– विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
आपली हिंदू संस्कृती विश्वात्मक आहे. हा माझा, तो दुसर्याचा हा भाव इथे नाही. काळीज सुपासारखं असणार्या कोणत्याही माणसाच्या ठायीही हा दुजाभाव असणं शक्य नाही. कारण दुजाभाव असणं हे सामान्यपणाचं लक्षण झालं. पृथ्वी ही घरासारखी आहे इतका व्यापक विचार करणारी आपली संस्कृती… याप्रमाणे पृथ्वी हे घर मानायचं झाल्यास आज या घराचा दिवाणखाना अमेरिका आहे, घरातील शोभिवंत वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड आहे. या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन आणि जपान, घराचं दुकान म्हणजे युरोप पण या घराचं देवघर म्हणजे भारत. म्हणूनच आपल्या संस्कृतीनं दिलेली शिकवण विश्वात्मक आहे. आपल्या देशाला मंदिर बनवण्याचं काम अनेक आचार्य, संत, महर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी यांनी केलं आहे. अनेक सगुणावतार या कामी कार्यरत झाले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक रचनेतील सण आणि व्रतवैकल्यांच्या निमित्तानं हा वैश्विक भाव जपण्याचे संस्कार मिळाले आहेत. मध्यंतरी भारतीय संस्कृतीवर कुचेष्टेेनं बोललं जायचं. पण आता नव्यानं जगाला भारतीय संस्कृतीचं माहात्म्य पटू लागलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याकडे एक सूर्य मानलेला नाही. आपल्यासारखी बारा विश्वं आहेत असं भारतीय संस्कृती सांगते. आतापर्यंत या विधानाकडे दुर्लक्ष केलं गेलं. मात्र आता असे तीन सूर्य खगोलशास्त्रज्ञांना सापडले आहेत. आपल्या संस्कृतीत ८४ लक्ष योनींचा उल्लेख होतो. यावरही अनेकांनी टीका केली, पण आता शास्त्रज्ञांनी ५९ लक्ष योनी सापडल्याचं कबूल केलं आहे. आता कुठे भारतीय संस्कृतीचं माहात्म्य जगाला उमगू लागलं आहे. सण, व्रतवैकल्य अनुबंध बांधण्याचं काम करतात. चैत्री पाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत साजर्या होणार्या प्रत्येक सणाचं विशिष्ट प्रयोजन आहे. या सणांचा अनुबंध कुटुंबाशी, समाजाशी आणि राष्ट्राशी आहे. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण. दिवाळीचं मुख्य सूत्र म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा, प्रतिकुलूतेवर अनुकूलतेचा, अज्ञानावर ज्ञानाचा, असत्यावर सत्याचा विजय. दिवाळीचं हे सूत्र प्रत्येकाला शहाणं करणारं आहे. आपले सगळे सण प्रतिकात्मक आहेत. आपल्या धर्मात सर्वाधिक प्रतीक आढळून येतात. म्हणूनच सण साजरा करताना या प्रतीकांचा अभ्यास करायला हवा. आपण मुलाला शिकवण्यास सुरुवात करण्याआधी सरस्वती पूजन करायला सांगतो. या सरस्वतीच्या प्रतिमेत चौसष्ठ त्रिकोण असतात. ही चौसष्ठ घरं चौसष्ठ कलांचं प्रतीक आहेत. त्यावर नऊ रङ्गार असतात. नऊ ही संख्या ब्रह्मसंख्या आहे. बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार… कुठलीही गणिती प्रक्रिया केली तरी नऊ या संख्येत बदल होत नाही. अशा प्रतिकांमुळेच भारतीय संस्कृती आणि त्यातील सण महान होऊन जातात.
दिवाळीही अशी प्रतिकात्मक म्हणायला हवी. दिवाळीचा पहिला दिवस नरकासुराच्या वधाचा आनंद व्यक्त करणारा आहे. नरकासुर हा बलाढ्य राक्षस. त्याला मारणं केवळ अशक्य होतं. त्यानं स्वसरंक्षणार्थ आपल्या भोवती पाच प्रकारच्या तटबंदी उभारल्या होत्या. विषारी वायूचं आवरण निर्माण केलं होतं, अग्नीचं रिंगण तयार केलं होतं. पण कृष्णानं या सर्व तटबंदी पार करत नरकासुराचा वध केला. या घटनेतून प्रत्येक माणसाला जगण्याचं नवं बळ मिळतं. प्रयत्न केले तर अशक्य काही नाही हे सत्य समोर येतं. दिवाळीत दीप प्रज्वलीत करुन अंधारावर मात केली जाते. पण याचा अर्थ केवळ आपलं घर उजळून टाकणं असा नाही. इतका मर्यादित अर्थ धर्मशास्त्रात सांगितलेला नाही.
पाडवा हा दिवस खास पती-पत्नीच्या प्रेमाचा. पती-पत्नीचं नातं निरंतर, दृढ आहे. यात प्रेम, जिव्हाळा आहे. पाडवा हा दिवस या दोघांना अधिक समिप आणणारा आहे. या निमित्तानं कुटुंबसंस्थेचं महत्त्व अधोरेखित होतं. आज अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये भारतीय कुटुंबव्यवस्था हा अभ्यासाचा विषय आहे. तेथील लोक राम-सीतेच्या सहजीवनाचा अभ्यास करतात. हे पावित्र्याचं बंधन उलगडून पाहण्याचा प्रयत्न करतात. असेे हळवे बंध अन्य कुठल्याही संस्कृतीत नाहीत. पण आज पती-पत्नीमधील वितंडवाद हा काळजीचा विषय ठरतोय. पती-पत्नी दोन-तीन वर्ष संसार करुन घटस्ङ्गोटाचा निर्णय घेताना दिसतात. यांना कुटुंबव्यवस्थेतील संस्कार समजून सांगायला हवेत जे ङ्गक्त सणांच्या माध्यमातूनच शक्य होईल. याबाबत गोंदवलेकर महाराजांची एक आठवण स्मरते. त्यांच्याकडे एक दांपत्य आलं. अजिबात पटत नाही म्हणून त्यांनी विभक्त होण्याचं ठरवलं होतं. स्वामींना मानत असल्यामुळे त्यांनी ही तक्रार त्यांच्या कानी घातली. त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आणि चार-आठ दिवस इथेच रहा असा आग्रह केला. आठ दिवसानंतर त्या दोघांना भेटायला बोलावलं. आता तुमचा काय निर्णय आहे, असं विचारता त्या दोघांनी विभक्त होण्याचा पुनरुच्चार केला. तेव्हा स्वामी म्हणाले, पुढे काय करणार? दोघांनीही दुसरं लग्न करण्याचा मानस सांगितला. तेव्हा स्वामी म्हणाले, जगात कुठल्याही दोन माणसांची मतं जुळणं शक्य नाही. एक नव्हे दहा लग्न केली तरी जोडीदाराची सगळी मतं पटणं अशक्य आहे. हा विचार केला तर तुम्ही कायम दुःखीच रहाल. उपदेशाचे हे बोल ऐकून दांपत्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांनी क्षमा मागितली. या कथेपासून बोध घेत पाडव्याच्या निमित्तानं या नात्यामधील गोडवा, पावित्र्य आणि अद्वैत जपण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबिजेचा. या दिवशी भाऊ बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो, भेटवस्तू देतो, कुठल्याही अडचणीत मी तुझ्या बरोबर आहे असं आश्वासन देतो. आपल्याकडे कृष्णासारखा भाऊ नाही असं म्हणतात. म्हणूनच आज प्रत्येक तरुणाला कृष्णाच्या भूमिकेतून अडचणीत सापडलेल्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण करण्यास पुढे सरसावयाला हवं. जन्मानं मिळतं ते भाऊ-बहिणीचं नातं पवित्र आहेच, त्याचबरोबर परिस्थितीनुरुप जोडलं जातं ते नातंही अत्यंत पवित्र आहे. असा व्यापक विचार ठेऊन साजरा होणारा सण मांगल्याची अनुभूती ठरेल.
दीपोत्सव एकात्मता शिकवतो. कुटुंबाला बलवान करण्याची शक्ती देतो. विनम्रता, सात्विक दिशा, समाजाचा-राष्ट्राचा विचार करण्याची व्यापकता हे सर्व याद्वारे साधलं जातं. हा सण एकदेशी राहू नका सर्वदेशी व्हा अशी शिकवण देणारा आहे. या सणाच्या निमित्तानं पावन अग्नीचं पूजन होतं. व्यक्तीपासून मानवतेपर्यंत एकात्म विचार करणारा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा…