प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांचे नाव जवळपास निश्चित

0
1

भारतीय जनता पक्षाकडून शनिवारी होणार अधिकृत घोषणा

फातोर्ड्याचे माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान सरचिटणीस दामू नाईक यांची गोवा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड जवळजवळ निश्चित झाली असून, येत्या शनिवार दि. 18 जानेवारीला भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
गोवा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शुक्रवार दि. 17 जानेवारीला उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. गोवा प्रदेश भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रदेशाध्यक्षांच्या निवडीनंतर संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मंडळ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झालेली आहे.

भाजपच्या गाभा समितीने प्रदेशाध्यक्षपदासाठी दामू नाईक यांच्याबरोबर ॲड. नरेंद्र सावईकर, चंद्रकांत कवळेकर, दयानंद मांद्रेकर, गोविंद पर्वतकर, दिलीप परुळेकर, दयानंद सोपटे यांच्या नावाची शिफारस भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. त्यापैकी विद्यमान सरचिटणीस दामू नाईक यांच्या नावावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे.

दामू नाईक यांनी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून 1994 पासून कामाला सुरुवात केली. यानंतर 1999 मध्ये राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला. फातोर्डा मतदारसंघातून 2002 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले. 2012 च्या निवडणुकीत दामू नाईक यांना पराभव पत्करावा लागला. दामू नाईक यांनी भाजयुमोचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय युवा मोर्चाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. भाजपच्या राज्य संघटनेमध्ये विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. याशिवाय भाजपचे प्रवक्ते म्हणून काम पाहिले आहे. मडगाव येथील रवींद्र भवनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.