पौष मास हा मांगल्याचा

0
539
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

सख्यांनो, संक्रमणाच्या या शुभसमयी पौष महिन्यातील गैरसमज, खुळचट कल्पनांच्या नादी लागून हा महिना वाया का घालवायचा? या शुभ महिन्यातील नववर्षाच्या शुभसमयी अनिष्ट प्रथा दूर करून तनामनाची शुद्धता करु. आत्मबला घरोघरी ज्ञानदीप तेवत राहो. या विसशे विसाव्या शतकात काही बदल स्वीकारून जगायला शिकुया.

आरतीच्या मुलाचं लग्न होऊन महिन्याभरात तो परत सिंगापूरला गेला. नवविवाहित वधू आरतीची सून चांगल्या हुद्यावर आहे. तेव्हा साहजिकच ती नोकरी सोडून सिंगापूरला जाणं तिला शक्य नव्हतं. सून गोव्यात मुलगा परदेशी. सात महिन्यानंतर साईश आता या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्याला पोचणार हे सुनेला कळलं. पौष महिना. सून माहेरी आली होती.

‘‘मम्मा, रितेश या आठवड्यात येत आहे. तेव्हा मी सांतिनेझच्या घरी येते. येऊ ना?’’ सुनेची फोनवरून बात.
‘‘अगं सायली तू इथे कशी येऊ शकतेस? पौष महिना चालू आहे ना? मग? तू इथं आलीस तर मी मरेन ना. माझ्या मरणाची वाट पाहतेस होय?’’ आरतीचे प्रत्युत्तर.
सुनेला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कुठून विचारलंसं झालं! बिच्चारी सायली.
असाच आणखी एक प्रसंग काल-परवा घडला. ‘‘अगं साध्वी, उद्यापासून पौष महिना लागतो. तू माहेरी जाऊन रहा बरं… ’’, सासुने सुनेला सांगितले.
‘‘मला पुन्हा पुन्हा माहेरी का पाठवता? मला नाही जायचं…’’.
‘‘अगं, पुन्हा पुन्हा कसं? आषाढ महिन्यात गेली होतीस. उद्यापासून पौष महिन्याला प्रारंभ. पहिल्या वर्षात नववधुने पौषात माहेरी राहायला जायचं, शास्त्र आहे.’’
सुनेचे डोळे पाणावले. तिचं मन बहुदा माहेरी राहण्यास तयार होत नसावं. सासर-माहेर बहुदा एका हाकेच्या अंतरावरच होतं.
शेवटी सासू म्हणाली, ‘‘निदान पाच दिवस तरी माहेरी राहायला हवं’’.
‘‘त्या दिवसात मध्ये या घरी आले तर चालेल ना?’’
सासूने होकारार्थी मान डोलावली. तेव्हा कशीबशी तिची कळी खुलली.
संध्याकाळी भली मोठी बॅग घेऊन साध्वी माहेरी जाण्यास निघाली. सासूनं विचारलं, ‘‘अगं, अधूनमधून इथं येणार आहेस, मग एवढी बॅग का?’’
‘‘माहेरी जायचा ‘फील’ यायला हवा ना म्हणून म्हटलं मोठीच बॅग घ्यावी’’.
यावर सासू अगदी मोकळ्या मनाने हसली. सासर- माहेर जवळच असलं की तळ्यात् का मळ्यात् अशी साध्वीची द्विधा मनःस्थिती झाली होती.
सासूच्या बोलण्यातून पौष महिना म्हणजे जणू अशुभाचे सावट. पौष हा अशुभ महिना असाच सूर जाणवतो.

खरं तर मराठी महिने म्हणजे भारतीय संस्कृतीची देणगीच आहे. यामुळे सण, उत्सव तिथीनुसार साजरे करता येतात.
भारतीय संस्कृती अत्यंत विशाल व समृद्ध आहे. निसर्गाबरोबर तादात्म्य ठेवून जीवन कसं जगावं हे ती शिकवते. पूर्ण वर्षांत अनेक सणोत्सव निसर्गाबरोबर जोडून साजरे करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. प्रत्येक महिन्याची खासियत वेगळी.

