गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न वादाचा विषय बनला आहे.
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील वादाचा विषय बनलेला हा प्रश्न दोन मुलांमधील संवादावर आधारित आहे. तू भविष्यासाठी कोणते नियोजन केले आहे, असा प्रश्न युवक आपल्या मित्राला करतो. गोव्यात नोकरीच्या कमी संधी उपलब्ध असल्याने आपण पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज केला आहे, असे उत्तर मित्राकडून दिले जाते. त्यावर तू चांगला निर्णय घेतला आहेत. वशिलेबाजी व पैशाशिवाय गोव्यात नोकरी मिळणे कठीण आहे, असे उत्तर युवक आपल्या मित्राला देतो.
गोवा शिक्षण मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न वादाचा मुद्दा बनला आहे. दहावीच्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न अनावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी व्यक्त केली. मुलांना मातृभूमीवर प्रेम करण्याचे शिक्षण दिले पाहिजे. मुलांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून दुही निर्माण करण्याचा प्रकार बंद केला पाहिजे. शिक्षण खात्याने या प्रकाराची दखल घेऊन चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी कुंकळ्येकर यांनी केली.