मनोहर पर्रीकर यांच्या परिवर्तन सरकारला गेल्या अडीच वर्षांच्या काळात काहीही साध्य करता आले नाही. प्रशासन पूर्णपणे कोसळल्याचा अनुभव जनतेला घ्यावा लागला, असा आरोप काल कॉंग्रेस प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकार परिषदेतून केला.
एखादा साधा निवासी दाखलाही लोकांना हवा असल्यास तो मिळत नसून त्यासाठी आमदाराकडे धाव घ्यावी लागते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पारदर्शक सरकारच्या गोष्टी करणार्या पर्रीकर सरकारकडून माहिती हक्क कायद्याखालीही लोकांना हवी ती माहिती मिळत नसल्याचा दावा आलेक्स यांनी केला. मागितलेली माहिती ही प्रचंड असून तेवढी माहिती देणे शक्य नाही असे सांगितले जाते किंवा फाईल गहाळ झाली असल्याचे कारण पुढे केले जाते, असा अनुभव आरटीआय कार्यकर्त्यांना येत आहे. अधिकार्यांना सेवावाढ देण्यास विरोधी पक्षनेते असताना पर्रीकर हे हरकत घेत होते. पण आता ते मोठ्या संख्येने अधिकार्यांना सेवावाढ देत असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले. पर्रीकर यांना चांगले प्रशासन देण्यात अपयश आले आहे. तसेच भ्रष्टाचार शून्यावर आणण्याच्या गोष्टी करणार्या पर्रीकर सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.