>> कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देणार
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी 30 मे रोजी प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे ते 1 जूनपर्यंत कन्याकुमारीला भेट देऊन ध्यानधारणा करणार आहेत. कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती. दरम्यान, 18 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी केदारनाथच्या रुद्र गुहेत ध्यान केले होते. सुमारे 17 तास ते गुहेत थांबले होते.
लोकसभेच्या सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 30 मे रोजीच पंतप्रधान मोदींची पंजाबमध्ये जाहीर सभा होणार आहे. ही सभा झाल्यानंतर ते तामिळनाडूच्या दौऱ्यावर रवाना होतील. तिथून ते 31 मे रोजी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन दोन दिवस ध्यानधारणा करतील, असे सांगितले जात आहे. या दौऱ्याचा अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.
कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते. या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. ज्याप्रकारे सारनाथी भूमी गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा मानली जाते, त्याचप्रकारे कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. देशभरात प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंद याठिकाणी आले होते, त्यांनी तीन दिवस याठिकाणी ध्यान केले होते.
2019 साली केदारनाथमध्ये केली होती ध्यानधारणा
2019 सालीही निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली होती. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे गेले होते. तेथील रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती. यावेळी ते कन्याकुमारी येथे जात आहेत.