गोवा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी नियुक्त सत्यशोधन समितीने आपला अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंना काल सादर केला. यानंतर हा अहवाल राज्यपाल आणि गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर करण्यात आला असून, त्यांच्या पुढील निर्देशांची वाट पाहत आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी दिली. राज्यपालांनी प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाच्या आरोपाची गंभीर दखल घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय सत्यशोधन समितीची नियुक्ती केली होती. कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 48 तासांची मुदत सोमवारी दिली होती.
गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरीबाबत कुठल्याही प्रकारची लेखी तक्रार नाही, असे कुलगुरुंनी त्यावेळी स्पष्ट केले होते. गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर या द्विसदस्यीय चौकशी समितीची अहवाल ठेवला जाणार असून, त्याबाबत अंतिम निर्णय कार्यकारी मंडळ घेणार आहे, असे कुलसचिव सुंदर धुरी यांनी सांगितले.
एनएसयूआयने घेतली राज्यपालांची भेट
गोवा विद्यापीठातील कथित प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे आश्वासन राज्यपाल आणि गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एल. श्रीधरन पिल्लई यांनी एनएसयूआय आणि भारतीय युवा काँग्रेस यांच्या एका शिष्टमंडळाला काल दिले. एनएसयूआय गोवा विभागाचे प्रमुख नौशाद चौधरी आणि युवक काँग्रेसच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेऊन विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाबाबत निवेदन सादर केले. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
नौशाद चौधरी यांनी गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत सत्यशोधन समितीवर टीका करून तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. अशा प्रकारच्या कृती विद्यापीठाच्या विश्वासार्हतेला धोका निर्माण करतात आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणतात. प्रश्नपत्रिका चोरीची घटना लपविल्याचा आरोप असलेल्या विद्यापीठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
पोलिसांकडून चौकशी सुरू
दरम्यान, गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी काशिनाथ शेट्ये व इतरांनी आगशी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्याचे जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू केले आहे. प्रश्नपत्रिका चोरी संबंधी कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.