प्रथमेश, तू चुकलास!

0
186

पेडणेकरांच्या भाषेविषयी अनुद्गार काढणारा गोमंतकीय मॉडेल प्रथमेश म्हावळिंगकरने शेवटी माफी मागितली, पण त्या माफीचा सूरही ‘पडलो तरी नाक वर’ धाटणीचा आहे. आपल्या आणि मित्रामधल्या संभाषणातील थट्टामस्करीचा एवढा मोठा राईचा पर्वत केला गेला असे त्याचे म्हणणे. परंतु जेव्हा एखादे खासगी संभाषण व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकले जाते, तेव्हा ते खासगी उरत नाही आणि त्यात जर काही आक्षेपार्ह विधान असेल तर त्यातून समाजाच्या भावना दुखावू शकतात हे भान प्रथमेशला एक सेलिब्रिटी या नात्याने तरी असणे आवश्यक होते. पेडण्याच्या भाषेविषयी ज्या प्रकारे तुच्छतापूर्ण वक्तव्य त्याने केले ते निषेधार्ह आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठविणार्‍या स्वाभिमानी पेडणेकरांना नावे न ठेवता त्याने खुल्या दिलाने माफी मागितली असती तर ते अधिक शोभून दिसले असते.
कोणतीही भाषा, कोणतीही बोली ही कधीही कनिष्ठ अथवा श्रेष्ठ नसते. एखादी गरीब, कष्टकरी माणसांची बोली आहे म्हणून ती हीन ठरत नाही आणि एखादी बोली समाजातील उच्चभ्रूंची बोली आहे म्हणून श्रेष्ठ ठरत नाही. प्रत्येक बोलीभाषेला तिचा असा एक लहेजा असतो, तिची सौंदर्यस्थळे असतात. पेडण्याच्या बोलीलाही तिची लय आहे, तिचा हेल आहे, तिचा गोडवा आहे. आपली बोलीभाषा कोणी अभिमानाने बोलत असेल तर त्याची टवाळी होता कामा नये. उलट आपली, आपल्या वाडवडिलांची बोली सोडून हट्टाने जर कोणी स्वतःला इतरांपेक्षा पुढारलेला भासवण्यासाठी उच्चभ्रूंची भाषा बोलण्याचा दुराग्रह बाळगत असेल तर त्यातून खरे त्याचे हसे होत असते. आपली स्वतःची, वाडवडिलांची बोली बोलण्यात लाज कसली?
दर बारा मैलांवर भाषेचे रंगरूप बदलते असे भाषाशास्त्र सांगते आणि गोव्यात तर त्याचा ठायीठायी प्रत्यय येत असतो. पेडण्याची बोली वेगळी, डिचोली – सत्तरीची वेगळी, बार्देशची वेगळी, सालसेत – अंत्रुज – काणकोण – प्रत्येक ठिकाणची कोकणी वेगळी आहे. त्या प्रत्येक रूपाला स्वतःचा थाट आहे, स्वतःचा डौल आहे. कुठल्याही भाषेच्या बाबतीत एक वाईट गोष्ट अशी घडत असते ती म्हणजे समाजातील आर्थिक – सामाजिक – सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या समाजाची बोलीभाषा ही इतरांवर लादली जात असते किंवा आपण मागे आहोत ह्या भ्रामक न्यूनगंडापोटी ती स्वतःवर अट्टहासाने लादून घेतली जाते. त्यातून आपल्या बोलीभाषेशी प्रतारणा करून हट्टाने तथाकथित प्रमाणभाषेचा सोस बाळगला जातो. मग बोलण्यास येणार्‍या धेडगुजरी स्वरुपामुळे मूळ बोलीची लय बिघडते, भ्रष्ट होते. गोव्यात गेली अनेक वर्षे हेच घडताना दिसत आहे. गावाकडून शहरात येणारी माणसे आपल्या गावच्या, परिसरातल्या मूळ बोलीभाषेचा त्याग करून तथाकथित प्रमाणबोलीचे अनुकरण करू लागतात. वास्तविक अमूकच बोली ही प्रमाण मानायची हे ठरवले कोणी? परंतु स्वतःचा तसा समज करून घेऊन माणसे आपल्या अस्मितेलाच तिलांजली देताना दिसतात. त्यातून गोव्याच्या विविध बोलीरूपांचा गोडवा हरवला जात आहे. जवळजवळ प्रत्येक भाषेच्या बाबतीत हे होत असते, परंतु गोव्यामध्ये ते ठळकपणे जाणवते, कारण हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या छोटा जरी असला तरी वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली राहिल्यामुळे येथील बोलीवैविध्य ठळकपणे जाणवणारे आहे.
प्रथमेश म्हणाला तसे पेडण्याच्या बोलीला ‘फनी लँग्वेज’ म्हणण्यासारखे काय आहे? हीच बोली बोलणार्‍या जिवबादादांनी एकेकाळी महादजी शिंद्यांच्या वतीने दिल्लीत तलवार गाजवली आहे. इथल्या सोहिरोबांनी लाखोंच्या अंतरीचा ज्ञानदिवा जागवला आहे. इथल्या मुरारबा पेडणेकरांनी गोव्याच्या कलेची ध्वजा देशभरात फडकवली आहे. प्रथमेश हा आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुपरमॉडेल असेल, परंतु तो ज्या गावाचे नाव लावतो त्या डिचोलीजवळच्या म्हावळिंग्याची बोलीभाषा त्याने ऐकली आहे? ज्या थिवीत तो लहानाचा मोठा झाला तिथली बोली त्याच्या कानी पडलेली नाही? आपण कितीही मोठे झालो, जगात कोठेही पोहोचलो तरी ज्यांची पाळेमुळे आपल्या मातीत रुजलेली असतात, तीच माणसे खर्‍या अर्थाने मोठी होत असतात. ज्या वेंडेल रॉड्रिग्समुळे या मुलाचे नाव झाले, त्या वेंडेलची पाळेमुळे अशी आपल्या मातीमध्ये घट्ट रुजलेली होती. त्याने ती अभिमानाने मिरवली. त्याचे आत्मचरित्र वाचले तर आपल्या गावाशी, आपल्या गोव्याशी तो किती जोडलेला होता ते प्रत्ययाला येते. माणसे उगाच मोठी होत नसतात. त्यांच्या ठायी ती नम्रता असावी लागते. आपल्या मुळांची जाणीव असावी लागते. ती नसेल तर मुळे उखडली जायला आणि कीर्तीचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही!