- डॉ. सीताकांत घाणेकर
योगसाधना- ५४८
अंतरंगयोग- १३२
आपले हात म्हणजे पुरुषार्थाचे प्रतीक. त्या हातांनी कष्ट करून, काम करून मी चांगल्या मार्गाने धन कमवीन अशी खुमारी प्रत्येक व्यक्तीला हवी. म्हणूनच तर भारतीय संस्कृतीतील उदाहरणे दिली जातात. त्यात लहान बालक आहेत, तरुण आहेत व पराक्रमी वीरदेखील आहेत.
विश्वातील प्रत्येक देशात विविध धार्मिक प्रथा आहेत. बहुतेकजण या कर्मकांडात्मक प्रथेचे पालन करतात. त्यामागील दृष्टिकोन अथवा तत्त्वज्ञान जाणत नाहीत. अथवा जाणून घेण्याचा प्रयत्नदेखील करीत नाहीत. तसे पाहता प्रत्येक प्रथेमागे विशिष्ट हेतू असतो. हे सगळे अभ्यास करून समजून-उमजून केले तर ते कर्मकांड करतानादेखील उत्साह-उमेद येते; नाहीतर करायचे म्हणून केले तर कंटाळा येतो.
भारतीय संस्कृतीप्रमाणे एक प्रथा म्हणजे प्रातःकाळी उठता-उठताच करदर्शन करणे आणि त्याबरोबर एक साधी-सोपी प्रार्थना म्हणणे-
कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वती|
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्॥
- हाताच्या अग्रभागावर (बोटांवर) लक्ष्मीचा वास आहे.
- मूळभागावर सरस्वती राहते.
- मध्यभागी गोविंदाचे वास्तव्य आहे.
म्हणून सकाळी हाताचे दर्शन घ्यावे.
या श्लोकामध्ये असे अभिप्रेत आहे की, लक्ष्मी, विद्या व भगवान आपल्या हातावरच आहेत. याचा शब्दार्थ जरी बघितला तर एक गहन मुद्दा समजतो की, यांना प्राप्त करणे मानवाच्या हातातील गोष्ट आहे. हा गर्भितार्थ आहे ही जाणीवच हृदयगम्य आहे. पण त्यामागे जीवनाचे एक उच्च तत्त्वज्ञान आहे, ते समजले तर हा श्लोक प्रेरणादायी ठरेल.
- हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे. आपले सर्व काम बोटांच्या अग्रभागानेच करतो आणि तिथेच लक्ष्मीचा वास आहे. मानव आपल्या स्वहस्ते उद्योग करूनच धन कमावतो.
- हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजे विद्या आहे. याचा भावार्थ म्हणजे, आपल्या प्रत्येक कार्याच्या पायात ज्ञान असायला हवे. आपणातील प्रत्येकाला विविध क्षेत्रांतील ज्ञान आहे. ते वापरूनच आपण धन कमावतो, उदरनिर्वाह चालवतो, आपल्या सुखसोयी मिळवतो. खर्या ज्ञानाशिवाय संपत्ती प्राप्त होत नाही.
लक्ष्मी व सरस्वती या विश्वातील दोन महान शक्ती आहेत- - सरस्वतीजवळ दृष्टी आहे आणि लक्ष्मीजवळ सामर्थ्य आहे. वित्ताशिवाय विद्या पंगू आहे, तर विद्येशिवाय वित्त अंध आहे.
या दोन्ही शक्ती एकमेकांना पूरक आहेत. दोन्हीची प्रत्येकाला अत्यंत गरज आहे.
या दोन्ही शक्तींची पवित्रता लक्षात घ्यायला हवी. समाजात अनेकांना या दोन्ही शक्ती प्राप्त होतात. अर्थात त्यांचे कष्ट आहेतच. प्रारब्धदेखील आहे. पण काहींना त्यांची नशा चढते. ते अहंकारी व उन्मत्त बनतात. मग ते रामायणातील रावण बनतात अथवा महाभारतातील दुर्योधन.
म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मध्यभागात गोविंद वसवला आहे. यामागील भाव व तत्त्वज्ञान समजायला हवे. ह्या दोन्हींचा व्यक्ती कसा उपयोग करते यावर गोविंदाचे लक्ष आहे. म्हणून या शक्तींचे पावित्र्य समजले तर त्यांचा दुरुपयोग होणार नाही. वित्तमद व विद्यामद येणार नाही.
परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले इथे एक छान मुद्दा सांगतात-
‘आपल्या हाताची पाचही बोटे असमान आहेत. पण त्यांना जर हाताच्या मध्यभागात आणण्यात आले तर समान असतात. त्याप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणार्या लक्ष्मीला जर प्रभूबरोबर जोडण्यात आले तर ती समानता निर्माण करते. प्रभूच्या दरबारात श्रीमंत-गरीब हा भेद असत नाही. सर्वच एका प्रभूची लेकरे समजली जातात.’’
यापुढे थोडे मनन, चिंतन केले तर लक्षात येईल की, ज्या हातावर भगवंताचा वास आहे, त्या हाताने मी कसलेही दुष्कर्म करणार नाही, जेणेकरून भगवंताला त्रास होईल, वाईट वाटेल, राग येईल. आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन सत्कर्मच करीन. भगवंताला आनंदी बनवीन. पुण्य कमवीन.
अनेकजण हात भीक मागण्यासाठी वापरतात. पैशांची भीक, नोकरीची भीक… त्यामुळे त्याक्षणी आपण भगवंताला लाचार करतो.
आपले हात म्हणजे पुरुषार्थाचे प्रतीक. त्या हातांनी कष्ट करून, काम करून मी चांगल्या मार्गाने धन कमवीन अशी खुमारी प्रत्येक व्यक्तीला हवी. म्हणूनच तर भारतीय संस्कृतीतील उदाहरणे दिली जातात. त्यात लहान बालक आहेत, तरुण आहेत व पराक्रमी वीरदेखील आहेत.
- ध्रुवाने विष्णूची उपासना केली, तप केले व अढळ पद मिळवले.
- प्रल्हादाने स्वतःच्या पित्याशी टक्कर दिली. श्रीविष्णूचा तो लाडका भक्त ठरला.
- भील्लपुत्र एकलव्याने स्वपुरुषार्थाने उच्च कोटीची धनुर्विद्या प्राप्त केली, कारण गुरू द्रोणाचार्याने त्याला विद्या देण्यास नकार दिला होता.
- कर्णाने परशुरामासारख्या क्षत्रिय-द्वेषी गुरूकडून विद्या प्राप्त केली.
ज्या व्यक्तीमध्ये स्वरुपुषार्थाने धन कमावण्याची शक्ती होती ते सर्वदान यज्ञ करीत असत. उदा. रघुराजाने असा यज्ञ केला व स्वशक्तीने परत धन कमावले. - बाळ नचिकेताने तर यमाकडून आत्मविद्या प्राप्त केली. कठोपनिषदामध्ये याबद्दल सर्व वर्णन आहे.
हे सर्व एवढे कर्तृत्ववान होते की भगवंताचे लाडके होते. प्रातःस्मरणी स्वतःचे करदर्शन करताना यांची आठवण केली तर प्रत्येकाच्या जन्माचे सार्थक होईल.
ब्राह्ममुहूर्ताला- सकाळच्या प्रहरी- हाताचे दर्शन करून प्रत्येकाने पुरुषार्थाची प्रतिज्ञा करायला हवी. कारण परमेश्वर त्यांनाच मदत करतो. म्हणून शास्त्रकार म्हणतात की मानवप्रयत्न व ईश्वरकृपा दोन्हीही आवश्यक आहेत. म्हणूनच आपण म्हणतो- ‘प्रयत्नांती परमेश्वर!’
भगवद्गीतेतील शेवटचा श्लोक (१८.७८) या संदर्भात फारच बोधक वाटतो.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः|
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥
- जेथे योगेश्वर कृष्ण आणि जेथे धनुर्धर पार्थ- तेथेच श्री (लक्ष्मी), विजय, शाश्वत ऐश्वर्य आणि नीती ही ठेवलेलीच आहे असे माझे मत आहे.
अर्जुन म्हणजे पुरुषार्थाचे प्रतीक, प्रयत्नांचे प्रतीक आहे. द्युतांत हरल्यावरदेखील त्याने धीर सोडला नाही. वनवासात असताना श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे दोन प्रमुख अस्त्रे त्याने मिळवली- - पशुपतास्त्र- भगवान शंकराशी (भील्लाच्या रूपात) युद्ध करून मिळवले.
- ब्रह्मास्त्र- इंद्राच्या दरबारात जाऊन मिळवले.
महाभारत युद्धात विषादामुळे तो सुरुवातीला थोडा हतबल झालेला दिसतो, पण त्याचा आत्मविश्वास कायम असतो. त्याच्या शरीराला कंप सुटतो. गांडीव धनुष्य हातातून गळून पडते ते भीतीमुळे नाही तर मोहामुळे. आपल्या आप्तेष्टांना, पितामह भीष्म, गुरू द्रोण यांना का मारावे- या विचाराने.
कर्तव्यापासून थोडा वेळ तो दूर गेलेला अवश्य दिसतो, पण श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशानंतर तो परत लढाईला तयार होतो. भगवंताच्या सहकार्याने युद्धात विजयी होतो.
आपणदेखील तीच जाणीव ठेवूया की, आपल्या हाताच्या मध्यभागी गोविंद आहे. आपण सत्य व धर्माचरण केले तर आम्हाला विजय मिळेलच. दोन्ही महान शक्ती- विद्या व वित्त प्राप्त होतील.
दरदिवशी करदर्शनाच्या वेळी हे सर्व तत्त्वज्ञान अवश्य आठवण करावे. सर्वांचे कल्याण होईल.
आपले योगसाधक नक्कीच असे करत असतील.
(संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- ‘संस्कृती पूजन’)