प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष वाहतूक ऍप सेवा सुरू करणार

0
10

>> वाहतूकमंत्र्यांची माहिती; मोपा विमानतळावर ओला, उबर सेवा येणार

प्रवाशांच्या सोयीसाठी एक विशेष वाहतूक ऍप सेवा सुरू करण्यात येणार असून, या ऍपद्वारे प्रवाशांना प्रीपेड टॅक्सीसेवा, रेंट-अ-कार टॅक्सी सेवा, इलेक्ट्रिक बसेस, रिक्षा आणि मोटरसायकल पायलट यांची सेवा मिळवता येईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली.

सध्या राज्यात केवळ गोवा माईल्सची टॅक्सी ऍप सेवा उपलब्ध आहे; पण आता आम्ही वरील सर्वांनाही ऍप सेवेशी जोडणार आहोत. तंत्रज्ञान वेगाने वाढत चालले असून, त्याचा फायदा जगभरातील लोक उठवत आहेत. आणि मोठे पर्यटन स्थळ असलेले गोवा राज्य हे आता तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत मागे राहू शकत नसल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

मोपा हा खासगी विमानतळ असून, तेथे सर्व प्रकारच्या टॅक्सी सेवा सुरू होतील. त्यात ओला, उबर, गोवा माईल्स आदींचा समावेश असेल. या टॅक्सीसेवा जर गोमंतकीय टॅक्सीचालकांनी दाबोळी विमानतळावर सुरू करू दिल्या नाहीत, तर पर्यटक दाबोळीवर उतरणार्‍या विमानातून येणे बंद करतील, असेही गुदिन्हो म्हणाले. आपण गोमंतकीय टॅक्सीचालकांची बैठक घेऊन त्यांना याविषयी कल्पना दिली असल्याचेही ते म्हणाले.