प्रवीण बांदेकर, माया खरंगटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

0
33

साहित्य अकादमीचे २०२२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा साहित्य पुरस्कारांसाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबर्‍यांची निवड करण्यात आली. मराठीत ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, तर कोकणीत माया अनिल खरंगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून, ११ मार्च २०२३ रोजी नवी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

याचबरोबर, ‘इन गुड फेथ’ या सबा नकवी लिखित इंग्रजी पुस्तकाच्या ‘सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, यंदा इंग्रजीसाठी अनुराधा रॉय यांच्या ‘आल द लाईव्हज व्हेनेव्हर लिव्हड’ या पुस्तकाची, तर हिंदीसाठी ‘थुमाडी के शब्द’ या बद्रीनारायण यांच्या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. साहित्य अकादमीचा बंगालीसाठीचा, तसेच कोकणी व हिंदीसह ७ भाषांसाठीचे अनुवाद पुरस्कार नंतर जाहीर केला जाईल.

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबर्‍या, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व ऐतिहासिक कथासंग्रहांचा समावेश आहे.
प्रवीण दशरथ बांदेकर हे मराठी साहित्यिक असून, त्यांचे तीन कवितासंग्रह, दोन ललित लेखसंग्रह, दोन कादंबर्‍या आणि बालसाहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत.

माया खरंगटे यांची आतापर्यंत ४२ पुस्तके प्रकाशित
माया खरंगटे यांची आतापर्यंत ४२ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यात ४ कथासंग्रह, २ कवितासंग्रह, १ पत्रसंग्रहाचा समावेश आहे. तसेच बालसाहित्यावर आधारित त्यांची २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय तीन पुस्तकांचा त्यांनी कोकणी भाषेत अनुवादही केला आहे. ‘अमृतवेल’ ही माया खरंगटे यांची कादंबरी कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेली एक अप्रतिम अशी कादंबरी आहे.

‘कोलेदादाची पालकी’ या पुस्तकासाठी त्यांना एनसीईआरटीचा बालसाहित्य पुरस्कार मिळालेला आहे. ‘रानाच्या मनांत’ या पुस्तकासाठी देखील त्यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.