गेल्या ५० वर्षांपासून गोवा विधानसभेचे सदस्य असलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे हे येती गोवा विधानसभा निवडणूक लढवतील की नाही याविषयी संदिग्धता निर्माण झालेली आहे.
काल आपल्या पणजी प्रतिनिधींनी या ज्येष्ठ नेत्याशी संपर्क साधून त्यांची या विषयावरून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता राणे यांनी, मी ह्या घडीला सर्वांच्या संपर्कात आहे. असे असताना तुम्ही पत्रकार मंडळी पुन्हा पुन्हा मला फोन करून कसली प्रतिक्रिया घेऊ पाहत आहात, तेच आपल्याला कळत नाही असे सांगून त्यापुढे आणखी काहीही न बोलता त्यांनी फोन ‘कट’ केला.
आमच्या प्रतिनिधीने याप्रश्नी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना विचारले असता ते म्हणाले की प्रतापसिंह राणे यांनी काय निर्णय घेतलेला आहे त्याविषयी आपणाला काहीएक माहीत नाही. मात्र, कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी पर्ये मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी त्यांच्याशी योग्य ती चर्चा केली होती.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी, प्रतापसिंह राणे हे एक पक्षाचे ज्येष्ठ, श्रेष्ठ व सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले असे नेते होत. पक्ष त्यांच्याबाबतीत जो निर्णय घेईल त्या निर्णयाचा ते मान राखतील असे सांगितले.
दरम्यान, राणे यांचे पुत्र व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वडिलांना निवडणूक न लढविण्याचा सल्ला दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतापसिंह राणे आता काय भूमिका घेतात याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र तरी दस्तुरखुद्द प्रतापसिंह राणे यांनी ह्या घडीला निश्चित अशी कोणतीच भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे ते निवडणूक रिंगणात उतरतील की नाही याबाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे.