प्रतिमा कुतिन्हो यांना अटक आणि सुटका

0
3

चार वर्षांमागे काँग्रेस पक्षात असताना एका आंदोलनात हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रतिमा कुतिन्हो यांना मडगाव पोलिसांनी काल रविवारी अटक केली व त्यानंतर जामिनावर सुटका केली. 2020 मध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्ष असताना इंधन दरवाढीचा विरोध करताना हिंदूंच्या धार्मिक विधीनुसार स्कूटरची मिरवणूक
काढली.

यावेळी राम नाम सत्य है असा घोष करीत आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी मडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रतिमाविरोधात अटक वॉरंट जारी केले व न्यायालयात हजर करण्याचे आदेश मडगाव पोलिसांना दिले होते. त्या आदेशानुसार मडगाव पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांना काल अटक केली व नंतर जामिनावर सुटका केली.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष असताना दि. 4 जुलै 2020 रोजी इंधन दरवाढीच्या विरोधात ही मिरवणूक काढली होती. त्यावेळी हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अंकित साळगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फातोर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले होते.