>> शाळकरी मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला मुक्त अभिषेक
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर… म्हणत संपूर्ण गोव्यातील विठू भक्तांची पाऊले काल आषाढी एकादशीनिमित्त आपापल्या परिसरातील विठ्ठल मंदिरात वळताना पाहायला मिळाली. डिचोली व सत्तरी तालुक्यातील हरी भक्तांचे प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलापूर, साखळी येथील विठ्ठल मंदिर परिसरात काल रविवारी आषाढी एकादशीनिमित्त भक्तांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री विठ्ठलास मुक्त अभिषेक केला व धार्मिक पूजन केले. शाळकरी मुलांनीही या उत्सवात सहभागी होऊन दिंडी सादर केली. डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील विविध ठिकाणच्या दिंडी पथकांनी चालत वारी करून श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री आणि साखळी मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात जाऊन देवाला मुक्त अभिषेक केला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. देवभक्ती आणि ईश्वर शक्ति प्राप्त करून आपण सामाजिक जीवनात कित्येक कामे करू शकतो. त्यासाठी संघटितपणा महत्त्वाचा असतो.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळातही मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुललेला पाहून मन भरून येते. पावसाची पर्वा न करता हरिनामाच्या गजरात नाचत गात येणारे भक्त अभिनंदनास पात्र ठरतात, असे मुख्यमंत्री सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले.
दर्शनासाठी मोठी रांग
डिचोली व सत्तरी तालुक्यातील आमदार, माजी सरपंच, पंच, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी ही आषाढी एकादशीला साखळी येथील विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. शाळकरी मुलांनी संतांच्या वेषात दिंडी सादर केली. सुर्ल, वेळगे, होंडा, वाळपई, पर्ये, साखळी, डिचोली इत्यादी परिसरातील महिला पथकांनी चालत दिंडी सादर केली. साखळी विठ्ठल मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती. व्यास जावडेकर यांच्या दुकानापर्यंत देव दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती.