप – म्हणजे सार्या विश्वातील अणू नि रेणू, कण नि कण परमेश्वरी शक्तीनं भारलेला आहे. पर्यावरणाची पवित्रता या दृष्टीनं आपोआपच पाळली जाणार आहे. पण ही दृष्टी येण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण गंगेला पवित्र माता मानणारे आपण तिच्यात अर्धवट जळलेली प्रेतं सोडून देतो. काठावरील सार्या गावातलं सांडपाणी गंगेतच सोडलं जातं. एवढंच नव्हे तर अनेक कारखान्यांचं रासायनिक पदार्थ असलेलं पाणीही गंगेतच आणून सोडलं जातं. एकीकडून पावित्र्याची भावना तर दुसरीकडून पावित्र्यभंगाची कृती हे सारं थांबलं पाहिजे.
* कथनी नि करणी – आपण अग्नी, पाणी, वारा, भूमी, अवकाश या पंचमहाभूतात ईश्वरी अस्तित्व पाहतो. तशी सूक्तं किंवा स्तुतिस्तोत्रही रचतो. आपले विचार फार विशाल असतात. पण अनियंत्रित किंवा स्वैर वागण्यामुळे सार्या निसर्गाला प्रदूषित करून टाकतो. निर्माल्य टाकून सारे जलाशय घाण करतो. जमिनीवर तर कचर्याचं साम्राज्य निर्माण करतो. वाटेल ते प्लास्टिक, टायर्स यासारखे पदार्थ जाळून अवकाश विषारी धुरानं व्यापून टाकतो. याच्या जोडीला अगणित वाहनांच्या बेसुमार ओकला जाणारा वाहतुकीच्या ठिकाणावरचा धूर आहेच. दुर्गंधाच्या प्रभावामुळे वाराही अशुद्ध होतो. एकूण काय निसर्गाला राजा नव्हे, देव मानणारे, सृष्टीला राणी नव्हे देवी मानणारे आपण त्यांच्यावर सतत अत्याचार करत असतो. निसर्गमाता असेल तर आपण तिची कृतघ्न संतानं आहोत. विश्वरूप आपल्याला कळलेलंच नाही.
* सणा-समारंभातून दिला गेलेला संदेश – सृष्टिचक्राशी समांतर किंवा एकरूप असलेली एकमेव संस्कृती आहे आपली. स्वस्तिक हे प्रतीक या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. सणाची साजरा करण्याची पद्धत, सृष्टीतील निरनिराळ्या कालमाना-हवामानाप्रमाणे (ऋतुचर्या) सण साजरे करण्याची पद्धत हे सारं खूप चांगलं आहे. पण यामुळे विश्वात भरून असलेल्या भगवंताचं दर्शन-स्पर्शन होणं बाजूलाच, सृष्टीवर अत्याचार व बलात्कार करणं आपल्या नित्याच्या सवयीचं झालंय.
थोडक्यात विश्वरूप दर्शन म्हणजे सार्या सृष्टीला माता किंवा देवता मानून तिची पूजा किंवा सेवा करून तिचा भक्त, किमान मित्र बनून जगलं पाहिजे. सर्वत्र नमस्कार करणं हा उपचार झाला. सगळीकडे देवत्व पाहवून जाणीवपूर्वक पूज्य भावानं ‘विश्वमित्र’ बनलं पाहिजे. ‘भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ ही ज्ञानदेवांची प्रार्थना भावी पिढ्यांनी साकार करण्याचा संकल्प केला पाहिजे. अर्जुन नमस्कारही करतो. प्रसन्न हो म्हणतो. पुढे तर ‘क्षमा कर’ असंही म्हणतो. पण याहिपेक्षा गीतेच्या अंती व संपूर्ण युद्ध सुरू असताना – ‘करिष्ये वचनं तव|’ हे आपलं अभिवचन पूर्ण करतो. आपण वसुधा मातेला – वसुंधरा जननीला – असंच अभिवचन देऊ या. नाही तर दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिलेल्या अनेक कार्यक्रमांसारखा विश्वरूपदर्शन फक्त एक इव्हेंट ठरेल, हो ना!