पौगंडावस्था भाग – ३

0
212
  •  डॉ. स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

तान्ह्या वयात मुल रडायला लागले की पालक त्यांना मोबाईल दाखवतात आणि मग पौगंडावस्था आली की त्याचा वापर कसा करायचा हे पालकांपेक्षा ह्या छोट्या मुलांनाच जास्त चांगले समजत असते. कारण त्यांना जवळ जवळ ह्या मोबाईलचे व्यसनच लागलेले असते आणि पालकांना हे त्यांचे व्यसन सोडवणे जवळजवळ अशक्य होऊन जाते.

पूर्वीच्या लेखांमध्ये आपण ह्या वयाच्या मुला-मुलींमधील नैसर्गिक शारीरिक व मानसिक बदल पाहिलेत. पण हल्ली आपल्या दृष्टीस असे येऊ लागले आहे की बदलत्या वातावरणात व काळामुळे मुलांच्या ह्या वयामध्ये त्यांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेमध्ये काही अनैसर्गिक बदल घडून येऊ लागले आहेत आणि ह्या बदलांना परिसरातील अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत- जसे वाढत्या सोशल माध्यमांचा वापर, मोबाईल, इंटरनेट, नवनवीन मोबाईल ऍप्स व गेम्स इ.
हल्लीच्या युगात माहिती पुष्कळ उपलब्ध असते पण ती साठवून त्याचा योग्यवेळी वापर करणे मात्र कठीण होत चालले आहे आणि अशी मुबलक माहिती १५-२० वर्षांपूर्वी मुलांना उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे त्या काळच्या मुलांचे वागणे व राहणीमान हे त्यांच्या वयाला साजेसे असायचे. पण हल्ली वाढती माहिती व तंत्रज्ञान ह्याचा नाही म्हटला तरी मानसिक ताणच ह्या कोवळ्या वयामधील मुलांच्या मनावर होत असतो. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात-आचरणात ह्या गोष्टींचा प्रभाव घरातील व्यक्तीने केलेल्या संस्कारांपेक्षा अधिक आढळून येतो.

हल्ली मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आढळते. त्यामधील वेगवेगळे व्हिडिओज पाहणे, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम ह्यांसारख्या माध्यमांवर ही मुले खूप क्रियाशील असतात त्यामुळे साहजिकच वेगवेगळी चांगली-वाईट माहिती ह्या मुलामुलींना मिळत असते. शाळा अभ्यास ह्या व्यतिरिक्त फावल्या वेळात पूर्वीची मुले मैदानी खेळ, बैठे खेळ खेळायची, पुस्तके वाचायची पण हल्ली मुले फक्त तासन्‌तास मोबईल घेऊन बसतात. कारण ह्या एकाच वस्तूमध्ये त्यांना सगळे काही उपलब्ध होते आणि ह्याची सुरुवात आपण पालकांनीच त्यांना करवून दिलेली असते.

तान्ह्या वयात मुल रडायला लागले की पालक त्यांना मोबाईल दाखवतात आणि मग पौगंडावस्था आली की त्याचा वापर कसा करायचा हे पालकांपेक्षा ह्या छोट्या मुलांनाच जास्त चांगले समजत असते. कारण त्यांना जवळ जवळ ह्या मोबाईलचे व्यसनच लागलेले असते आणि पालकांना हे त्यांचे व्यसन सोडवणे जवळजवळ अशक्य होऊन जाते. बरेचदा हीच गोष्ट पालक व मुले ह्यांच्यातील संघर्षाचे कारण बनते. जर आपण मुलांना तो मोबाईल जास्त वेळ वापरू नको, तो ठेव आता… असे सांगितले की त्यांना राग येतो. चीड येते व ही मुले अगदी चलबिचल होऊन जातात. बर्‍याच मुलांमध्ये तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरसारख्या अवस्था निर्माण होऊ लागल्या आहेत.

ह्या मोबईलच्या अतिरेकी वापराने मुलांमध्ये मानसिक अस्थैर्य निर्माण होऊ लागले आहे. ही मुले एखाद्या गोष्टीवर नीट लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शालेय कारकीर्दीवर होऊ लागला आहे. चिडचिड, आतताईपणा, चंचलपणा, असे दुष्परिणाम मोबाईलच्या अति वापराने ह्या मुलांमध्ये होऊ लागले आहेत. शारीरिक दुष्परिणाम म्हणजे सतत कानात इयर फोन घालून ऐकत बसल्याने श्रवणशक्ती कमी होणे, सततमोबाईल स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊन डोकेदुखी, चष्मा लागणे डोळे दुखणे, डोळे जड होणे इ. तक्रारी पाहायला मिळतात.
(क्रमशः)