पूर्वीच्या काळी सुनाना वारंवार माहेरी जायला परवानगी मिळत नसे. खास सणासुदीला, बाळंतपण, पौष महिन्यात माहेरी जायची संधी मिळत असे. उदा. नववधुच्या पहिल्या वर्षात ज्येष्ठात सासरी नववधुचे वास्तव्य ज्येष्ठ दिराला अनिष्ट, आषाढात सासर्‍याला तर पौषात सासूला अनिष्ट असं मानलं जातं. परंतु कालपरत्वे या प्रथा हळूहळू कालबाह्य होत असतीलही परंतु सनातनी मनावरची पकड ढिली होणे हे फार गरजेचे आहे.

वर्षभरातील दहावा महिना – पौष महिना हा शुभच असतो. पौष महिना अशुभ मानणे हा गैरसमज आहे. या महिन्यात मंगलकार्ये करावी की करु नये असा संभ्रम निर्माण होतो. महत्त्वाची बोलणीदेखील टाळली जातात. पौष महिना सुरू झाला म्हणजे मंगलकार्य पुढे ढकलले जाते. पौष महिना हा मंगल आहे. मंगलकार्यासाठी शुभच आहे. या महिन्यात गुरुपुष्यामृत सर्वश्रेष्ठ राजयोग मानला जातो. याच महिन्यात शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव असतो. धर्मशास्त्रानुसार या महिन्यात देवीच्या विविध मंत्रांचं पठण करावं असं सांगितलं आहे. दुर्गास्तोत्र, सप्तशतीचं पण पारायण या महिन्यात करावं असं कथित आहे.

भारतीय पंचांगानुसार पौष महिन्यात ‘मकरसंक्रांत’ हा सण साजरा केला जातो. सूर्याचे संक्रमण सुरू होते. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या पर्वाला मकर संक्रांत असे म्हणतात. दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं.
पौराणिक सूत्रानुसार सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटण्यासाठी जातो. पितापुत्राच्या अनोख्या भेटीमुळे आनंदी वातावरणात तीळ व गुळ मिश्रित मिठाई वाटली जाते.
पुराणात अशीही कथा आहे की शंकासुर राक्षसाचा देवी जगदंबेने या दिवशी वध केला. म्हणून तिला संक्रांतीदेवी असे संबोधले जाऊ लागले.

मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात तसेच गोव्यातही काही ठिकाणी स्त्रिया सुगड्याचे दान देतात. इथल्या बोली भाषेत ‘सुगड’ असं म्हटलं जातं. वास्तविक सुगड म्हणजे सुघट. मातीच्या पाच सुगड्यात पाच प्रकारची कडधान्ये घालून हळद-कुंकू वगैरे लावून सुहासिनींना वाण दिले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत एकमेकींना तिळगूळ व वस्तुंचे वाण दिले जाते. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ असे म्हणतात. परस्परात स्नेह, आपुलकी वाढावी हा मथितार्थ!
नववधुला या दिवशी हलव्याचे दागिने करून घालतात व तिच्या हस्ते सुवासिनींना पंचधान्य घालून चिटकी मिटकीचे (बुडकुल्यो) दान दिले जाते. ही प्रथा गोव्यात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी सारखीच असल्याचे दिसून येते. एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत व्हावा, मनोरंजन तसेच प्रबोधन दोन्ही हेतु साध्य होतात. सामुहिकतेत पारंपरिक रुढींचे, ंसस्कारांचे संवर्धन होते.

