प्रकल्पांना नेत्यांची नावे देण्याचा सोस का?

0
56
  • – देवेश कडकडे

नेते कधी सांगून जात नाहीत की आपले नाव एखाद्या प्रकल्पाला द्या. हा केवळ त्यांच्या अनुयायांचा श्रद्धेचा भाग असतो आणि राजकीय पक्षाचे राजकारण दडलेले असते. वास्तविक नेते, समाजसेवक यांचे पुतळे अथवा नाव देण्यापेक्षा त्यांनी जे समाजासाठी योगदान दिले त्यांचे अनुकरण त्यांच्या अनुयायांनी केले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

समाजसुधारक, महापुरुष, देशासाठी अतुल्य योगदान देणार्‍या, देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या नामवंतांची नावे प्रकल्पांना दिली जातात. त्यांची स्मृती सदैव जनमानसात तेवत राहावी हा हेतू त्यामागे असतो. आचार्य अत्रे यांना एकदा कोणीतरी कुत्सितपणे विचारले की, तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात तुमच्याच लोकांचे जास्त फोटो छापता. त्यावर अत्रे यांनी त्यांना उत्तर दिले की, मग दुसरे वर्तमानपत्र आमचे फोटो छापणार का? कोणताही पक्ष असो वा संघटना, ते आपले कार्यक्रम राबविण्यासाठी झटत असतात. त्यासाठी विविध हातखंडे वापरत असतात. आजच्या काळात जाहिरातबाजी करणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा सुलभ मार्ग बनला आहे.

आपला पक्ष सदैव कसा प्रकाशझोतात राहील अथवा भविष्यातही नावलौकिक कसा कायम राहील यासाठी पक्षाच्या नेत्यांचे पुतळे उभारणे, तसेच प्रकल्पांना नावे देणे, असे प्रकार चालू असतात. वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे हे आता सर्वच क्षेत्रात चालू आहे. कॉंग्रेसने आपल्या सत्ताकाळात सर्व योजना आणि प्रकल्पांना आपल्या नेत्यांची नावे दिली. इंदिरा, राजीव, संजय, जवाहर अशीच नावे समोर येतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावे दिली जात नाहीत. जो पक्ष सत्तेवर येतो, तो हाच कार्यक्रम राबवत असतो. केंद्रात सत्तेवर आलेला पक्ष सर्वप्रथम सर्व राज्यांत आपल्या मर्जीतील व्यक्तींना राज्यपालपदी बसवतो. यावर विरोधी पक्ष विरोध करून थयथयाट करीत असतो, कारण विरोध करणे हे विरोधकांचे कामच असते.

गोव्यात मोपा विमानतळाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून बराच काळ राजकारण रंगले आणि अखेर नामकरण मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच झाले. भाजपाला केंद्रात आणि राज्यातही बहुमत आहे यामुळे हे सहज शक्य झाले. सत्तेपुढे दुसर्‍या कोणाचेही शहाणपण चालत नाही असे म्हणतात. या विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे अशी अनेकांची मागणी होती. एकाला विरोध करण्यासाठी दुसर्‍याचे नाव पुढे करणे ही आता राजकारणात नित्याचीच बाब बनली आहे.

काहींनी मोपा हे नाव सोईस्कर आहे म्हणजे वादाला थारा राहणार नाही अशी भूमिका मांडली. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे ही अनेकांची इच्छा असली तरी त्यांचे नाव लावून धरणार्‍यांपाशी आज राजकीय पाठबळ नाही. कुठल्याही निर्णयप्रक्रियेत राजकीय पाठबळ असेल, तर त्याला मंजुरी मिळते. गोव्यातील विकासात भाऊसाहेब बांदोडकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेता त्यांना गोव्याचे भाग्यविधाता मानले जाते. स्वतः पर्रीकर हे भाऊसाहेब बांदोडकर यांचे मोठे चाहते होते, असे विधान त्यांनी स्वतः अनेकदा केले होते. पर्रीकर हयात असते तर त्यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव विमानतळाला दिले असते, असेही अनेकांनी बोलून दाखवले.

भाऊसाहेब बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर यांच्यामधील एक साम्य म्हणजे दोघांचेही मुख्यमंत्रिपदावर असताना निधन झाले. गोव्यात आणि गोव्याबाहेरही या दोघांचे चाहते होते. दादा कोंडके यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाच्या गोवा दौर्‍याविषयी लिहिले आहे. त्यात त्यांनी भाऊसाहेबांबद्दल ‘एक राजा माणूस! अशी दुसरी दिलदार व्यक्ती आपण पाहिली नसल्या’चे गौरवोद्गार काढले आहेत. भाऊसाहेब हे कलाकारांची कदर करणारे राजकीय व्यक्तिमत्त्व होते. सगळेच पक्ष सत्तेवर आले की आपला अजेंडा राबवतात.

भाजपाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा भाजपा सत्तेवर होता, म्हणून देशभरात सार्वजनिक सुट्टी दिली गेली. त्यावेळी कॉंग्रेस सत्तेवर असता तर सुट्टी दिली नसती हे उघड आहे. या आधी कोणत्याही भूतपूर्व पंतप्रधानांच्या निधनानंतर सुट्टी जाहीर झाली नव्हती. संविधानात तशी तरतूद नाही. भाजपाचा पंतप्रधान होणे ही त्या पक्षासाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी घटना होती. ते त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे, कष्टाचे फळ होते. म्हणून पक्षाचा पंतप्रधान होणे याला फार महत्त्व होते. भाजपाने सत्तेवर येताच अनेक रस्त्यांची नावे बदलली. त्यालाही प्रचंड विरोध झाला, कारण विरोधकांच्या मते ही नावे त्या रस्त्यांची एक खास ओळख होती.

१९९५ साली जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा रेल्वेस्थानके, रस्ते यांची नावे बदलण्यासाठी सिलसिला सुरू झाला. नंतर मायावती यांनी हाच कित्ता उत्तर प्रदेशात गिरवला. काही राज्यांत तर नेत्यांनी हयात असताना प्रकल्पांना आपली नावे देऊन चुकीचा पायंडा पाडला आहे. असो. गोव्याच्या राजकारणात भाजपाची पाळेमुळे रुजविण्यात पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने करण्यात पुढाकार घेतला. राममंदिर आंदोलनाचा फायदा उठवत आणि मगोला पर्यायी पक्ष म्हणून गोव्याच्या कानाकोपर्‍यात आपला पक्ष रुजविण्यात त्यांनी यश मिळवले आणि १९९४ साली मगो पक्षाला युती करण्यास भाग पाडले.

भाजपाला गोव्यात सत्तेच्या शिखरावर पोचवण्यासाठी भाजपाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनी वारंवार अपयशातून निराश न होता प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे हे नाकारता येत नाही, तरीही त्याला पर्रीकरांसारख्या कुशल नेतृत्वाची जोड होती. त्यांच्याकडे नेतृत्व करण्याचे कसब होते, हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. संरक्षणमंत्री असताना तर त्यांची कामगिरी विशेष गाजली. त्यांच्या साध्या राहणीमानाची तर देशभरात चर्चा होत असे. ते काही तसे फर्डे वक्ते नव्हते, तरीही आपल्या चतुरस्र बोलण्याने त्यांनी कार्यकर्ते जमविले, तसेच एक अभ्यासू प्रशासक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. २०१२ साली विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात त्यांनी महिलांना आकर्षित करणार्‍या ‘लाडली लक्ष्मी’ आणि ‘गृहआधार’, तसेच पेट्रोलचे दर कमी करणे अशा योजना मांडल्या.
या आधी पर्रीकर यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतली, तेव्हा अनेक रखडलेली कामे मार्गी लावली. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास होता की, केवळ पर्रीकर अशा योजना अमलात आणू शकतात. म्हणून जनतेने त्यांना स्वबळावर सत्ता दिली, परंतु काही महिन्यांतच गोव्याचा आर्थिक कणा असलेल्या खाण व्यवसायावर अकस्मात बंदी आली आणि राज्याचे सगळे आर्थिक गणित बिघडले. तरीही या योजनांत त्यांनी खंड पडू दिला नाही. जनतेची मागणी असलेले अनेक पूल त्यांनी उभारले. मांडवी नदीवरचा अटल सेतू ही तर गोव्यासाठी मोठी उपलब्धी होती. त्यामुळे पर्रीकर यांचा गोव्यातील विकासात सिंहांचा वाटा आहे आणि विमानतळाला त्यांचे नाव देणे हा योग्यच निर्णय आहे.

आज अनेक राज्यांत आपल्या नेत्यांची नावे देण्यासाठी मोठमोठी आंदोलने झाली आहे, हिंसाचार झाला आहे. त्यात काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी आंदोलन तर अनेक दिवस पेटले होते. त्यात अनेकांनी प्राण गमावले. वास्तविक काही नेत्यांनी उदा. सुनील दत्त यांनी आपल्या मरणानंतर आपला पुतळा उभारू नये किंवा नाव देऊ नये असे जाहीर केले होते, अथवा तसे मृत्युपत्रात नमूद करून ठेवले होते. चित्रपट अभिनेते राजकुमार यांच्या इच्छेनुसार त्यांचा अंत्यसंस्कार केवळ ठरावीक लोकांच्या उपस्थितीत झाला आणि नंतर प्रसारमाध्यमांत जाहीर केले गेले. आज प्रसार माध्यमे नेते – अभिनेते यांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करतात. अगदी प्रत्येक क्षणाचा आँखो देखा हाल वाहिन्यांवर प्रसारित केला जातो. नेते कधी सांगून जात नाहीत की आपले नाव एखाद्या प्रकल्पाला द्या. हा केवळ त्यांच्या अनुयायांचा श्रद्धेचा भाग असतो आणि राजकीय पक्षाचे राजकारण दडलेले असते.

वास्तविक नेते, समाजसेवक यांचे पुतळे अथवा नाव देण्यापेक्षा त्यांनी जे समाजासाठी योगदान दिले त्यांचे अनुकरण त्यांच्या अनुयायांनी केले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.