प्रत्येक भारतीयाने स्वदेशीचा वापर करावा

0
3

पंतप्रधान मोदी यांचे 75 व्या वाढदिनानिमित्त आवाहन

ट्रम्प, पुतिनसह अनेक नेत्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

देशाची सुरक्षा आणि विकास हा आमचा श्वास आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाने स्वदेशीचा वापर करावा. भारत आता कुणाच्याही दबावाला न जुमानता स्वतःच्या ताकदीवर पुढे जाणारे राष्ट्र बनला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्थानिक विकास प्रकल्पांवर भर देतानाच पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. बुधवारी मध्यप्रदेशातील धार येथे पंतप्रधान मोदी यांच्या 75 वा वाढदिवसादिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा मोठे आमच्यासाठी काही नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि दहशतवादी तळ उद्धवस्त केले. हा नवा भारत आहे. अण्वस्त्राच्या धमक्यांना नवा भारत घाबरत नाही. आम्ही घरात शिरून मारण्याची ताकद ठेवतो असे सांगितले.

दरम्यान, आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी धार जिल्ह्यात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ केला. त्याचबरोबर राज्यातील 8 वा राष्ट्रीय पोषण महिना मोहिमेचीही सुरुवात त्यांनी केली. याशिवाय, पंतप्रधानांनी ‘आदी सेवा पर्व’चे उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी बडनावर तहसीलमधील भैनसोला गावात पीएम मित्र पार्कची पायाभरणी केली. येथे त्यांनी एका उघड्या जीपमधून लोकांचे स्वागत स्वीकारले. तसेच, एका क्लिकवर राष्ट्रीय पोषण पंधरवड्यासाठी रक्कम हस्तांतरित केली.
पंतप्रधानांचे व्यासपीठावर पारंपरिक पगडी घालून स्वागत करण्यात आले.

ट्रम्प, पुतिन यांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदी यांना 75 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा देण्यात आल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांशी संबंधित कथा सांगितल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्टद्वारे पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना फोनवरुन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी मोदी चांगले काम करत आहेत. युक्रेन युद्ध समाप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आपण मोदी यांचे आभार मानत आहोत असे सांगितले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देताना भारत आणि रशिया दरम्यानची भागीदारी आणखी मजबूत करण्यात त्यांच्या शानदार व्यक्तीमत्वाच्या योगदानाचे कौतुक केले. मोदी यांच्या नेतृत्वात भारताने सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असल्याचे म्हटले आहे.
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची शक्ती, त्यांचा दृढ संकल्प आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता हे प्रेरणचे स्रोत असल्याचे म्हटले आहे. भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या.