- दत्ताराम प्रभू-साळगावकर
कोणत्याही गोष्टीची ‘श्रीगणेशा’ त्या गणेशावर निस्सिम भक्ती व भावना राखून केली तर इच्छित आणि इस्पित साध्य होतं; साध्य करायचं बळ प्राप्त होतं, आत्मविश्वास प्राप्त होतो, झोकून देण्याची क्षमता प्राप्त होते व संकल्प फलद्रुप होतो.
ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या|
जयजय स्वसंवेद्या, आत्मरूपा॥
ज्ञानोबा माऊलीनी किती सार्थ शब्दांत गणेशस्तवन केलं आहे. श्रीगणेश सगुण तसेच निर्गुणही. श्रीगणपतीची पूजा, उपासना अनादी कालापासून अशीच अखंड चालू आहे. कोणतेही काम असो, ते गणेश स्तवनाने व गणेशपूजेनेच सुरू होते. कुठल्याही देवाची पूजा असो, सर्वप्रथम गणेशपूजनच केले जाते. म्हणूनच त्याला ‘आद्या’ असं म्हणून नमन करतात. श्रीगणेश हा सर्व विद्यांचा, सर्व कलांचा अधिपती आहे. गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या आनंदाचा, भक्तिभावाचा, समाधानाचा, सार्थकतेचा, परिपूर्णतेचा असा सण आहे. दिव्यत्वाची प्रचिती देणारी ती एक महापर्वणीच आहे. लहान-मोठे, भोळे-भाबडे, गरीब-श्रीमंत कोणी का असेना, प्रत्येकाच्या मन्मनी वास करून राहणारा अलौकिक असा हा देव. चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती, असाधारण बुद्धिमत्ता व डोळे दीपविणारे कर्तृत्व दाखवणारा! त्याचा उत्सव संपन्न झाला की घर कसं सुनंसुनं वाटतं; रिकामं वाटतं. आपल्या जाण्यानं सर्वानाच एकप्रकारची हुरहुर लावतो; इतका त्याचा आपल्याला लागलेला जिव्हाळा!
‘श्रीगणेशाय नमः’ हा एक मंत्र, किंबहुना मूलमंत्रच! हा मंत्र तोंडाने म्हणत, पाटीवर लिहून गिरवत आमच्या शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ म्हणजे सुरुवात केलेली मला आठवते. तद्नंतर बाकीचं. शिक्षणाचा पाया घालणारा असा हा सप्ताक्षरी मंत्र; तो एकदा पूर्णत्वास आला की पुढचं शिक्षण अगदी सोपं अशी निस्सिम भावना असायची व ती खरीही ठरायची! ‘विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजि’ असं एक वचन आहे, तेथे श्रीगणेशाचेच अधिष्ठान आहे. कोणत्याही गोष्टीची ‘श्रीगणेशा’ त्या गणेशावर निस्सिम भक्ती व भावना राखून केली तर इच्छित आणि इस्पित साध्य होतं; साध्य करायचं बळ प्राप्त होतं, आत्मविश्वास प्राप्त होतो, झोकून देण्याची क्षमता प्राप्त होते व संकल्प फलद्रुप होतो. अशा या देवाधिदेवाची कीर्ती किती वर्णावी?
‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही त्याची आरती केल्याशिवाय गणेशपूजन संपन्न होत नाही. कारण तो आहेच तसा! त्या आरतीत ‘वार्ता विघ्नाची नुरवी’ व त्यानंतर ‘पुरवी प्रेम कृपा जयाची’ असं असायला पाहिजे होतं असं एक महाभाग मला म्हणाला. मी म्हटलं, आरती समर्थ रामदासस्वामी रचित आहे. आपण आपल्या आधुनिक चष्म्यातून ती वाचू नये. शब्द इकडे तिकडे असले तरी ती संपूर्ण आरती श्रींच्या भक्तीने व वर्णनाने समृद्ध अशीच आहे; अर्थाने व गेयतेने परिपूर्ण आशयघन आहे. आपण त्यातून उचित अर्थ शोधायला हवा. त्यावर टीका करायची मानसिकता आपण का बाळगावी? शब्दमाधुर्य, नादमाधुर्य, अर्थमाधुर्य यांचे आपण पाईक व उपासक व्हावे; टीकाकार नव्हे!
भक्तिमार्ग हा सन्मार्ग दाखवणारा आहे. आपापसातील हेवेदावे विसरायला लावणारा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली ती ‘समाजप्रबोधन’ हेच उद्दिष्ट समोर ठेवून. समाज सुधारला की देश सुधारेल अशी उत्तुंग आशा-आकांक्षा त्या सार्वजनिक गणेशोत्सवामागे होती. समाजसुधारणेची आस पुष्कळांनी बाळगली. त्यात आगरकर होते, डॉक्टर लोहिया होते. ‘समाज को बदल डालो’ अशी हाक लोहियांनी दिली. गणेशोत्सवामुळे देशहित साधू शकतं!
अलीकडे मात्र श्रद्धा किंवा अंधश्रद्धेपोटी कुठेतरी तडा जातो की काय अशी परिस्थिती अनुभवायला मिळते. पर्यावरण जतन करायची नितांत आवश्यकता असताना पर्यावरणाला बाधा आणणार्या गोष्टी घडताना आढळून येतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, प्लास्टिक, रंग यांचा अनिर्बंध वापर आपल्या जीवनावर व ‘जीवन’ म्हणजे पाण्यावर घातक परिणाम करणारा आहे. आपण आपल्यानंतर येणार्या पिढीच्या पुढ्यात काय वाढून ठेवतो आहोत याचा थोडातरी विचार करायला हवी. आपल्या करण्या-कर्तृत्वाने पुढच्या पिढीला विषारी फळं देत आहोत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’सारखी संतांची शिकवण आपण पायदळी तुडवीत आहोत असा भास होतो. आपल्या पूर्वजांनी आपापल्या परीने पर्यावरण रक्षण करून आपल्याला चांगलं जगण्याची देणगी दिलेली आहे. आपण त्यासाठी त्यांचे कृतज्ञ राहायला हवे; कृतघ्न होऊ नये. आणि आपणही आपल्या पुढील पिढीवर उपकार करायला हवेत. पर्यावरणरक्षण ही काळाची ‘मांग’ आहे व ती करणे शक्य व साध्य आहेच. तळमळीने काम करणारे कार्यकर्ते व पर्यावरणवादी आपल्या परीनं पराकाष्टा करीतच आहेत. त्यांना या कार्यात यश येवो ही श्रीगणेशाचरणी मनोमन प्रार्थना. आपणही पर्यावरणाला बाधा पोहोचेल असं काहीही करायचं नाही व इतरांनाही करू द्यायचं नाही. त्यासाठी, या सत्कार्यासाठी झोकून द्यायची वेळ आलेली आहे व सर्वांना ओरडून सांगण्याची की- ‘जागते रहो…!’