>> मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिले होते आश्वासन
>> विकासासाठी सरकारचे पाऊल
गोवा पुनर्वसन मंडळाने राज्यातील झुवारीनगर (वास्को), चिंबल (सांताक्रुझ), कामराभाट (पणजी) आणि पर्वरी येथील चार प्रमुख झोपडपट्ट्यांचे टोपोग्राफिकल सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झुवारीनगर येथे एका सांडपाणी निचरा प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात राज्यातील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. ‘त्या’ पार्श्वभूमीवर गोवा पुनर्वसन मंडळाने प्रमुख झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून तेथील एकंदर परिस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. झोपडपट्ट्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
झुवारीनगर ही राज्यातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी सुमारे दीड ते दोन लाख चौरस मीटरच्या जागेत वसलेली आहे. चिंबलमधील झोपडपट्टी साधारण पन्नास ते साठ हजार चौरस मीटर जागेत वसलेली आहे. तर कामराभाट, पर्वरी येथील झोपडपट्यांचे क्षेत्र कमी आहे. या प्रमुख झोपडपट्ट्यांमध्ये साधन सुविधांचा अभाव आहे. सर्वेक्षणातून झोपडपट्ट्यांच्या भागातील आताचे रस्ते, वीज, दूरध्वनी, जलवाहिनी, विहिरी, झोपड्या आदींची माहिती तयार करून घेतली जाणार आहे. एखाद्या भागात पावसाळ्यात पूर येत असल्यास त्याविषयी माहिती अहवालात द्यावी लागणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
मंडळाने या सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा प्रस्ताव मागविले आहेत. मागील पाच वर्षांत किमान ३ मोठ्या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केलेल्या कंपन्या आपले निविदा प्रस्ताव सादर करू शकतात. येत्या ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत निविदा प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.