प्रदूषणाचा हृदयावर घातक परिणाम

0
165
  •  डॉ. बिपीनचंद्र भामरे
    (हृदयरोगतज्ज्ञ, सर एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर)

वायुप्रदूषण आणि त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम दिवसेंदिवस घातक होत चालले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की वायुप्रदूषण केवळ श्वसनविकार किंवा फुफ्फुसांच्या कर्करोगालाच आमंत्रण देत नाही तर ते आपल्या हृदयासाठीदेखील हानीकारक ठरू शकते. वाहने, कंपन्या, लाकूड जाळणे, स्वयंपाक, धूम्रपान आणि धूळ यांसारख्या बर्‍याच स्रोतांमधून वायुप्रदूषण होते.

श्वासोच्छ्‌वासातून वातावरणातील प्रदूषणाचे कण आपोआप शरीरात जातात आणि त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात.

वायुप्रदूषणामुळे ऍथरोस्लेरोसिस, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका यांसारखे गंभीर परिणाम दिसून येतात. धुळीचे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबाच्या वाढीस कारणीभूत ठरतात. हवेतील प्रदूषके शरीरात सुपरऑक्सिडाईज्ड रेणूची वाढ करतात व ते शरीरपेशींचा विध्वंस करतात. त्यामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि त्याहीपेक्षा रक्तवाहिन्या व हृदयाला इजा पोहोचते. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात.
प्रदूषणात वावरणार्‍या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका, मेंदूतील रक्तस्राव व हृदयक्रिया बंद होण्याचे प्रकार दिसून येतात. फुफ्फुसात हवा शोषून घेण्यासाठी स्पंज असतो. या स्पंजाचे काम हवेतील प्राणवायू शोषून घेणे तसेच श्वसनमार्गाचे कार्य सुरळीत ठेवणे हे असते. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे त्यात अटकाव निर्माण होतो. काही धूलिकण अडकतात. संसर्ग होतो आणि फुफ्फुसाची काम करण्याची क्षमता कमी होते. याच कारणांमुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वेगाने खालावते.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
बाहेर फिरताना चांगल्या दर्जाचे मास्क वा हेल्मेट घालून वा रोज स्वच्छ धुतलेले फडके नाकावर बांधून जावे. प्रदूषित हवेत फिरणे टाळा. जर हृदयविकाराचा धोका असेल तर घराबाहेर व्यायाम करणे टाळा, कारण ते तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकते. आपण तज्ज्ञाच्या मदतीने इनडोअर घरच्या घरी वर्कआउटची निवड करण्याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.