पौष महिन्यात येणारा हा संक्रांतीचा सण सामाजिक जीवनातला एक महत्त्वाचा सण आहे. मकरसंक्रांत ते रथसप्तमी या दिवसात दान, जप, ध्यान करण्याची उदात्त प्रथा आहे. असं म्हणतात की पौष महिन्यात येणार्‍या या सणात दान हे पुण्यकर्म करावं.
डिसेंबर- जानेवारीत निसर्गात थंडी फार असते. थंडीमुळे कोरडी झालेली त्वचा मऊ व्हावी म्हणून तीळ सेवन करतात. तिळात स्निग्धता असते. तीळ तेल लावून अभ्यंगस्नान केल्याने त्वचा सतेज होते. तीळ व गूळ यासारखे स्निग्ध व गोड पदार्थ या दिवसात शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवतात. तिळगुळ घ्या, गोड बोला.. असे एकमेकांना म्हणून एकमेकांबद्दल स्नेहवृद्धी करण्याचा, घट्ट नातीसंबंध करण्याचा, प्रेमाने वागण्याचा संदेश देणारा हा पौषातील मकरसंक्रांतीचा मंगलदिन आहे.

घरोघरी स्त्रिया हळदीकुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात. हल्ली वाण वाटण्यात चढाओढ दिसून येते. मुख्य उद्देश हळदीकुंकूचा, तो बाजूलाच राहतो. अमक्याकडे गेल्यानंतर वाण काय वाटले याचेच चर्चाचर्वण होते. त्यामुळे संक्रांतीची मूलार्थ हरवत चाललाय.

संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात स्त्रिया वाण वाटतात. ही प्रथा म्हणजे एक प्रकारचे दानच आहे. बर्‍याच ठिकाणी हळदीकुंकूचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळी स्त्रियांना हळदीकुंकाचे आध्यात्मिक, पारंपरिक रहस्य समजावून सांगावे. संक्रांतीच्या पर्वात तिळदान हे एकमेकांबद्दलचा स्नेहभाव वृद्धीकरणाबरोबरच आत्मशुद्धीही आहे. अज्ञान अंधःकारात मनात व समाजात दाटलेली मरगळ, वैमनस्य विसरून प्रकाशाने उजळलेल्या नवमार्गावर वाटचाल करण्याचा काळ आहे. सर्वांनी सामंजस्याने, सहकार्याने राहावे यासाठी ‘गोड बोला’ अशा संदेशाची देवाणघेवाण करणे हे मकरसंक्रांतीचे वैशिष्ट्य आहे.

वास्तविक तिळगूळ देण्यामागील भाव- सूक्ष्मातील सांघिक वृत्ती गुण्यागोविंदाने एकत्र येतात. तिळगूळाचे लाडू हे आत्मिक एकता व मधुरता यांची शिकवण देतात. त्यामुळे साहजिकच आपल्यात आत्मिक स्नेहभाव, बंधुत्व भाव असला पाहिजे. ममता, बंधुभाव आहे तर जीवन सफल होेते अन्यथा जीवन नीरस आहे. म्हणून सर्वांशी सदैव आत्मिक प्रेमाने वागावे.

धार्मिक, आध्यात्मिक रहस्य लक्षात घेऊन आपल्यामध्ये परिवर्तन करुया. संक्रमण म्हणजे बदलाचा प्रवास. तसं बघितलं तर सगळंच बदलत चाललंय. तरीही आपण चालीरीतींचं गाठोडं घट्ट पकडून ठेवले आहे. बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य. घटक आहे म्हणतात.

सख्यांनो, संक्रमणाच्या या शुभसमयी पौष महिन्यातील गैरसमज, खुळचट कल्पनांच्या नादी लागून हा महिना वाया का घालवायचा? या शुभ महिन्यातील नववर्षाच्या शुभसमयी अनिष्ट प्रथा दूर करून तनामनाची शुद्धता करु. आत्मबला घरोघरी ज्ञानदीप तेवत राहो. या विसशे विसाव्या शतकात काही बदल स्वीकारून जगायला शिकुया. नववर्षात नव विचार सागरमंथनाची व नवनिर्मितीची कास धरुया. या ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सदैव सर्वांना चैतन्यमय जीवन जगता यावे अशी धारणा बाळगून ्वेंटी-ट्वेंटीचे स्वागत करुया. शेवटी आम्हा प्रत्येकाचे जीवन आनंदी निरामय होवो हीच मंगलकामना!!