प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षपदी गिरीश चोडणकर नियुक्त

0
164

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अखेर गिरीश चोडणकर यांची काल नियुक्ती करण्यात आली.
गोवा प्रदेश समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी अलीकडेच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक जण उत्सुक होते. त्यात माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, युवा नेते गिरीश चोडणकर, ऍड. यतीश नाईक, आमदार आलेक्स रेजिनाल्ड व इतरांचा समावेश होता. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी आमदार व प्रदेश समितीच्या पदाधिकार्‍याशी चर्चा करून अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना सादर केला होता. चोडणकर सध्या अ. भा. कॉंग्रेसचे चिटणीसही आहेत.

कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षपदी चोडणकर यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अशोक गेहलोट यांनी नवी दिल्ली येथे काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. मावळते अध्यक्ष शांताराम नाईक यांच्या पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या कार्याची पक्ष संघटनेने दखल घेतली आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

प्रादेशिक पक्षांशी चांगले
संबंध ठेवावे ः शांताराम
मावळते प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चोडणकर यांनी कॉंग्रेस पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर द्यावा. कॉंग्रेसचे आमदार नसलेल्या मतदारसंघातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी सूचना नाईक यांनी केली. राज्यातील प्रादेशिक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड, मगोप, तसेच अपक्ष आमदारांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. कॉंग्रेस पक्षाला भविष्यात त्यांच्या पाठिंब्याची गरज भासू शकते, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

चोडणकरना सहकार्य ः कवळेकर
नवीन प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांना कॉंग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

तो’ पर्याय खुला आहे ः गिरीश
कॉंग्रेस पक्षाचे गट स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यास प्राधान्य देणार आहे, अशी प्रतिक्रिया नूतन प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी व्यक्त केली. बहुमत नसल्याने कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही. परंतु, कॉंग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलाची पुनःस्थापना करण्याचा पर्याय खुला आहे. त्यासाठी सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांनी या सरकारला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला पाहिजे, असेही चोडणकर यांनी सांगितले.