प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा; मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

0
1

>> उत्तरप्रदेशच्या 2 मंत्र्यांनी पणजीत आयोजित केला विशेष रोड शो; 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ चालणार; 45 कोटी भाविक, साधू-संत व पर्यटक सहभागी होणार

13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार असून, त्यात विक्रमी 45 कोटी तीर्थयात्री, साधू-संत व पर्यटक सहभागी होणार असल्याची माहिती काल उत्तर प्रदेशचे कॅबिनेटमंत्री दारा सिंह चौहान व राज्यमंत्री रामकेश निशाद यांनी काल पणजीत येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही मंत्र्यांनी गोव्यातील लोकांनी मोठ्या संख्येने महाकुंभ मेळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी केले. याशिवाय प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यानिमित्त पणजीत आयोजित केलेल्या ‘रोड शो’चे काल मंत्री दारा सिंह चौहान व रामकेश निशाद यांनी नेतृत्त्व केले. दरम्यान, उत्तरप्रदेशच्या दोन्ही मंत्र्यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना महाकुंभमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.

‘न भूतो’ अशा ह्या महाकुंभ मेळाव्याची तयारी सध्या जोरात सुरू असल्याची माहिती वरील द्वयींनी पत्रकार परिषदेतून बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली 13 जानेवारीपासून प्रयागराज येथील गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा महाकुंभ मेळावा थाटात सुरू होणार असल्याचे दारा सिंह चौहान यांनी सांगितले. हा कुंभमेळावा हा स्वच्छ व सुरक्षित तर असेलच शिवाय तो हरितही आणि डिजिटलही असेल. महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या तीर्थयात्रींना आरोग्यविषयक काही समस्या निर्माण झाल्या, तर त्यांना उपचार घेता यावेत यासाठी 100 खाटांचे इस्पितळ परेड ग्राऊंडवर उभारण्यात येणार असून त्याशिवाय आणखीही काही छोट्या-मोठ्या इस्पितळांची सोय करण्यात येणार आहे. ही इस्पितळे 24 तास सुरू राहणार असून, 291 एमबीबीएस डॉक्टर ड्युटीवर असतील. त्याशिवाय 90 आयुर्वेदिक व युनानी तज्ज्ञ आणि 182 परिचारिकाही इस्पितळात असतील. तेथे महिला, पुरुष व मुलांसाठी वेगळे वॉर्ड असतील. त्याशिवाय प्रसूती विभाग व आपत्कालीन विभागही असेल. डिजिटल महाकुंभ मेळाव्यासाठी वेबसाईट व ॲप तयार करण्यात आले असून, एआय चॅटबॉट (अकरा भाषांसाठीचे) तसेच लोक व वाहनांसाठी ‘क्युआर’ आधारित पासेस असतील, असे चौहान यांनी सांगितले.

नव्या 9 घाटांची निर्मिती
पाच लाख वाहने पार्क करता येईल एवढी जमीन ताब्यात घेण्यात आलेली असून, ती 1867 हेक्टर एवढी असल्याचे दारा सिंह चौहान म्हणाले. सध्या उपलब्ध असलेल्या 35 घाटांबरोबरच नवे 9 घाट महाकुंभ मेळ्यानिमित्त बांधण्यात आले आहेत. या 44 घाटांवर विमानातून पुष्पवृष्टी होईल.

तीन लाख झाडांचे रोपण
हरित कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे तीन लाख झाडे लावण्यात आली आहेत. तसेच महाकुंभमेळ्यात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्वच्छतेसाठी 470 विद्यालयांच्या प्राचार्यांशी बैठका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती दारा सिंह चौहान यांनी दिली.

विविधतेत एकतेचे प्रतीक म्हणजे महाकुंभ
यावेळी बोलताना रामकेश निशाद हे म्हणाले की, कुंभ हा फक्त एक मेळा व पवित्र स्नान नसून, भारताची एकता व विविधता याचे तो एक प्रतीक आहे. महाकुंभ मेळा हा मतभेद, वाद व विभाजन यांना मुठमाती देणारा मोठा पवित्र असा महोत्सव असून, त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर हे सगळे भेद व मतभेद वाहून जात असल्याचे ते म्हणाले. हा महोत्सव फक्त भारतासाठीच महत्त्वाचा नसून, भारतीय संस्कृती मानणाऱ्या जगभरातील लोकांसाठी महत्त्वाचा असल्याचे निशाद यांनी नमूद केले.

उत्तरप्रदेश सरकारकडून मुख्यमंत्री, राज्यपालांना निमंत्रण
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान व जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निशाद यांनी काल गोव्याचे राज्यपाल पी. एन. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली व त्यांना महाकुंभमेळाव्यासाठीचे आमंत्रण दिले. वरील द्वयींनी काबो राजनिवास येथे जाऊन राज्यपाल पिल्लई यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना महाकुंभ मेळ्यासाठीचे निमंत्रण दिले.