पिसुर्ले सत्तरी येथे एका आस्थापनांतून जप्त करण्यात आलेल्या कॅटमाईन या अमलीपदार्थाच्या विषयावर कॉंग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यात अमलीपदार्थाचा विषय गंभीर बनलेला आहे. पिसुर्ले सत्तरी येथील भाजप नेते वासुदेव परब यांच्या आस्थापनांतून ताब्यात घेण्यात आलेल्या कॅटमाईन या अमलीपदार्थाचा विषय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राणे लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडणार आहेत.
या लक्षवेधी सूचनेवर कॉंग्रेसचे सर्व आमदार सही करणार आहेत. सरकारकडून अमलीपदार्थाच्या विरोधात कडक कारवाई करण्याची केवळ घोषणा केली जात आहे, असेही कवळेकर यांनी सांगितले. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते कवळेकर बोलत होते. पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध ज्वलंत मुद्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनीतीवर बैठकीत विचार करण्यात आला. आत्तापर्यंत विधानसभेसाठी प्रश्न सादर करण्याच्या दोन फेर्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात कॉंग्रेसच्या आमदारांनी सादर केलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आमदारांनी दिलेल्या प्रश्नांना उत्तरे आल्यानंतर विधिमंडळ गटाची आणखी एक बैठक घेतली जाणार आहे.
अधिवेशन वाढ निर्णय नाही
आमदारांना मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी योग्य वेळ मिळत नसल्याने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी सभापतीकडे करण्यात आली आहे. परंतु, अधिवेशनाचा वेळ वाढविण्याबाबत अद्याप काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. अधिवेशनाचा वेळ वाढविण्याचा मुद्दा योग्य ठिकाणी उपस्थित केला जाणार आहे, असेही कवळेकर यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे ठप्प झालेली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आमदारांना एकूण २८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कॉंग्रेस आमदारांची बैठक घेऊन विकास कामे वेळीच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, विकास कामे मार्गी लागलेली नाहीत. आमदाराच्या विकास कामाच्या फाईल्स प्रलंबित आहेत, असेही विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी सांगितले. राज्यातील ज्वलंत समस्या, मुद्यांवर आगामी पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना करण्यात करण्यात आली आहे.