>> इस्रोची माहिती; आता केवळ 22 सप्टेंबरच्या चंद्रावरील सूर्योदयाची प्रतीक्षा
भारताने 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला. गेल्या काही दिवसांत प्रज्ञान रोव्हरने महत्त्वाची माहिती इस्रोकडे पाठवली. आता पुढचे काही दिवस चंद्रावर गडद अंधार असणार आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर पाठोपाठ चांद्रयान-3 चा विक्रम लँडर देखील आता ‘स्लीप मोड’मध्ये गेला आहे. 22 सप्टेंबरला चंद्रावर दिवस उजाडणार असून, त्यावेळी विक्रम लँडर पुन्हा कार्यरत होणे अपेक्षित आहे.
भारताने पाठवलेले चांद्रयान-3 हे चंद्रावर गेल्या काही दिवसांपासून संशोधन करत होते. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरद्वारे इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ मिळत होते; परंतु आता चंद्रावर रात्र झाली आहे. पुढचे काही दिवस चंद्रावर गडद अंधार असणार आहे. त्यामुळे भारताचे यान आता निष्क्रिय झाले आहे. कारण यान आणि त्याबरोबर पाठवलेली सर्व उपकरणे ही सौरऊर्जेवर चालतात. आता तिथे अंधार असल्यामुळे ही सर्व उपकरणे निष्क्रिय करण्यात आली आहेत. म्हणजेच, ही सर्व उपकरणे आता स्लीप मोडमध्ये गेली आहेत.
इस्रोने शनिवारी रात्री प्रज्ञान रोव्हरला ‘स्लीप मोड’वर टाकले होते. त्यापाठोपाठ काल सकाळी 8 वाजताविक्रम लँडरलाही ‘स्लीप मोड’वर टाकण्यात आले. विक्रमने निद्रावस्थेत जाण्यापूर्वी आधी त्याची जागा बदलली. त्यासाठी या अवकाशयानाने एक मोठी उडी घेतली.
तसेच विक्रम लँडरला स्लीपिंग कमांड देण्याआधी नवीन जागेवर सर्व पेलोड्सची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व पेलोड्स बंद करण्यात आले. विक्रम लँडरमधील सर्व प्रणाली आणि उपकरणे ही सध्याच्या घडीला सुस्थितीत आहेत. आता केवळ रिसीव्हर सुरू आहे. जेणेकरून इस्रोच्या बंगळुरूतील कार्यालयातून अवकाशयानाला कमांड देता येईल.
‘विक्रम’ने मारली उडी
निद्रावस्थेत जाण्यापूर्वी विक्रम लँडरने हॉप एक्सपेरिमेंट म्हणजे उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरने त्याचे इंजिन सुरू केले. त्यानंतर 40 सेंटीमीटरची विक्रम लँडरने उडी मारली आणि 30-40 सेमी अंतर पार केले. विक्रम लँडरच्या या प्रयोगामुळे इस्रोला अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी मदत होणार आहे. तसेच आता चंद्रावर इस्रोला माणूस देखील पाठवण्यास शक्य होणार आहे.
आता 22 सप्टेंबरची प्रतीक्षा
विक्रम लँडरची बॅटरी जशी हळूहळू कमी होत जाईल, तसा तो पूर्णपणे निद्रावस्थेत जाईल. इस्रोला आता आशा आहे की, 22 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा विक्रम लँडर कार्यरत होईल, तेव्हा चंद्रावर दिवस उजाडलेला असेल.
आता निद्रावस्थेत असलेला प्रज्ञान रोव्हर अशा ठिकाणी उभा केला आहे की, चंद्रावर सूर्य उगवल्यावर त्यावरील सौर पॅनल लगेच ॲक्टिव्ह होतील. सौर ऊर्जा मिळू लागल्यानंतर तो पुन्हा एकदा चंद्रावर संशोधन करू शकेल. त्यामुळे आता इस्रोला चंद्रावर सूर्य उगवण्याची प्रतीक्षा आहे.