– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
बिल्वदलचे आभार मानायचे तेवढे थोडेच! अगदी ऐन श्रावणात त्यांनी संगीताची मेजवानी घडवून आणली होती… शुद्ध शाकाहारी! शाकाहारी जेवणाची लज्जत काय असते ते फक्त मांसाहारी लोकांनाच विच्चारायला हवे. अस्मादिक स्वत: पूर्णपणे मांसाहारी आहेत. पक्के गोवेकरी आहेत. विषय वेगळाच आणि आपण मेजवानीवरच बोलायला लागलोय. अहो राव, थांबा! श्रावण चालू आहे. ही होती संगीताची मेजवानी. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन चांगल्या संगीत नाटकांची पर्वणी सर्वांना लाभली. खरे सांगायचे असेल तर मला संगीत नाटकांत काहीही रस नव्हता. पण ती अजरामर नाटके न बघण्याची संधी बिल्कुल दवडणार नव्हतो.
पहिले नाटक – संगीत मत्स्यगंधा! रामदासजी कामत यांचे ते नाटक बघायचे भाग्य तेव्हा लाभले नव्हते. तरीदेखील थोडी फार तहान भागवण्याची इच्छा होतीच. सुरूवातीच्या क्षणापासून नाटक अफलातून झाले. पराशर… सत्यवती यांच्यामधले ते प्रसंग तर भलतेच होते. त्यांत त्या नामांकित गाण्यांची मैफल तर जीवाला सुखावून गेली. मी त्या नाटकांत अगदी शिरलो. आस्वाद घेत राहिलो. राजे शंतनु सत्यवतीच्या विरहाने व्याकुळ होऊन आपल्या राज्याकडे निघून गेले.
रंगमंचावर काळोख पसरला. प्रत्येकाचे लक्ष पडद्याकडे लागलेले. उत्कंठा शिगेला पोचलेली. लाइट ऑन झाली. शंतनु विरहाने पछाडलेले… रंगमंचावर प्रवेश करते झाले. पण गोव्यातल्या कुणा एका रस्त्यावर… मागे लाइटचे खांब, वर वीजेचे दिवे लावलेले… रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठाली घरे… चित्रकार गोव्याचाच असावा. कारण ती सगळी घरे गोव्याच्या भागातीलच होती. ती पाहून पणजीच्या ‘लुई द पोर्ट’ची आठवण झाली. महाभारतातील थोर राजे शंतनु अक्षरश: आधुनिक शहराच्या रस्त्यावर शोकाकुल अवस्थेत भटकत होते. त्यांचे सांत्वन करायला देवव्रतही आले.
रवींद्र भवन, साखळीची भव्यता एवढी होती की तिथे छोटे पडदे चालू शकत नव्हते. नेहमीच्या नाटकांचे सेट रंगमंचावर खुजे वाटत होते. दहा-पंधरा दिवसांपूर्वी ह्या पुण्याच्या संस्थेतील व्यवस्थापक मंडळी पाहणी करून गेले होते; तरीदेखील ही उणिव भयंकर भासली. आपल्या राजमहालांत विरहात कासावीस झालेले महाराज रस्त्यावर आलेले बघवले नाही. प्रेक्षकांपर्यंत कुजबुज सुरू झाली. प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. नाटकांत काम करणारी पात्रे आपल्या पात्रांत रंगून गेलेली. पाठीमागच्या पडद्याची फिकीर न बाळगता… फाडफाड करत आपली भाषणे म्हणत चाललेले. ते सगळेजण ‘प्रोफेशनल’ होते. पण आम्ही नव्हतो ना! अखेर एकाचा पडदा पडला अन् आमची एकदाची सुटका झाली.
गोवेकरी केव्हाच बंड करत नाहीत. नाहीतर ‘गर्जा जयजयकार’ मध्ये ज्यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला त्यात एकटाही गोवेकरी नव्हता. सगळे गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक… ताम्रपटवाले खाली प्रेक्षकगृहात बसले होते. म्हणूनच पोर्तुगीजांनी इतकी वर्षे गोव्यावर राज्य केले. खायला व प्यायला मिळाले की पुरे… बाकीच्या भानगडी कुणाला हव्यात व तशी सोय पण सरकारने करून ठेवलेली आहे. राज्यभर खा, प्या… मजा करा!
एकाचा पडदा पडल्याक्षणी प्रत्येकाच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. एकटी प्रौढ महिला तर बोलती झाली. पडद्यावरचे विजेचे खांब डोके खाऊन गेले. राजमहालाच्या जागी मोठी घरे परवडली असती! डोळ्यासमोर ‘मामा मोचेमाडकर’ची कंपनी आली. मामा म्हटल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर घनघोर लढाई उभी राहते. लहानपणापासून मला मोचेमाडकरांचे नाटक आवडते. आताही जवळपास नाटकाचा बोर्ड लागला असेल तर तिथे मी अजूनही न चुकता जातो. एकतरी लढाई बघूनच येतो. बालपणात त्यांच्याच सारखे नाचत नाचत लढाई करताना मजा करायची भारी हौस. फरक एवढाच की आमच्या शरीरावर ती आभूषणे नव्हती. हातात तलवार पण नव्हती. नाटकाचा पूर्वार्ध संपल्यावर राजाचे पात्र तिथे ठेवलेल्या बाकावर बसायचे. त्या नाटकाचा सर्वेसर्वा स्वत: मालक… पायपेटीवर तेच बसलेले. जवळच तबलेवाला बसलेला असायचा. तिसरा झांज घेऊन बसलेला. जवळच ते पात्रांना बसायचे बाकडे. सेट संपला. पाठमोरा तो पडदा आयोजकांनी लावलेला असायचा. तो नसला तरी चालतो. पडदा नसला तर नाटकातील पात्रे बाकामागे उभे राहिलेल्या घोळक्यामागून यायची. पहिले पात्र बाकड्यावर बसायचे… लांबलचक भाषण म्हणायचे… आपला परिचय करून द्यायचे. सभोवताली पसरलेला परीसराचा उल्लेख करत जायचा… इथे येण्याचे प्रयोजनही लोकांना समजावयाचे.
‘‘या अरण्याच्या ठिकाणी वास करणार्या..’’ असे म्हटले की समजायचे की सभोवताली भयानक अरण्य पसरले आहे. मग त्याचे पाठांतर केलेले प्रचंड उतारे ऐकतच राहायचे म्हणजे रितसर सगळा उलगडा व्हायचा. त्यानंतर येणारे पात्र जर म्हणत असेल की आपण इंद्राच्या दरबारात बसलेलो आहोत ते बाकडे म्हणजे इंद्राचे राजसिंहासन आहे असे समजून, आपल्या पुढे अप्सरा नाचताहेत हेही कळून चुकते. असेच नाटक रात्रभर चालूच राहते व संपतेही. डोक्यात काहीही भ्रम राहत नाही.
राजे शंतनु सत्यवतीच्या विरहाने व्याकुळ झालेले. मीही त्या पडद्याकडे बघत व्याकुळ झालेलो ते विसरत मामा मोचेमाडकरांचे नाटक डोळ्यासमोर आणत त्या शंतनु व देवव्रताच्या प्रवेशाचा स्वाद घेतला. मत्स्यंगधा नाटक संपले. आता पुढच्या दोन नाटकांच्या वेळी डोळ्यासमोर कोणता पडदा येणार हा विचार करत घरी परतलो. रात्रीचे ११.४५ वाजले होते. आयोजकांनी झाल्या गोष्टीबद्दल भाष्य टाळले. माझीही बोलती बंद झाली होती. आयोजकांपैकी मीही एक होतो ना…! ‘मामां’ची आठवण रवींद्र भवनातील प्रेक्षकांना करून दिल्याचे समाधान वाटत होते.
………