>> मायकल लोबो यांची मागणी
राज्यात चालू असलेले प्रार्थना स्थळांवरील हल्ले व क्रॉस पाडण्याच्या पार्श्वभूमीवर उपसभापती मायकल लोबो यांनी गोव्यात येऊन प्रक्षोभक वक्तव्ये करणार्यांवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
श्रीराम सेना प्रमुखांच्या गोवा प्रवेशावर ज्या प्रमाणे सरकारने बंदी घातली आहे त्याचप्रमाणे प्रक्षोभक वक्तव्ये करणार्या सर्व नेत्यांवर बंदी घातली पाहिजे. येत्या पावसाळी अधिवेशनात आपण या संबंधिचा ठराव मांडणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. राज्यात वेगवेगळ्या आध्यात्मिक नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच येथील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर आताच नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त असतानाही क्रॉस पाडण्याचे प्रकार बंद झालेले नाहीत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी गोमंतकीय समाज एकसंध आहे. त्यांचे मनोधर्य वाढविण्यासाठी प्रत्येक भागात कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त करून आपण आपल्या मतदारसंघापासून त्याची सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सासष्टीतील काही भागातील नागरिकांनीही रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचे ठरविले आहे.