प्रकाशयात्री

0
105

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचा तणाव कायम असतानाच शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय नोबेल सन्मान भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांना जाहीर होणे यात विसंगती असली, तरी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत मानवी हक्कांच्या रक्षणासाठी लढणार्‍या या दोन झुंजार व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा यथार्थ गौरव या सन्मानाने केलेला आहे. आजवर ऐंशी हजार बालकामगारांची शोषणापासून मुक्तता करून त्यांच्या पुनर्वसनाची आणि शिक्षणाची जबाबदारी पेलणार्‍या कैलाश सत्यार्थी यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याच्या कार्याचे मोल नोबेल जाहीर झाल्यानंतर देशाला उमगावे यासारखी दुर्दैवाची बाब दुसरी नसेल. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा ‘कोण हे सत्यार्थी?’ असाच प्रश्न देशाला पडला, कारण तळागाळातून काम करीत आलेल्या आणि बाल न्याय हक्कांची आंतरराष्ट्रीय चळवळ उभारणार्‍या या कार्यकर्त्याचे नाव कधी माध्यमांतून चमकलेच नाही. नकारात्मक बातम्यांच्या मार्‍यामध्ये समाजासाठी चांगले काम करणार्‍यांची कशी उपेक्षा होते, त्याची साक्ष देण्यासाठी हे उदाहरण पुरेसे ठरावे. त्या तुलनेत मलालाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उदंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तिला हा एवढा मोठा सन्मान मिळाला. तालिबान्यांनी जिच्यावर गोळी झाडून तिचा आवाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला, त्या मलालाने या दहशतीला न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी व न्याय्य हक्कांसाठी जो संघर्ष पाकिस्तानच्या अशांत टापूमध्ये चालवला आहे, तो खरोखरच अजोड स्वरूपाचा आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून ती बीबीसीच्या ऊर्दू संकेतस्थळावर आपल्या भोवतालच्या परिस्थितीविषयी, दबाव दडपणांविषयी ब्लॉग लिहीत आली. मुलींनी शाळेत जाता कामा नये असा फतवा काढणार्‍या तालिबान्यांना न जुमानता शाळेत जात राहिली. जिवाची पर्वा न करता आणि धमक्यांना भीक न घालता तिने तालिबानी प्रतिगामी प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला आणि परंपरांच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो पाकिस्तानी मुलींमध्ये प्रकाशाची ज्योत पेटवली. कैलाश सत्यार्थींनी तर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आपली अभियांत्रिकी नोकरी सोडून देऊन बाल हक्क चळवळीला वाहून घेतले आणि गेल्या चार पाच दशकांमध्ये प्रचंड काम उभे केले. बालकामगारांची सुटका करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या पुनर्वसनाचे कष्ट उपसले आणि त्या मुलांच्या शिक्षणाचा भारही वाहिला. आज देशात प्रसिद्धीलोलूप समाजसेवकांचे आणि विदेशी पैशावर उड्या मारणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे पेवच फुटलेले आहे. टिचभर काम करायचे आणि हातभर प्रसिद्धी मिळवायचे तंत्र गवसलेले तथाकथित मंच आपल्या गोव्यातही आहेत. परंतु कैलाश सत्यार्थी आणि त्यांच्या सहकार्‍यांचे काम विलक्षण आहे. प्रसिद्धी पराङ्‌मुख राहून त्यांनी आजवर जे कष्ट उपसले, त्याचे खरोखर या सन्मानाने चीज झाले आहे. समाजामध्ये सकारात्मक कार्यावरचा आपला विश्वास ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची आणि प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिद्द बाळगणार्‍या अशाच कार्यकर्त्यांमुळे तर आज हा देश उभा आहे. मात्र अशा या उपेक्षित प्रकाशाच्या बेटांची महती आपल्याला विदेशी सन्मानानंतरच उमगते हेच तर दुर्दैव आहे. एकीकडे सत्यार्थींना हा पुरस्कार जाहीर होत असताना दुसरीकडे गोव्यात बालकांचे लैंगिक शोषण करून विदेशात पसार झालेल्या फ्रेडी पीटचा सहकारी भारतीय कायदेकानुनांच्या कक्षेबाहेर ठेवणयाची तरतूद विदेशातील न्यायालयाने केली हा तर दैवदुर्विलास म्हणायला हवा. एकीकडे बालकांच्या शोषणाविरुद्ध लढणार्‍या कार्यकर्त्याला आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त होत असताना दुसरीकडे हे असे घडते हे पाहिले तर या क्षेत्रामध्ये अजूनही किती काम करणे आवश्यक आहे याची खात्री पटते. मलाला काय किंवा कैलाश सत्यार्थी काय, ही आम समाजासाठी प्रकाशाची बेटे आहेत. ती या जगण्यावरची श्रद्धा दृढ करतात, समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो ही भावना ताजी करतात आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतात. अशा कार्याला किमान साथ देण्याची भावना जरी या निमित्ताने समाजात निर्माण झाली, तर समाजाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अशा धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळेल.