प्रदूषण नियंत्रणासाठी रिसाईक्लिंग उद्योगांना प्राधान्य हवे : विरेंद्र सिंग

0
155

देशातील पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी रिसाइक्लिंग उद्योगांना प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे. रिसाइक्लिंग उद्योगाला वेगळा खास दर्जा देऊन विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय स्टीलमंत्री चौधरी विरेंद्र सिंग यांनी काल येथे केले. मॅटल रिसाईक्लिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या बांबोळी येथे आयोजित पाचव्या एमआरएआय आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री सिंग बोलत होते. यावेळी केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, सुरेंद्र पटवारी, असोसिएशनचे अध्यक्ष संजय मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.

परदेशातून भंगार
स्टील भारतात
रिसाइक्लिंग उद्योग बड्या उद्योगाची मक्तेदारी बनू नये म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे. देशात मोठ्या प्रमाणात स्क्रॅप स्टील परदेशातून आणले जात आहे. उत्तर भारतात दोन मोठे स्क्रॅप प्लॉन्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे. या उद्योगाला भेडसावणार्‍या जीएसटी, शुल्क व इतर समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे, असेही मंत्री सिंग यांनी सांगितले.

देशात रिसाइक्लिंग उद्योग चालना देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे खाण मंत्री तोमर यांनी सांगितले. रिसाइक्लिंग हे मोठे क्षेत्र आहे. यात विविध प्रकारच्या स्क्रॅपची हाताळणी केली जाते. या उद्योगातून स्वच्छता, मेक इन इंडिया, रोजगार निर्मितीला चालना मिळते. या क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणार्‍या जीएसटी, आयात शुल्क व इतर समस्यांची जाणीव असून या समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रयत्न केला जाणार आहे, असेही तोमर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने रिसाइक्लिंग धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सागर माला प्रकल्पाअर्तंगत शीप ब्रेकींग उद्योग स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. सारस्वत यांनी दिली. केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन रिसाइक्लिंग उद्योजकांना भेडसावणारा जीएसटीचा विषय मांडणार आहे, केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी सांगितले. ई कचरा, स्क्रॅप व इतर प्रकारचा कचरा हाताळण्यासाठी खास धोरण तयार करण्याची गरज आहे. रिसाइक्लिंग उद्योगात विदेशातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ शकते, असे सुरेंद्र पटवारी यांनी सांगितले. असोसिएशनचे अध्यक्ष संजय मेहता यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.